- प्रा. डॉ. रविन्द्र मुन्द्रे
- विभाग प्रमुख, इतिहास विभाग
- श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, अकोला, महाराष्ट्र
- 9623886787, mundre_ravindra@rdgakola.ac.in
प्रस्तावना :-
धर्म मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वातील आणि समाजजीवनातील आवश्यक मूल्ये जगापुढे मांडतो. मनुष्य जेव्हा जगाच्या संदर्भात मूल्यांचा विचार करू लागतो तेव्हा ही गोष्ट घडते, मग त्यांचे जग कितीही लहान असो. सामाजिक आणि मानसिक जीवनासारखी ही गोष्टदेखील माणसाच्या बौद्धिक क्षमतेवर आधारलेली असते. मनुष्य हा धार्मिक प्राणी आहे आणि केवळ मनुष्यच त्याची मूल्ये जगापुढे ठेवण्यास समर्थ आहे. दुसऱ्या शब्दात सांगताना असे म्हणता येऊ शकते की, मनुष्याची बौद्धिक आणि मानसिक शक्ती ही त्याची मूल्ये आणि त्याच्या संकल्पना यांचे जागतिकीकरण करण्याचा प्रयत्न करते. सारासार विचार करण्याची पद्धत माणसाला वैश्विक संकल्पनाचे भांडार प्रदान करते, तद्वतच धार्मिक यंत्रणाही माणसाला वैश्विकतेचे दर्शन घडवीत असते.
जॉन बायलिस आणि स्टीव्ह स्मिथ यांनी जागतिकीकरणणाची व्याख्या करताना म्हटले आहे की,”जगाच्या विविध भौगोलिक क्षेत्रात राहणार्या लोकांमध्ये वाढते सामाजिक, आर्थिक, औद्योगिक व्यापारी, सांस्कृतिक संबंध दर्शविणारी व्यापक प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय” या व्याख्येच्या अनुषंगाने जगातील भौगोलिक क्षेत्र लक्षात न घेता तथागत गौतम बुद्धांनी आपले जे सिद्धांत व तत्वज्ञान मांडले ते मानवी विकासासाठी आहे हे कोणीही नाकारू शकत नाही.बुध्दाच्या धम्माकडे फक्त अध्यात्म म्हणून पाहिले गेले तर ती फार मोठी चूक होईल. बुद्ध धम्म हा जितका अध्यात्मिक आहे त्यापेक्षा जास्त तो सामाजिक आहे. म्हणूनच बुद्धाला या जगाच्या पाठीवरील पहिला समाज सुधारक म्हटले गेले आहे. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या सामाजिक,आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक इतर सर्व क्षेत्रातील विकास होणे गरजेचे असते. बुद्धाने आपल्या धम्माचा प्रचार व प्रसार ४५ वर्षे केला. या कालखंडात त्यांनी व्यक्तीच्या सर्वांगिन विकासासाठी उपरोक्त प्रत्येक क्षेत्राबाबत आपले विचार, उपदेश, सिद्धांत व तत्वज्ञान मांडले आहे.त्यांचे तत्वज्ञान हे व्यक्ती विकासासाठी असल्यामुळे जगातील प्रत्येक व्यक्तीच्या ते हिताचे व कल्याणाचे आहे. आपला प्रत्येक सिद्धांत मांडताना त्यांनी जगातील व्यक्ती गृहीत धरलेला दिसून येतो. त्यामुळे त्याला आनंदी व समृद्ध करण्यासाठी बुद्ध भौगोलिक सीमांमध्ये बांधले गेलेले दिसत नाही. या जगाला धम्मराज्य बनविणे हा त्यांच्या शिकवणीचा उद्देश आहे. त्यामुळे बुद्ध हे जागतिकीकरणाचे खंबीर पुरस्कर्ते होते. “Globalizing process as desirable or necessary to the well – being of human society.”१
तथागत गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन सारनाथ येथे दिले या घटनेला इतिहासात धम्मचक्र प्रवर्तन असे म्हटले जाते. त्यांना जे ज्ञान प्राप्त झाले होते ते त्यांनी कौंडिण्य, वप्प, भद्दीय, महानाम आणि अश्वजीत या परिव्राजकांना सांगितले. आपण मिळविलेले ज्ञान हे अखिल मानव जातीला दुःखातून मुक्त करून निर्वाणाकडे नेते असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला दिसतो. बुद्धाने सांगितलेले तत्त्वज्ञान व सिद्धांत त्याला धम्म ही संज्ञा दिली गेली. जेव्हा आपण मिळविलेले ज्ञान लोकांना पटेल काय? ते त्याचा स्वीकार करतील काय त्यांना माझा धम्म समजेल काय मनुष्यजात ही स्वार्थी असते ते माझ्या धम्माला आचरणातील काय अशी अनेक प्रश्न तथागत बुद्ध समोर निर्माण झाले. तेव्हा बुद्धाने आपले तत्वज्ञान व सिद्धांत न सांगण्याचे ठरविले. ब्रम्ह सहंपतीला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने बुध्दाजवळ जाऊन त्यांना नम्र विनंती केली,”आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात. आपण जगाला अंध:कारातून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता? सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानवजातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विन्मुख होऊ शकता? आपला सद्धम्म ऐकावयास न मिळाल्यामुळे या जगात वावरणाऱ्या अशुद्ध मनाच्या माणसाचा अध:पात होत आहे. आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय? पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो त्याच प्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्या हे दुःखमुक्त भगवन दुःखाच्या सागरात बुडालेल्या या लोकांकडे पहा! जन्मऋणातून मुक्त झालेल्या हे विजयी वीरा ऊठ, जगाकडे जा श, त्यांच्याकडे पाठ फिरवू नको.”२ ब्रह्म सहंपतीने केलेल्या या विनंती वजा आवाहनाचा तथागताने सखोल विचार केला. जगात मनुष्यप्राणी हा दुःख भोगतो आहे. त्याला या दुःखातून मुक्त करायचे असेल तर माझ्या तत्त्वज्ञान प्रभावी ठरू शकते. मी संम्यक संबुद्ध असल्यामुळे जगातील मानवजातीचा विचार केलाच पाहिजे.” जगामध्ये अतिशय दुःख आहे हे जाणून भगवान बुद्धाला पटले की, हात जोडून संन्यासी म्हणून स्वस्थ बसणे आणि जगात जसे घडते आहे तसे घडू देणे हे योग्य नाही. जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ होय. त्यापेक्षा जग बदलून त्याची सुधारणा करणे हेच अवश्य आहे. त्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला की, जगात इतका संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय माहीत नव्हता. जर आपल्या धम्मप्रचाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता जगात पुनरपि जाऊन त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखले. म्हणून भगवान बुद्धांनी ब्रह्म सहंपतीची विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याचा त्यांनी निश्चय केला”.३ बुद्धाच्या निश्र्चयात संपूर्ण जगातील मानव जातीचा विचार केला गेलेला दिसतो. मी ज्या कुटुंबात, कुळात, वंशात, राज्यात, देशात जन्मलो त्यांचाच विचार केला पाहिजे असा संकुचित विचार तथागत बुद्धाने केलेला दिसत नाही. मनुष्यप्राणी तो मग जगातील कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात राहणारा असो त्याच्यासाठी माझे तत्त्वज्ञान आहे ही कळकळ त्यांनी ब्रह्म सहंपतीला दिलेल्या उत्तरातून दिसते. म्हणूनच जेव्हा बुद्धाने त्याची विनंती मान्य केली तेव्हा तो परत जाताना आनंदाने सांगत सुटला की, “जगातील सर्व दुःखाचे व पापाचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे. त्यांचा धम्म म्हणजे सत्य, संपूर्ण सत्य, सत्याशिवाय दुसरे काहीही नसून ते केवळ सत्यच आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की, जे मैत्री, करूणा आणि भ्रातृभावाची शिकवण देतात की, जी माणसाला आपल्या बांधवांची बंधमुक्तता करण्यात सहाय्यभूत होते”.४
तथागत बुद्धाने तत्कालिन परिस्थितीचा उहापोह करताना असे सांगितले की, “भिक्खूंनो,ज्याने पब्बजा घेतली आहे, त्याने या दोन टोकांचे सेवन करू नये. कोणत्या दोन? हे जे हीन, अनुचित, अज्ञानी लोकांचे, अनरिया आणि अनर्थाने युक्त असे कामनांमध्ये, कामोपभोगांमध्ये गुंतणे आहे, ते एक टोक आणि हे जे दुःखदायक अनरिय आणि अनर्थाने युक्त असे स्वतःला क्लेश देणे आहे, ते दुसरे टोक होय. भिक्खूंनो, तथागताने ही दोन्ही टोके काढून मध्यम प्रतिपद् शोधली आहे.”५ त्यांनी त्याचबरोबर एक गोष्ट पुन्हा स्पष्ट करुन सांगितली की, “आपला जो मार्ग धम्म आहे त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही कर्तव्य नाही. त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही तसेच त्या धम्माचा कर्मकांडाशी काहीही संबंध नाही.”६ बुद्धाने आत्मा, ईश्वर, पुनर्जन्म आणि कर्मकांड नाकारून कोणाला स्वीकारले हे महत्त्वाचे आहे. त्यांच्या धम्माचे अधिष्ठान, पाया किंवा केंद्रबिंदू काय असावे याची उत्सुकता निश्चितच निर्माण होते. त्यांनी आपल्या धम्माचा उद्देश काय निश्चित केला असावा. जगातून दुःख नाहीसे करण्यासाठी बुद्धाजवळ नेमकी कोणती उपाययोजना आहे. याबाबत पंचवर्गिय भिक्खूंना उपदेश देताना प्रारंभीच याचा खुलासा केलेला दिसतो. ” माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. आपल्या धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे. मनुष्यप्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात रहात आहे हे त्याचे दुसरे तत्त्व होय. हे सर्व जग दुःखाने भरले आहे, आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे-तिसरे काही नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच भगवान बुध्दाच्या धम्माचा पाया होय.”७ “जगात सर्वत्र पतित लोक असतात. परंतु पतितांचे दोन वर्ग असतात; ज्यांच्यासमोर आदर्श आहे असे पतित आणि ज्यांच्या समोर कोणताच आदर्श नाही असे पतित. ज्यांच्यासमोर कोणताच आदर्श नाही, अशा पतिताला आपण पतित आहोत हेच कळत नाही. त्यामुळे तो नेहमीच पतित राहतो. याउलट ज्याच्यासमोर एखादा आदर्श आहे, असा पतित आपल्या पतितावस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करीत असतो. कारण आपण पतित आहोत हे त्याला माहीत असते.” ८ तथागतांनी चार आर्यसत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, पंचशील, दहा पारमिता याद्वारे जगात दुःख आहे आणि जगाला दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग आहे हे स्पष्ट करून दिलेले दिसते. हे जग सुंदर, समृद्ध, नीतिवान बनविण्यासाठी मनुष्याने चांगला होण्याची गरज आहे. विशुद्धी मार्गाचा अंगिकार केल्यास चांगले जीवन जगता येऊ शकते असे बुद्ध म्हणतात. पंचशील हे मनुष्याच्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करणारे परिमापन आहे. प्रत्येक व्यक्तीने अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्यास एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होईल. परंतु बुद्ध सदगुणांना आचरणात आणण्यासाठी प्रज्ञेची जोड द्यायला सांगतात. कारण आंधळेपणाने चांगली कृती करणे हे पुरेसे नाही.”प्रज्ञेच्या कसोटीला सद्गुणमार्ग उतरला पाहिजे. म्हणून समज आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे. अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते यांचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कुशल कर्म कोणते याचे ज्ञान व जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे. अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा चांगुलपणा असू शकणार नाही.”९
बुद्धाने आपले सारनाथ येथील प्रथम प्रवचन देऊन धम्मचक्र प्रवर्तन केले.संपूर्ण प्रवचनानंतर उपस्थित पाच परिव्राजकांना बुद्धाने त्यांच्या प्रतिक्रिया विचारल्या. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमधून असे दिसून येते की, बुद्धाचा धम्म हा संपूर्ण मानवजातीसाठी एक वरदान आहे. धम्माचरणाने माणूस माणसाशी माणुसकीने वागून जगाला सुंदर बनवू शकतो. बुद्धाने सांगितलेले सिद्धांत व तत्त्वज्ञान हे व्यवहार्य आहेत. जगात यापूर्वी अशा पद्धतीने कोणी आपले तत्वज्ञान मांडले दिसत नाही. दुःख नष्ट करणे कोणत्या धर्माचा उद्देश असू शकतो असे कधी झालेले दिसत नाही. आत्मा, ईश्वर, प्रार्थना, कर्मकांड, पुनर्जन्म या सर्व काल्पनिक आणि बुद्धीच्या कसोटीवर न टिकणाऱ्या या गोष्टीशिवाय कोणते तत्वज्ञान असू शकते हे त्यांना समजले. म्हणूनच त्या पाचही परिव्राजकांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या. “जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने दु:खाचा परिहार करणे हा धर्माचा खरा उद्देश आहे हे सांगितलेले नाही. जगाच्या इतिहासात यापूर्वी मूलतः इतका सरळ आणि साधा, अद्भुता आणि अतिमाणूषी शक्तीपासून इतका मुक्त, आत्मा, ईश्वर आणि मरणोत्तर जीवन यावरील श्रद्धेपासून इतका स्वतंत्र, इतकेच नव्हे तर अशा श्रद्धेला विरोध असणारा मुक्तीचा मार्ग कधीही मांडण्यात आला नाही. जगाच्या इतिहासात यापूर्वी कुणीही अशा धर्माची योजना पुढे मांडली नाही की, ज्यामध्ये दैवी साक्षात्काराला थारा नाही आणि त्याच्या आज्ञा ईश्वराच्या आज्ञा नसून त्या माणसाच्या सामाजिक गरजांच्या चिकित्सेपोटी निर्माण झालेल्या आहेत! जगाच्या इतिहासात मोक्ष हे असे सुखाचे वरदान आहे की, जे माणसाने स्वप्रयत्नाने व सदाचाराने वागून याच जन्मात आणि याज पृथ्वीतलावर राहून प्राप्त करायचे असते हा मोक्षाचा अर्थ यापूर्वी कुणीही सांगितला नाही!”१०
बुद्धाने आपल्या चिंतनातून अनुभवातून या धम्माची निर्मिती झाली आहे असे म्हटले आहे. त्याने स्वतःला दैवी किंवा आपली शिकवण दैवी आहे असे कुठेही म्हटलेले नाही. धम्म म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाला दिलेला संदेश आहे असे तो म्हणत असे. आपल्या धम्माचे परीक्षण करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे आपला धम्म प्रमादातीत आहे असे त्याने कुठेही म्हटलेले नाही जगातील सर्व माणसांचा जगासंबंधीचा अनुभव धम्माचे अधिष्ठान आहे असे तो म्हणतो.
माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मग हे नाते अधिक घट्ट करण्यासाठी बुद्धाने कोणती मुल्ये सांगितली? कोणत्या मानवी मूल्यांच्या आधारावर बुद्ध जगाला धर्मराज्य बनवायला निघाले होते? माणसाचा माणसाशी संबंध येतो तेथे नीतिला सुरुवात होते. बुद्धाच्या धम्मात नीतीला काय स्थान दिले गेले आहे? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व न्याय, अहिंसा, शांती या मानवी मूल्यांना नीती जन्म देते. बुद्धाने सांगितलेल्या नीतीने उपरोक्त मानवी मूल्ये निर्माण झाली काय? इतर धर्मामध्ये असलेली नीती आणि बुद्ध धम्मामध्ये असलेली नीती यामध्ये काही फरक सांगितला गेला आहे काय? असे अनेक प्रश्न बुद्ध तत्त्वज्ञानाविषयी निर्माण केले गेलेले आहे. त्यावर बुद्धाने अतिशय समर्पक उत्तर दिलेली दिसतात. यासाठी अगोदर धर्म आणि धम्म यामध्ये काय फरक आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तथागत बुद्ध आणि पोठ्ठपद यांच्या संवादातून धर्म आणि धम्म यातील फरक समजणे सोपे जाते, “पोठ्ठपदाने बुद्धाला जग शाश्वत आहे काय?, जग शाश्वत नाही काय?, जग सान्त आहे काय, जग अनंत आहे काय? आत्मा आणि शरीर या दोन भिन्न वस्तू आहेत काय?, जयमाला सत्य सापडले आहे त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे काय? त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही काय? त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे आणि नाही असे आहे काय? त्याला मरणोत्तर परत अस्तित्व नाही अथवा त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही असे नाही?” ११ पोठ्ठपदाने विचारलेल्या या सर्व प्रश्नांना बुद्धाने एकच उत्तर दिले, “या विषयावर मी आपले मत व्यक्त केले नाही.” १२ बुद्धाने यावर आपले मत का व्यक्त केले नाही यासंबंधी पोठ्ठपदाला सांगतात की, “या प्रश्नांच्या उत्तरापासून काहीच लाभ नाही. त्याचा धम्माशी संबंध नाही. ते सदाचरणाच्या कोणत्याही घटकाला उपकारक नाही. त्यापासून अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, शमन, सत्यज्ञान, अष्टांग मार्गाच्या उच्चतर अवस्थांचे ज्ञान किंवा निर्वाण साधत नाही.” १३ “मी दुःख म्हणजे काय? दुःखाचे कारण काय? दुःखाचा निरोध म्हणजे काय? आणि दुःखाचा निरोध कसा साधता येईल हे स्पष्ट केलेले आहे. कारण त्यापासून लाभ आहे. तो धम्माचा विषय आहे. सदाचरण, आसक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, शमन, सत्यज्ञान, अष्टांगिक मार्गातील उच्चतर अवस्थासंबंधी दृष्टी आणि निर्वाण साधता येते, म्हणूनच तर मी दुःख, दुःख कारण, आणि दुःख निरोधाचे साधन यासंबंधी विधान केले आहे.”१४ धर्म आणि धम्म यामधील फरक या संवादाने अगदी स्पष्ट करून सांगितलेला दिसते. सारांश, रूपाने असे म्हणता येईल की, “धर्माचे प्रयोजन जगतप्रारंभाचे स्पष्टीकरण आणि धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना ही आहेत.”१५ धर्म (Religion) आणि नीती याचा काही संबंध आहे काय? धर्मामध्ये नीतिचे काय स्थान आहे? धर्मांच्या अध्ययनाअंती असे दिसून येते की धर्मात नीतिला स्थान नाही. कारण धर्मामध्ये आत्मा, परमात्मा, प्रार्थना, पूजा, कर्मकांड, समारंभ, यज्ञ सांगितलेले आहे आणि यामध्ये नीतीची काहीही आवश्यकता नसते. प्रत्येक धर्मामध्ये नीती सांगितली आहेत परंतु धर्माचा पाया म्हणून किंवा आधारस्तंभ म्हणून मी तिकडे पाहिले जात नाही. धर्मामध्ये नीतीचा अंगीकार फक्त आकस्मिक किंवा प्रासंगिक केलेला दिसून येतो. त्यामुळे धर्मात नीती प्रभावी दिसत नाही.
धम्म आणि नीती यांचा जवळचा संबंध आहे. धम्माचा पाया नीती आहे धम्माचा प्रारंभ आणि शेवट नीतिमध्येच आहे. माणसाचा माणसाशी संबंध येतो तेव्हा नीतीला प्रारंभ होतो. धम्मामध्ये माणसाने माणसाशी प्रेमाचे व मैत्रीचे संबंध ठेवणे आवश्यक आहे. “धम्मात माणसाने माणसावर प्रेम केलेच पाहिजे; यातूनच नीतिचा उगम होतो”.१६ केवळ नीती पुरेसी नाही तर ती पवित्र आणि सर्वव्यापक असणे गरजेचे आहे. कारण यातूनच बंधुत्व निर्माण होते.
मानव समाजाचा विकास जीवन संघर्षामुळे घडून आलेला आहे. हा संघर्ष अन्नसामुग्री कमी असल्यामुळे झालेला दिसतो. त्यामध्ये निसर्गाचे दांत व नखे रक्तलांछित झाले असावे, इतके भयानक स्वरूप या संघर्षाचे होते. अशा स्वरूपाच्या संघर्षात जे योग्यतम आहे त्याचाच टिकाव लागू शकतो. हळूहळू काळ पुढे सरकत गेला आणि कुणी तरी असा प्रश्न निर्माण केला की, जो सर्वात अधिक शक्तिमान तोच योग्य आहे काय? दुर्बलाला संरक्षण दिले गेले तर समाजाचे हेतू आणि साध्यापर्यंत पोहोचण्यात तो अधिक योग्य ठरणार नाही काय? तत्कालीन सामाजिक स्थितीने त्याचे उत्तर होकारार्थी दिलेले दिसते. मग पुन्हा एक प्रश्न निर्माण केला गेला की, दुर्बल माणसाचे संरक्षण करण्याचा मार्ग कोणता? यावर उत्तर सकारात्मक दिला गेले की, “जे योग्यतम म्हणजे सर्वात अधिक शक्तिमान आहेत त्यांच्यावर काही निर्बंध घातल्याने ते शक्य होणार आहे.”१७ या उत्तरामध्ये नीतीची आवश्यकता आणि उगम दिसून येतो आणि ज्यामुळे समता हे तत्त्व प्रस्थापित होऊ शकेल. व्यक्तिच्या विकासाला संरक्षण प्राप्त करून द्यायचे असेल तर नीती पवित्र आणि सर्वव्यापक असणे गरजेचे आहे. यातूनच माणसामाणसातील भ्रातृभाव निर्माण होतो ज्याला बंधुत्व म्हटले गेले.
बंधुत्व म्हटले की तिथे हिंसेला काहीही जागा नाही. म्हणूनच बुद्धाने अहिंसेचे तत्त्व अखिल मानव जातीसाठी सांगितलेले दिसते.जीवहिंसा न करणे म्हणजे अहिंसा, हा बुद्धाच्या शिकवणुकीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.बुध्दाने अहिंसा हे तत्त्व म्हणून स्वीकारले. त्याला नियम होऊ दिले नाही. “तत्त्व आणि नियम यांच्यात फरक आहे व तो फरक फार मोठा आहे. (Principle is to be followed) (Rule is to be obeyed) नियम झाला की, मनुष्य हा त्याचा गुलाम होतो. तत्त्व ठरले की, मनुष्य त्याचा उपासक होतो. गुलाम होत नाही. हा फरक ध्यानात न आल्याकारणाने अनेक समाज रसातळाला गेलेले आहेत. तत्त्व लवचिक असते. नियम कडक असतो. त्याला मोडता येत नाही. नियम मात्र समाजाची मोडतोड करू शकतो. नियम अडाण्याकरीता असते तत्त्व शहाण्याकरीत असते. तत्त्व प्रगतीला बाधा आणू शकत नाही. नियम गती खुंटवितो”.१८ बुद्धाच्या अहिंसेचे स्वरूप कसे होते हे पाहणे आवश्यक आहे. बुद्ध हिंसेला नकार देऊन अहिंसा सांगतो तर त्यांच्या तत्त्वज्ञानात कोणत्या अहिंसेविषयी सांगितले आहे. “अहिंसा दोन गोष्टीवर आधारित आहे. आवश्यकतेसाठी हत्या आणि हत्या करण्याची इच्छा होणे! जर राष्ट्रावर परचक्र आले, देश संकटात सापडला तर, हातात तलवार घेऊन राष्ट्ररक्षणासाठी तळहातावर शीर घेऊन समरांगणात उडी घेणे आणि शत्रूचा निःपात करणे, त्यांची हत्या करणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे. याचा अर्थ ही हिंसा आवश्यक होती. त्याला बौद्ध तत्त्वज्ञानात उच्चतम प्रतीची अहिंसा म्हणतात. दुसरी मारण्याची इच्छा होणे म्हणजेच स्वतःच्या समाधानाकरिता पशुबळी देणे, पशुहत्या करणे ही हिंसा होय”.१९ जीवहत्येची आवश्यकता व जीवहत्येची इच्छा यामध्ये बुद्ध फरक करीत होते, हे स्पष्ट दिसून येते. परंतु पुढे बुद्ध हे सांगायला विसरले नाही ही की, जीवहत्येची आवश्यकता आहे की नाही हे त्या माणसाने आपल्या सद्सदविवेक बुद्धीने ठरविले पाहिजे.
अहिंसेतून शांतीचा जन्म होत असतो. शांती स्थापन करण्यासाठी सतत प्रयत्नरत राहणे हे राज्यकर्त्याचे कर्तव्य असते. युद्धामध्ये जो जेता असतो त्याने पराभूत राज्यामध्ये कल्याणकारी कार्य करावे. जेणेकरून शांतता निर्माण होईल. त्यासाठी कोणती कर्तव्य पार पाडायला पाहिजे याबद्दल बुद्धाने भिक्खूंना उपदेश करताना म्हटले की, “युद्धविद्येत पारंगत असलेल्या माणसाने युद्धविराम झाल्यावर आपल्या अंगच्या ऋतुजा, अनुग्रहणपूर्ण वाणी, उद्धटपणाविरहित दयाळू वृत्ती, या गुणांचा आविष्कार केला पाहिजे. आपण कोणी आडदांड, आक्रमक नसून घरच्यासारखे वागणारे पाहुणे आहोत, इंद्रीय सुखाच्या आहारी न जाणारे, कुशाग्र बुद्धीचे, वायफळ बडबड न करणारे, हात धरून परधन हिरावून न घेणारे आहोत, असे आपल्या वर्तणुकीने सिद्ध केले पाहिजे. लोक शाप देतील असे क्षुद्र आणि नीच वर्तन करून त्याने कमीपणा आणू नये. सर्व प्राणिमात्रांना सुख-समृद्धी आणि शांतता लाभो. सबळ-दुर्बळ, लहान-मोठे प्राणिमात्र शांततेचा उपभोग घेत राहोत. दृश्य-अदृश्य, जवळचे-दूरचे, जात आणि अजात जीव शांतीचा उपभोग घेवोत अशी वृत्ती जेत्याने राखली पाहिजे.”२० युद्ध हा चुकीचा मार्ग आहे त्यामुळे दोन राज्यांमध्ये द्वेष जन्माला येतो आणि असंख्य प्राणिमात्रांना विनाकारण आपले प्राण गमवावे लागते. म्हणून शांती प्रस्थापित करून जगाला सुंदर व समृद्ध बनविणे हे प्रत्येक मनुष्याचे नैतिक कर्तव्य आहे. “शांति के संपूर्ण अर्थ मे, विश्व शांती प्राप्त करने के लिए मानवता की व्यक्तिनिष्ठता की अनुभूति घरी करनी होगी, और बडे पैमाने पर इस अहसास की सततता की दिशा मे कार्य करना होगा| हमे पहले से कहीं ज्यादा स्वयं को इस विश्व का नागरिक होना होगा और राष्ट्रवाद की अंधी दिवानगी से स्वयं को मुक्त करना होगा| समस्त जीव सृष्टी के साथ स्वयं की करीबी पहचान बनाना होगी और बडी ही तत्परता और नि:स्वार्थ भाव से उन्हे प्रेम करना होगा| इस विश्व में करुणा और विवेकशीलता की आवाज बुलंद करने के साथ साथ वृहद पैमाने पर हमे सरकारो, विश्व के लोगो और स्वयं प्रकाशमान उस प्रकार का दबाव बनाना होगा, जो आण्विक अस्त्रो के उच्चाटन के लिए जरूरी है| और सबसे पहले समूह-समूह और व्यक्ति-व्यक्ति के बीच संबंध को बनाये रखने के लिए अहिंसा के महान आध्यात्मिक और नैतिक तत्त्व के प्रति हमारी वचनबद्धता को और मजबूत करना होगा|” २१
निष्कर्ष:-
१) बुद्धाने धम्माची मांडणी करताना जे सिद्धांत व तत्त्वज्ञान सांगितले त्यात जगातील संपूर्ण मानव जातीचा विचार केलेला आहे. उदा. जगात दुःख आहे. म्हणजे बुद्धाच्या धम्माचे स्वरूप हे व्यापक असून ते कोणत्याही भौगोलिक सीमा मान्य करीत नाही.
२) बुद्धाच्या धम्माचा उद्देश जग हे धर्मराज्य बनविणे असल्यामुळे जागतिक नैतिक व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी बुद्धाने नीतीवर सर्वात जास्त भर दिलेला दिसतो.
३) धम्मामध्ये शांती आणि अहिंसा यावर भर दिलेला दिसतो. जागतिक शांती निर्माण होऊन सामाजिक सुव्यवस्था निर्माण व्हावी यासाठी बुद्धाने युद्धाचा मार्ग त्याज्य मानून हिंसेला नाकारले व अहिंसेचा स्वीकार केला.
४) स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या वैश्विक मानवी मूल्यांना प्रस्थापित करून गुलामगिरी, विषमता व भेदभाव नष्ट करता येतो यावर बुद्ध ठाम असलेले दिसून येते.
५) बुध्दाने आत्मा, ईश्वर, शब्दप्रामाण्य, ब्रम्ह, कर्मकांड, यज्ञ या काल्पनिक व अवैज्ञानिक गोष्टी नाकारून जगाला वैज्ञानिक डोळसपणा बहाल केला. जगाला दुःख मुक्त करण्यासाठी स्वतः अनुकरणीय व आदर्श म्हणून उभे राहिले. म्हणूनच ई. जे. मिल्स यांनी Buddhism या ग्रंथात म्हटले आहे की, “आपले डोळे उघडे राखण्याबाबत दुसऱ्या कोणत्याही धर्माने इतका भर देण्यात आलेला नाही”. कारण प्रा. डब्ल्यु. टी. स्टेस यांच्या म्हणण्यानुसार, “जगातल्या दु:खापैकी पुष्कळ दुःखे दुष्टपणापेक्षा मुर्खत्वाने आणि अंधश्रद्धेने निर्माण झालेली आहेत”.
६) बुद्धाचा धम्म व्यक्तीचा व्यक्तीशी असणारा उचित व्यवहार यावर आधारित आहे. त्यामुळे व्यक्ती ज्या ज्या भौगोलिक क्षेत्रात असेल त्या त्या ठिकाणी धम्माची आवश्यकता आहे. त्यामुळे धम्माचे जागतिकीकरण हे वर्तमान काळातही आवश्यक आहे. कारण इ. जी. टेलर आपल्या Buddhism and Modern Thought या ग्रंथात म्हणतात की, “प्रगतशील जगाला ही सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बुद्ध धम्माची आवश्यकता आहे”.
संदर्भ:-
१. https:// en.m.wikipedia.org, dt.15/06/2020
२. सांकृत्यायन, राहुल, विनय – पिटक, दि कार्पोरेट बाॅडी ऑफ दि बुद्धा एज्युकेशनल फाउंडेशन, तायवान, २००५, पृ. ७८.
३. आंबेडकर, डॉ. भीमराव रामजी, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, अनु. घनश्याम तळवटकर, म. भि. चिटनिस, शां. शं. रेगे, सिध्दार्थ प्रकाशन ( पीपल्स एज्युकेशन सोसायटी ), मुंबई, १९९५, आवृत्ती दहावी, पृ.८९.
४. तत्रैव, पृ. ८९.
५. साळुंखे, आ. ह., सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध, लोकायत प्रकाशन, सातारा, २०१४, पृ. १५६.
६. आंबेडकर, डॉ. भीमराव रामजी, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, पूर्वोक्त, पृ. ९४.
७. तत्रैव, पृ. ९४.
८. तत्रैव, पृ. ९६.
९. तत्रैव, पृ. १०२ – १०३.
१०. तत्रैव, पृ. १०३ – १०४
११. तत्रैव, पृ. २४८.
१२. तत्रैव, पृ. २४८.
१३. तत्रैव, पृ. २४८.
१४. तत्रैव, पृ. २४८.
१५. तत्रैव, पृ. २४९.
१६. तत्रैव, पृ. २४९.
१७. तत्रैव, पृ. २५१.
१८. नरके, हरी व इतर, (संपा.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे, खंड २०, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००५, पृ. २७८.
१९. आंबेडकर, डॉ. भी. रा., प्रबुद्ध भारत (साप्ताहिक), दादर, मुंबई, दि. २१/०७/१९५६.
२०. आंबेडकर, डॉ. भीमराव रामजी, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, पूर्वोक्त, पृ.३१५.
२१. संघरक्षित, उरगेन, अ गाइड टू द बुध्दीस्ट पाथ (बोधीपथ), अनु. धम्मचारी प्रसन्नबोधी, धम्मदूत प्रकाशन, दयालु सोसायटी, जरीपटका, नागपूर, २०१६, पृ. १९२ – १९३.