प्राक्तन

दोन दिवस लेकराचा ताप उतरेल म्हणून तिने वाट पाहिली. पण ताप काही केल्या हटत नव्हता. तेव्हा तिने कामावरून परतताच बाळाला पदराआड गुंडाळले आणि गाडीतळावर जाऊन उभी राहिली. कुणाची बैलगाडी तरी मिळेल या आशेवर होती ती! पण तिचे दुर्दैव की कोणाचीही बैलगाडी आली नाही. पदराखाली गुंडाळलेले लेकरू तापाच्या भरात बरळू लागले तसे सगुणाने चालत दवाखाना गाठण्याचे ठरविले नि ती झपझप चालू लागली. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. अंधार मी म्हणत होता. पण बाळाच्या स्वास्थ्यापायी तिला कशाची तमा नव्हती. निर्भय बनून सगुणा रस्ता कापत होती. दिवसभर तिच्या पोटात अन्नाचा एकही कण गेला नव्हता. बाळाच्या काळजीने तिने दुपारचा डबाही खाल्ला नव्हता. मालकाकडून तिने थोडीशी उचल आणली होती. पण ते पैसे देताना मालकाने तिच्या चार पिढ्यांचा उद्धार केला होता पण आज सर्व ऐकून घेण्यावाचून तिच्याकडे पर्यायही नव्हता. बाळाच्या तापाने फणफणलेला चेहरा दिवसभर डोळ्यांसमोर येत होता. आता त्याला डॉक्टरांकडे नेले नाही तर दुखणे वाढणार होते. तेवढ्यात सीताने ,तिच्या मुलीने कामावर येऊन बाळ तापात बरळत असल्याचे सांगितले होते .तशी ती तडक घरी गेली होती. त्या छोट्याशा गावात डॉक्टर नसल्याने तिला तालुक्याच्या गावी जायचे होते. मोटारस्टॅंडवर शेवटची गाडी निघून गेल्याचे कळताच ती झपझप पावले टाकू लागली.
बाळ तापाने फणफणले असल्याने तिच्या अंगाला चटके बसत होते.तिच्या पायांना जणू काही चाके लागली होती. लेकराच्या काळजीपोटी एवढा अंधार असूनही ती तशीच चालत होती. रस्ता निर्मनुष्य होता. ती स्वतःलाच दिलासा देत डोळ्यांच्या दिव्यांच्या प्रकाशात अंदाजाने रस्ता तुडवत होती.
पण आता तिचा त्रास संपणार होता. तिच्यासमोरच रस्त्यावरील आणि शहरातील विजेचे दिवे दिसत होते.आता दहा मिनिटात ती दवाखान्यात पोचणार होती. तिने चालण्याचा वेग वाढवला आणि दवाखाना गाठला. केस पेपर काढून ती आपला नंबर येण्याची वाट पाहत बसली. दहा मिनिटात तिने काउंटरवाल्या मॅडमला दहा वेळा विचारलं, “कधी येणार माझा नंबर?” हात जोडून डॉक्टरांकडे लवकर पाठवण्यासाठी विनवत होती. पण “रोज मरे त्याला कोण रडे”. मॅडमला असल्या रोजच्या पेशंटची सवय झाली होती. तिने दुर्लक्ष करून खेकसायला सुरुवात केली, ” बाई, इथे येणारे सगळेच पेशंट असतात. तुम्हाला आधी असे कसे सोडणार ?तुमचा नंबर येईल तेव्हा सोडेन. गप्प जागेवर बसून रहा”. सगुणाला एक क्षण देखील युगाप्रमाणे भासत होता.
अखेर सगुणाचे नाव पुकारले जाताच ती तीरासारखी आत घुसली. जसे काही तिच्या नंबरवर दुसरेच कोणीतरी जाईल. एका ढांगेतच ती डॉक्टरांसमोर पोहोचली. डॉक्टरनी बाळाला तपासले नि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. बाळाचा ताप इतका वाढला होता की थोड्या उशिराने ती पोचली असती तर बाळाचा मृत्यू होण्याचा संभव होता. त्यांनी नर्सला बोलून ताबडतोब उपचार चालू केले. सगुणा आता बाळाच्या जीवितासाठी परमेश्वराचा धावा करु लागली. देवाला विनवू लागली,”हे विधात्या माझ्या बाळाला माझे आयुष्य लाभू दे. तुझ्यापुढे एक लाचार आई पदर पसरतेय. माझ्या बाळाला बरे कर”. आणि…….. विधात्याने तिचे गाऱ्हाणे खरेच ऐकले. हळूहळू बाळाचा ताप उतरला. डॉक्टरही हैराण झाले. त्यांना वाटले जणू काही बाळाचा पुनर्जन्मच झाला.
बाळही मूठी चोखत कॉटवर शांतपणे पहुडले होते. सगुणाने डॉक्टरांचे पाय धरले. तसे डॉक्टरांनी तिला उठवले. आणि म्हटले,” बाई, तुमची प्रार्थना फळाला आली नाहीतर आज बाळ वाचणे कठीण होते”. सगुणाने डॉक्टरांचे आणि परमात्म्याचे मनोमन आभार मानले. डॉक्टरांची फी देऊन सगुणा घरी जाण्यासाठी वळली. आता तिला घरात ठेवलेल्या दोन्ही लेकरांची काळजी वाटू लागली. इतक्यात डॉक्टरांचे लक्ष सगुणाच्या पायांकडे गेले. बाळाच्या दुखण्यामुळे सगुणा पादत्राण न घालताच चालत येथे आली होती. रस्त्याने पळताना रस्त्यातील काटे-कुटे नी दगडी पायात घुसून तिचे पाय रक्तबंबाळ झाले होते. डॉक्टरांनी तिची चौकशी केली. तिने संध्याकाळपासूनची इत्थंबूत माहिती डॉक्टरांना सांगितली. तिच्या एवढ्या खडतर आयुष्याची नि बाळाच्या काळजीबद्दल डॉक्टरही थक्क झाले. त्यांनी तिच्याकडून घेतलेले फीचे पैसे तिला परत केले. कंपाउंडरला बोलवून तिच्या रक्ताळलेल्या पायांवर औषधोपचार करायला सांगितले. सगुणाला गहिवरून आले होते. डॉक्टरांनी सगुणातल्या मातेला अक्षरश: सलाम ठोकला.
डॉक्टर उद्गारले,” धन्य ती माता! धन्य ते बाळ ! ज्याने अशा आदर्श मातेच्या पोटी जन्म घेतला. आईच्या प्रेमाला कशाचीच उपमा नसते हे तू आज सिद्ध करून दाखवलेस”. सगुना देखील भारावून गेली होती. आज तिला माणसातल्या परमेश्वराचे दर्शन घडले होते. आजही समाजात आपल्या नवऱ्यासारखे दानव असतात जे आपल्या माणसांचे शोषण करतात आणि डॉक्टरां सारखे देव असतात.जे आपले सगेसोयरे नसूनही भूतदया दाखवतात ,माणुसकीचे दर्शन घडवतात.

    सौ.भारती सावंत
    मुंबई
    9653445835

Leave a comment