अमरावती :
कपाशीवरील बोंडसड व बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना
राबविण्याचे निर्देश देतानाच,
बोंडसड व बोंडअळीने जादा नुकसान झालेल्या
क्षेत्रातील नुकसानाबाबत भरपाईसाठी पाठपुरावा करू, असे राज्याच्या महिला व
बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज पुसदा- गोपाळपूर-
कठोरा दौ-यादरम्यान सांगितले.
पालकमंत्री श्रीमती
ठाकूर यांनी आज पुसदा, कठोरा व गोपाळपूर या गावांना भेट दिली व गावकऱ्यांशी संवाद
साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी कठोरा येथे स्थानिक
शेतकरी बांधवांच्या शेतात जाऊन बोंडसड व बोंडअळीग्रस्त कपाशी पीकाच्या क्षेत्राची
पाहणी केली. तहसीलदार संतोष काकडे, कृषी अधिकारी अविनाश पांडे यांच्यासह अनेक
अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती
ठाकूर म्हणाल्या की, सोयाबीन पीकाचे नुकसान झाल्यानंतर आता कपाशी पीक तरी हाती
येईल, अशी सगळ्यांनाच आशा होती. पण बोंडसड व बोंडअळीच्या समस्या येऊन चिंताजनक
परिस्थिती उद्भवली आहे. या नुकसानाबाबत शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी
सर्वंकष प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांसह आवश्यक त्या सर्व
यंत्रणांकडे पाठपुरावा करण्यात येईल. महाविकास आघाडी शासन खंबीरपणे शेतकरी
बांधवांच्या पाठीशी उभे आहे.
इतरत्र बोंडअळीचा
प्रादुर्भाव टाळण्यासाठी व शेतकरी बांधवांना उपायांची माहिती देण्यासाठी कृषी विभागाने
सर्वदूर माहिती, मार्गदर्शनपर उपक्रम सातत्याने राबवावेत, तसेच हानी झालेल्या
क्षेत्राची पाहणी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
रस्त्यासाठी निधीची कमतरता पडू
देणार नाही
गोपाळपूर- आमला रस्ता
तत्काळ पूर्ण करण्यासाठी प्रस्ताव द्यावा. गावांना जोडणाऱ्या अधिकाधिक रस्त्यांचे प्रस्ताव
द्यावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला गोपाळपूर पाहणी
दौ-यात दिले. ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देऊ. पायाभूत
सुविधांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी गोपाळपूर पाहणी
दौ-यात दिली.
जनावरांच्या चो-यांचे
प्रकार तत्काळ थांबविण्याचे निर्देश
कठोरा येथे जनावरांच्या
चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. या महिन्यात वीस जनावरे चोरीला गेली आहेत. स्थानिक
पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे.
याठिकाणी जनावरांच्या चो-या सातत्याने होत आहेत. अनेकदा अशा गुन्ह्यांमागे एखादी
टोळी कार्यरत असते. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी लक्ष घालून या प्रकरणाचा तत्काळ छडा
लावावा व चोऱ्यांचे प्रकार तत्काळ थांबवावेत, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती
ठाकूर यांनी दिले.
यावेळी पालकमंत्र्यांनी ग्रामस्थ, शेतकरी
बांधव, महिला यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व या अडचणींचे
तत्काळ निराकरण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.