बाप.…बाहेरून मुलांसाठी कठोर पण आतून फार नाजूक असलेला प्रत्येक घरातील देवमाणूस. कुटुंबाच्या हिताची काळजी घेणारा बापच असतो. मुलांना कामाहून परत येताना खाऊ आणायला कधीच न विसरणारा तोही बापच असतो. कधीकधी कामाच्या मनःस्तापाने रागाच्या भरात मुलांवर ओरडून काही क्षणातच सर्वकाही विसरून प्रेमाने आपल्याला जवळ घेतो तो बापच असतो. पहिल्यांदा आपल्या नाजूक हाताला धरून आपल्याला चालणे शिकवतो तो आपला बापच असतो. जगातल्या प्रत्येक मुलींसाठी तर बाप म्हणजेच सुपरहिरो असतो. बाप कधीच आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीसाठी आठवत नाही, पण मोठ्यात मोठ्या संकटाच्या वेळी ” बापरे ! ” हा शब्द आपल्या तोंडातून निघाल्याशिवाय राहत नाही. बाप कितीही कठोर दिसत असला तरी तो कधीच आपल्या मुलांसाठी आतून कठोर असूच शकत नाही. बाहेरून वादळासारखा दिसणारा पण आतून पणतीसारखा पेटून आपल्या कुटुंबाला प्रकाश देतो तो असतो जगावेगळा बाप.
बापाला हृदयात जपून ठेवू..…
कोणताच बाप सणासुदीला सुद्धा स्वतःसाठी कपडे घेणार नाही पण आपल्या मुलांसाठी जीवाचे रान करेल पण नवे कपडे आणि खेळणी आणल्याशिवाय राहणार नाही. बापाला कधीच आपले प्रेम व्यक्त करता येत नाही याचे कारण म्हणजे बाप हा घरातला कुटुंबप्रमुख असतो. त्याला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बाहेर कामाला जावंच लागते. मजुरी पडली नाही पाहिजे त्यामुळे त्याला आपले मुलं झोपेतच असताना पटापट आपले घरकाम आटपून बाहेर कामाला जावं लागते आणि रात्रीच्या मुलं झोपी गेल्यावर त्याला घरी यावं लागते. त्याला सकाळीच काय तर संध्याकाळी सुद्धा आपल्या मुलांशी गप्पा मारायला वेळ मिळत नाही. काही मुलं याच कारणाने आपल्या बापाविषयी नाराज होतात आणि त्याला दोष लावत बसतात. पण त्यांना आपल्या बापाची चाललेली धडपड कधीच दिसत नाही. आईविषयी जेवढं प्रेम त्यांच्या मनात असते तेवढाच द्वेष त्यांचा आपल्या बापाविषयी असतो.
बापाच्या फाटलेल्या सदऱ्यातुन आणि हातापायाला पडलेल्या भेगातून काहीच मुलांना आपले भवितव्य घडत असलेले दिसतात. काहींना बापाची अशी अवस्था म्हणजे गतकालीन पापाचे भोग वाटतात. छोट्याछोट्या गोष्टींसाठी आपल्या बापावर राग काढणे, त्याला ओरडून बोलणे, आपल्या अपयशाचे कारण म्हणून बापाला दोष लावणे आजकालच्या मुलांना सहज सोपे वाटू लागले आहेत. बापाच्या नावाने मोठी झालेली मुलं उच्च पदावर गेल्यानंतर बापाला ओळखत नाही आणि जागतिक बाप दिवसाला स्टेटस ठेवून खोट्या शुभेच्छा देऊन जगाला आपण बापावर किती प्रेम करतो हे वरकरणी दाखवतात. काही मुले तर एवढे निर्लज्ज झालेली आहेत की, उच्च शिक्षणासाठी बाहेर असताना शिक्षणाच्या नावाने बापाकडून पैसे मागवून आपले शानशौक पूर्ण करतात. महागडी असणारी वाईन, सिगार, नशेच्या विविध वस्तू आपल्या जवळ बाळगणे म्हणजे काही मुलांना फॅशन वाटू लागली.
बाप हा स्टेटसवर ठेवण्यासाठी नाही तर हृदयात जपून ठेवण्यासाठी आहे. बाप हाच आपला आधारवड आहे. त्याची सावली जोवर आपल्यावर पडत आहे तोवर आपण सुरक्षित आहोत. बापाला कधी दुखवू नका. आज आपण बापावर रागवत आहोत उद्या आपलीच कृती पाहून आपली लेकरे आपल्यावर रागावतील हे अंतिम सत्य आहे. आपल्या मुलांनी आपला आदर केला पाहिजे असे जर कोणाला वाटत असतील तर त्यांनी आधी आपल्या मुलांसमोर आपल्या बापाची काळजी घ्यायला हवी. लहानपणी ज्याप्रमाणे आपल्याला चालण्यासाठी त्यांनी आधार दिला तसाच आधार आपणही म्हातारपणी त्यांना दिला पाहिजे. आज आपण आपल्या बापाची काळजी जेवढी घेऊ तेवढी काळजी आपले मुलं आपलीही घेतील यात दुमत नाही. चला तर मग एक दिवस नाही तर प्रत्येक दिवसासाठी आपल्या बापाला आपल्या हृदयात स्थान देऊ आणि रोज जागतिक बाप दिवस आपल्या बापाच्या चरणस्पर्शाने साजरा करू.
शब्दसखा
– अजय रमेश चव्हाण,
तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७
खूपच हृदयस्पर्शी लेख आहे खरोखर बापाची महती अपार आहे.
खूपच हृदयस्पर्शी लेख आहे खरोखर बापाची महती अपार आहे.
खूपच हृदयस्पर्शी लेख आहे खरोखर बापाची महती अपार आहे.