प्रेम म्हणजे नेमकं काय..?

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

    प्रेमाची संकल्पनाच खूप व्यापक आहे. ती कुठल्याच मापदंडात मोजता येत नाही.आपण कुणावर किती प्रेम करतो हे कुठल्याच तराजूत तोलता येत नाही.. प्रेम हा शब्द बोलून प्रेमाचा सुगधं दरवळत नाही, प्रेम हा शब्द हृदयात साठवून मुक्त हस्ते निखळ भावनेने, खळखळणाऱ्या झऱ्याप्रमाणे, शुभ्र फेसाळ धबधब्याप्रमाणे निस्वार्थ कोसळणारा असावा. प्रेम हे शीतल गारव्यासारखे वणव्यात ही मनाचा दाह कमी करणारे असावे! ठेच लागलेल्या पायाला सावरणारे असावे, चिघळलेल्या जखमांवर हळुवार आधाराची फुंकर घालणारे डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी धडपडणारे असावे… प्रेम हे जगायला शिकवते; पण त्यासाठी अपेक्षा विरहित प्रेम असावे! म्हणजे जगता आणि जागविता दोन्ही गोष्टी साध्य होतात. आपण निस्वार्थ भावनेने प्रेमाचे रंग आपल्या हृदयात भरले आणि त्या स्नेहमयी रंगाने कुणाच्या तरी आयुष्याचे चित्र आनंदाने रंगवता आले तर नक्कीच प्रेम या शब्दाचा अर्थ कळेल…आणि नैराश्य पदरी पडणार नाही.

    प्रेम फक्त एकाच व्यक्तीवर केल्या जात नाही, आपल्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर आपण प्रेमच करत असतो. अनेक नात्यात गुंफलेली ऋणानुबंधाची गाठ असते..स्त्रीपुरुष भिन्नलिंगी प्रेम म्हणजेच प्रेम नाही, तर आईवडील यांच्यावर असणार निस्सीम प्रेम…आईबापाच आपल्यावर असणार निखळ प्रेम, याची तुलना कुणाच्या प्रेमाशी करता येत नाही, ते निरंतर चिरकाल टिकणार अपेक्षा विरहित प्रेम असतं…जणू दुधावरची साय असतं. वटवृक्षाच्या सावली प्रमाणे मनाला गारवा देत…त्या खांद्याचा आधार दुःखाच्या शिखरीही मनाला उब देते…भाऊ बहीण यांचे प्रेम झऱ्यासारखे खळखळ आणि निखळ असते…मनात आनंद पेरणारे सुखदुःखात साथ देणारे…एकमेकांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारे.. जगण्याला आधार देणारे..जिव्हाळ्याचे नाते असते… हे प्रेम म्हणजे फक्त भावनेशी जुडलेलं नसतं तर ते ह्रदयाच्या कोंदणात ठसलेले, प्रत्येक क्षणी सोबत असणारे, हक्काचे नाते असते.

    आपल्याशी जुडलेले, आपल्या सहवासात येणारे, मनाचा मनातून संवाद साधणारे प्रत्येक नातेबंध हे प्रेमानीच बहरते फुलते.एक दाणा जर आपण मातीत टाकला तर ती हजार दाण्याने आपली ओंजळ भरते.. म्हणून म्हंटले जाते प्रेम हे देण्यात आहे घेण्यात नाही…आपण निसर्गावर सुद्धा भरभरून प्रेम करतो. प्रत्येक प्राणिमात्रावर आपण प्रेम करतो. कारण ती भावना आपल्या मनात निर्माण होते.. प्रेम ही एक भावना आहे.कधी कधी एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे ही भावना निर्माण होते, पण नेमकं ते प्रेम असतं किव्हा नसतं हे आपल्याला कळत नाही.. एखाद्या व्यक्तीबद्दल असलेलं आकर्षण याला आपण सरळ प्रेमाची उपमा देऊन मोकळे होतो.आणि त्या व्यक्तीने नाही म्हंटले की लगेच द्वेषभाव निर्माण होतो.कुठेतरी इगो हर्ट होतो आणि त्या व्यक्तीला संपविण्याचा प्रयत्न करतो. हृदयातील प्रेमभावना संपून तिरस्काराची भावना निर्माण होते… “मग हे कुठले प्रेम”? उथळ पाण्याचा तळ कधीही ओलावा संपून कोरडा होते, त्यातील झिरपणारे थेंब खोलवर रुजलेले नसतात. आणि जे खोलवर रुजलेच नाही. ती माती तर कोरडी होणारच. तशीच या उथळ प्रेमाची संज्ञा आहे. जेवढा खळखळाट जास्त असतो तेवढाच संपृष्टीचा ऋतुही त्याच्या वाट्याला त्याच वेगाने येतो.

    “गरज आणि प्रेम याचे समीकरण कधीही जमत नाही..” प्रेमासाठी जगणे, भावना जिवंत ठेवणे. यातच प्रेमाचा खरा आनंद अनुभवता येतो. त्यासाठी आणाभाका, वचनांची काहीही गरज नाही.. अपेक्षांचा धागा हा कच्चा असतो. भाव निस्सीम असेल तर नाते घट्ट होत जाते.. एकाला झालेली वेदना जर दुसऱ्याला डोळ्यांनी टिपता आली तर प्रेमाच्या जवळ असल्याचा आनंद मिळतो. वासनेचा लवलेश नसेल तर नाते चिरंतर, चिरकाल टिकणारे असते; पण आपण इतर सर्व नाते विसरून प्रेमाचे वासनेशी नाते जोडतो.. प्रेमाचा अनादर करतो. इथेच विरह, वेदना, नैराश्य येवून आपण स्वतःला दुःखाच्या अधीन करतो!

    दुसऱ्यावर प्रेम करण्याआधी प्रथम स्वतःवर प्रेम करावे म्हणजे दुसऱ्यावर करता येईल.मी ज्या व्यक्तीवर प्रेम करतोय त्या व्यक्तिशिवाय जगू शकत नाही म्हणून प्रेमवीर आत्महत्या करतात. “याला खरच प्रेम म्हणावं का”? नाही म्हणता येणार कारण ते त्यांनी मनात निर्माण केलेला ग्रह असतो.आपल्या जन्मदात्या आईवडिलाशिवाय आपण जगू शकतो मग प्रेयसी शिवाय का नाही?

    चित्रपटामध्ये कथा कादंबरी मध्ये जे प्रेम आपण वाचतो बघतो ते लोकांच्या डोक्यात स्थान मांडून असते…आणि या सर्व गोष्टी मुलांच्या मनःस्थितीवर परिणाम करतात…आणि त्यातूनच आत्महत्या करणे , कुणाच्या अंगावर ऍसिड फेकून चेहरा विद्रुप करणे..अशा टोकाच्या भूमिका घेतांना दिसतात, प्रेमाचा खरा अर्थ काय हेच त्यांना कळत नाही…प्रेम ही एक नैसर्गिक भावना आहे ती ठरवून होत नाही.. त्या भावनेला जपा आणि जगा…

    ‘गरज म्हणून जोडलेलं नातं कधीच टिकत नाही,
    मनापासून गुंफलेलं नातं कधीच तुटत नाही,
    “खऱ्या प्रेमाचा गहन अर्थ
    जेव्हा कळेल पापण्यांना
    हृदयी वेदना कुरवाळतांना
    तळ गाठता येईल भावनांना..”
    -सौ निशा खापरे
    नागपूर
    7057075745
    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

Leave a comment