आठवडी बाजारासारख्या ग्रामीण अर्थव्यवस्था चक्क हजारो वर्षांच्या मानवी अर्थशास्त्रिय उत्र्कांतीचा परिपाक आहेत. त्या केवळ अर्थव्यवस्था नाहीत तर आपला सांस्कृतीक तानाबाना आहेत. लहानपणी करजगांवात, गुरुवारी आठवडी बाजार भरायचा त्याला “गुजरी” म्हणायचे. जुने जाणते माणसे गुरुवारला बस्तरवार (बृसस्पतीवारचा अपभ्रंश झाला असावा) पण म्हणायचे. बस्तरवार म्हटले की आम्हा लहान्यांना आनंदाची पर्वनी असायची. त्यात घोड्यावर लादून व्यापारी माल आनायचे. गुरुवारचा बाजार झाला की, मग पिपळखुटा, कुपटा, असा व्यापार्याचा प्रवास असे, आम्हा सगळ्या भावंडाना खाऊ साठी बाप पन्नास पैशांचं नाण तर कधी दोन आठं आणे द्यायचे. त्या धातुमिश्रीतच्या नाण्यासाठी एक आठवडाभर गुजरी ची वाट बघावी लागायची. करजगावचा बाजार गुरुवारी असल्याने त्या दिवशी मजु-यांचे पैश्याचे वाटप होत होते. काही कास्तकार तर गुरुवारी बाहॆरगांवी गेले की बाजार बोंबलायचा…! गुरुवारची गुजरी झाली की, मग त्या दिवसापासुन पुढे नवीन दिवस सुरु होतो. त्या आठवडाभरच्या मजुरीच्या एकुणच रकमे पैकी थोड्या रकमेचा योग्य विनीयोग झालेला असायचा. विदर्भात “भातकं” हा शब्द आठवडी बाजाराशी निगडीत आहे. शेव चिवडा रोज परवडण्यासारखी बाब नव्हती त्यामुळे गुरुवारी आई वडील आठवणीने भातकं आनायचे. एखाद्याने तुला किती पैसे हवेत? असा प्रश्न विचारला की, “बजार भागला की बस” असं उत्तर आलं की पट्टीचा ग्रामीण मानुसच नेमकी किती रक्कम समोरच्याला हवी हे सांगू शकतो. कारंजा,दारव्ह्याचा आठवडी बाजार रविवारी असतो. भाजी खरेदी करायला आई-वडिल मुलांना-मुलींना घेऊन जातो. त्यांना भारतीय विविधता आणि खरा अनएडीटेड भारत कसा आहे हे कळायला हवे.
या गुजरीत कचरु वानखडे यांचे मटनाचे दुकान, रहिमभाईचे कपड्याचे दुकान, नजीमभाईचे प्रसिद्ध मसाले दुकान, जंगल्यामामाचे भजे, भांडेगावच्या भगवान डवलॆ, शंकर डवले यांचे भातक्याचे दुकान, सणावारास वा प्रसंगी बायकां ज्याची आतुरतेने वाट पहायच्या ते बांगड्यावाला खमरूमामा, रामगांव रामेश्र्वरचे विविध प्रकारचे मासे, करजगांवच्या गुजरीत रहात असे, त्यातच गावातल्या जंगली भाज्या, अंबाडीची भाजी, तरोट्याची भाजी, फांदीची भाजी, कटुले, वाघाटे इत्यादी अनॆक प्रकारच्या भाज्या होत्या हा रानमेवा काही औरच होता, गुजरीच्या दिवशी तांड्यात कधीमधी मटनाचे हिस्से पडायचे त्या हिस्याच्या निमीत्तानॆ होणारी सळोईची चव तर अप्रतिम असे, ते सगळं विश्वच वेगळं होतं. मात्र कोरोनाच्या भितीने गेल्या एक वर्षापासून अनॆक गावचे बाजार चक्क बंद करुन टाकल्याने काय एकुणच परिणाम अर्थकारण अधिक ग्रामीण सांस्कृतीक विश्वावर पडतो हे दोन वर्ष नेटाने आयएएस चा अभ्यास करुन जिल्हाधीकारी झालेल्या तरुणांना कळणार नाही हे मात्र खरे…!
(Image Credit : Jagannath Wankhade)