बंजारा कुंभमेळा आहे तरी काय ?

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

    आतापर्यंत कधीच कुंभमेळा बंजारा,लभाना, नायकडा म्हणजेच बंजारा समाजाच्या इतिहासात कुंभमेळा झालेला नाही. पण दिनांक २५ जानेवारी ते ३० जानेवारी दरम्यान होणार आहे. त्यात काय ठरणार ? मानवजात जशी जशी विकसित होत गेली तस तशी मानवजातीत हेवा देवा,द्वेष, मत्सर,तूझं माझं वाढत गेलं आजही वाढत आहे. मानव बुध्दीने प्रगल्भ होत राहीला होत आहे; पण मानवजातीत भेदभाव करण्यात ही पटाईत होत गेला.धर्म, पंथ, जात, वंश यावरून आज मानव रक्तरंजीत खेळ करण्यात मग्न झालेला आहे.नेते लोक सुदधा मु मे राम बगल मे छुरी असे वागत आहेत. समाजात फुट पाडून स्वार्थ साधून घेत आहेत.

    धर्माच्या जातीच्या, वंशाच्या,पंथाच्या नावाखाली सामान्य गणाची राखरांगोळी होत आहे.विशिष्ट बोटावर मोजण्याइतके लोक धनवान होत आहेत तर बहुसंख्य लोक दारिद्रयाच्या खाईत लोटले जात आहेत. सगळ्याच पक्षाचे नेते ढोंगीपणाने घसा कोरडा होईपर्यंत ओरडून सांगत आहेत सबका साथ सबका विकास. बिचारा विकास कोठे वनवन फिरत आहे हे भारतातील नाहीरे गटाला आणखी भेटलाच नाही व दिसलाही नाही.आहीरे गट हा विकासाला कोणाला भेटूही देणार नाही.मी हिंदू आहे; पण हिंदू धर्मातसर्वांना समान वागणूक भेटते का? बोलताना म्हणतो मानवजात एकच आहे. मग हे व्यवहारात,अचरणात का आणत नाही.पुराणातील वागेपुराणातच. गरीबांच्या उपयोग फक्त गरजेपुरता असतो. लहान दगडासारखं पुसायचे व फेकून द्यायचं.

    बंजारा समाज स्वतःला हिंदू समजतो. हा समाज पूर्वीपासूनच हिंदू धर्मीय आहे का नंतर स्विकारले हा संशोधनचा विषय आहे. हिंदू धर्माच्या तत्वज्ञानानुसार बंजारा समाजाचं स्थान नेमकं कुठं आहे ? जातीच्या उतरंडीमध्ये आपण नेमके कोठे आहोत. आपण स्वतःला हिंदू समजतो. शाळेत शिकलेल्या लोकांच्या टीसीवर हिंदूधर्माची नोंद घेतलेली आहे. आपले आई बाबा तर शिकलेले नव्हते. ते गावातही राहात नव्हते. ते स्वतःच नाव सुद्धा एकेरी सांगत. पाहिल्या जणगननेत नाव मी बघीतलेत रामधन्या, बाल्या लमाणी असे लिहिले आहे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे त्याकाळी त्यांना स्वतःचं आडनावही माहित नव्हते. मग धर्म माहित असेल का ? ज्यानी नाव नोंदवले त्यांनीच धर्माचीही नोंद केली. नंतरच्या काळात बंजारा समाज कुणबी समाजाच्या सानिध्यात आला व तेथील रुढी परंपरा आपण हळूहळू स्विकारत गेलो. आता गोरमाटी धाटी नावापूर्तीच शिल्लक राहिलेल्या आहेत. शहरातील लोक धाटी मोडण्यात आग्रेसर आहेत.

    आजकाल गोदरी येथे होणाऱ्या बंजारा कुंभमेळ्याची साधक बाधक चर्चा जोरात सुरु आहे. बंजारा समाजाला कुंभमेळा म्हणजे काय हेच माहित नाही. मला वाटते हा कुंभमेळा आपल्या समाजाने कधी भरवलाच नाही. ग्रामीण भागातील बहुसंख्य लोकांनाही कुंभमेळा म्हणजे काय हे कदाचीत माहित नसेल असे मला वाटते.

    कुंभमेळा म्हणजे काय ?

    कुंभमेळा हे हिंदू लोकांचा एक उत्सव आहे. हा उत्सव बारा वर्षात एकदा होतो. हरिव्दार, अलाहाबाद (प्रयागराज), नाशिक आणि उज्जैन येथे होतो. गंगा, गोदावरी व क्षिप्रा या नदीच्या तिरावर दर तीन वर्षाला एका ठिकांनी हा मेळा भरतो म्हणजे शेवटचं ठिकाणी हा कुंभमेळा बाराव्या वर्षी भरतो.

    येथेच मेळावा का भरतो ?

    जेव्हा देव व दानव यांनी समुद्रमंथन केले तेव्हा देव आणि दानवाना समुद्रातून चौदा रत्ने मिळाली ते रत्न म्हणजे लक्ष्मी, कौस्तुभ मणी, कल्पवृक्ष (पारिजातक), सुरा, धन्वतरी, चंद्रदेव, कामधेनू, ऐरावत, रंभा, मेनका इत्यादी अप्सरा, उच्चे:श्रवा (सात तोंडे असलेला घोडा सूर्य देवाचा वाहन), हलाहल, शारंगधनुष्य, पांचजन्य शंख आणि आमृत. देव बुद्धीमान होते. राक्षस शक्तिमान होते. शक्तीपेक्षा बुद्धी श्रेष्ठ. देवांनी राक्षसास दारू दिली व त्यांनी अमृत घेतले. पण अमृत राक्षसांनी पळविले. यामुळे देव व दानवात बारा दिवस युध्द झाले. पृथ्वीवरच एक दिवस म्हणजे देवासाठी एक वर्ष. आमृतासाठी युद्ध चालू असताना हरिव्दार, अलाहाबाद, नाशिक व उज्जैन येथे आमृताचे एक एक थेंब पडले होते. म्हणून येथे दर बारा वर्षाला कुंभमेळा भरतो. कुंभमेळ्यात ऋषीमुनी,साधू लोक एकत्र येतात.

    बंजारांचा कुंभमेळा गोदरी जि.जळगावमध्ये भरत आहे.या मेळाव्याला कुंभमेळा नाव का दिले हे मला काही समजलेले नाही.कुंभमेळा का भरतो हे धार्मिक कथेत सांगितले आहे. कुंभ या शब्दांचा अर्थ द्रवपदार्थ भरण्याचे साधन किंवा मत्सालय असा शब्दकोषात दिसून येतो.चला नावात काय आहे?कुंभमेळा म्हणजे धार्मिक मेळावा असणार नव्हे आहेच. या मेळाविषयी उलट सूलट चर्चा झालेली आहे.चालू आहे. हिंदू धर्मात जातीच्या उतरंडी कधीच फुटणार नाहीत . त्याखाली उतरणार नाहीत. मग आपण जे मेळावा घेत आहोत त्यात जातीयता येणार नाही का ?जातीयता पाळणाऱ्याला यापासून दूर ठेवता येणार नाही का ? हिंदू आणि हिंदूत्व यात फरक करणार नाही का ?

    गोंदरीच्या कुंभमेळ्याला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही.पण गोर समाज हा शोषीक आहे. तो सर्व मानवजात एक आहे असे माणनारा आहे.तो मानवतेचा पाईक आहे. तो मानवतेचा पुजारी आहे. सर्व सजीवसृष्टीसाठी पसायदान मागणारा आपला समाज आहे. तो आतिथीला आदराणे आदरातिथ्य करणारा आहे. आदरातिथ्य करणे तो आपला धर्म मानतो.जात,पात धर्म,वंश या विषयी कधीच भेदभाव न मानणारा तो आहे. बंजारा एखाद्याचे आदरतिथ्य करताना पायात चप्पल, जोडे असल्यास तो पायातून काढून हातपाय धुण्यास पाणी देतो बसायला गोधडी टाकतो पिण्यास पाणी व गुळाचा खडा देवून व दोन्ही हात जोडून रामराम करणारा आहे.

● हे वाचा – संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ

    बंजारा कुंभमेळ्यास कोणाचाच विरोध नाही व असेल तर तो मनातून काढून टाकावा; पण कुंभमेळा घेणाऱ्याना विनंती की बंजारा लोकांना समाजात जातीयतेचे विष पेरणाऱ्या लोकाच्या दावणीला बांधू नये. आपले बंजारा आमदार, खासदार वसाकारणी हे मतलबी आहेत. स्वार्थी आहेत.! स्व:ताच्या हितासाठी, मतासाठी,सत्तेसाठी व स्व:ताच्या भल्यासाठी बंजाराला त्यांनी गृहीत धरलेले आहे. सत्तेसाठी त्यांनी बंजारां लभाना, नायकडा यांना अंधविश्वासाच्या खाईत लोटू नये. जातपात, धर्म, वंशाच्या नावावर द्वेष पसरविणाऱ्याच्या पंगतीला बसवू नये.

    बंजारा समाजाचे जे विव्दान लोक आहेत. जे समाजसुधारक आहेत. जे राजकारणी आहेत. जे धार्मिक महाराज आहेत यांनी धार्मिक चर्चा करण्यापेक्षा बंजारा समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करावी. बंजारा समाजातील जातीयता नष्ट करण्यासाठी ठराव करावा व तो प्रत्यक्षात अमलात आणावा. आपल्यातील आपलेच बांधव ढाडी, ढाल्या, नाव्ही, सोनार, लभाना, नायकडा यांना आपल्यात सामाऊन घ्या. बेटी व्यवहार चालू करा. दूसऱ्या बरोबर जाण्यापेक्षा आपल्या समाजातील उनीवा नष्ट करा.

    आपण ज्या लोकांना निवडून दिलेत तेच मतलबी आहेत आमदार, खासदार तांडया तांडयात एकी ठेवण्यापेक्षा ग्रामपंचायतमध्ये राजकारण करून तांडयात फूट पाडत आहेत. स्वतःच स्वार्थ साधण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या नितीचा वापर करुन समाजाला रसतळाला नेत आहेत. राजकीय नेत्यात एकी असल्याशिवाय विकास शक्य नाही. नाहीतर मग आपण सामान्य पक्षविरहीत एकत्र आल्याशिवाय आपल्याला किंमत नाही.

    गोदरी कुंभमेळ्यात चर्चा व्हावी समाजात ऐकतेची, समाजातीला जातीयता नष्ट करण्याची, समाजाची शैक्षणिक स्थितीची, नेते कोणत्याही पक्षाचा असो ते समाजातील प्रश्नासाठी एक व्हावे, त्यात एकी रहावी. समाजातील अंधश्रध्दा कमी करण्यासाठी, समाजातील तरुण नशापासून दूर राहिल यासाठी प्रयत्न व्हावे.धार्मिक गोष्टीने पोट भरणार नाही. त्यामुळे डोकी भडकतील.

    समाजाची प्रगती साधायची असेल तर केवळ आठरा कोटी विस कोटी बंजारा आहेत म्हणून चालणार नाही. त्यांना पक्षीय राजकारण करुन कधीच आपण एकत्र आणू शकत नाही. आपण सगळे एकमताने एकदिलाने फक्त बंजारासाठी लढणारा नेता निवडला पाहिजे. सर्व बंजारा पांढऱ्या झेंडयाखाली पक्षीय राजकारण बाजूला सारून एकत्र आले पाहिजे.राजकारण करुन समाजात फुट पाडून आपण आपली प्रगती कधीच करु शकणार नाही.

    गोदरीचा कुंभमेळा केवळ धार्मिक उत्सव न रहाता तो सामाजिक उत्सव व्हावा.समाज उन्नतीसाठी व्हावा.समाजात एकता निर्माण करण्यासाठी व्हावा. समाजातील जातीयतेचा अंतकरण्यासाठी व्हावा. यासाठी कुंभमेळा व्हावा . शेवटी येवढचं म्हणेन ” किडी मुंगीन साई वेस .सारी जगे रो भलोकरेस व जगेबरोबर हमारोबी भलोकरेस बापू महाराज. गोदरी कुंभमेळा यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा..!

    राठोड मोतीराम रुपसिंग
    नांदेड -६
    ९९२२६५२४०७
    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

Leave a comment