डॉ.प्रतिभा जाधव या लेखिकेचे नाव महाराष्ट्राला एव्हाना चांगलेच परिचित झालेले आहे. नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावसारख्या ग्रामीण भागात वरिष्ठ महाविद्यालयात त्या प्राध्यापिका आहेत. नोकरीच्या निमित्ताने त्या छोट्याशा खेड्यात सध्या वास्तव्यास असल्या तरी त्यांची ख्याती महाराष्ट्रात सर्वदूर आहे॰ कविसंमेलने, एकपात्री प्रयोग, बोधपर व्याख्याने, साहित्य संमेलने, वृत्तपत्र स्तंभलेखन अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.
पुणे येथील संवेदना प्रकाशनाने त्यांच्या दैनिक सकाळमध्ये प्रकाशित लेखांचा एकत्रित संग्रह ‘अस्वस्थतेची डायरी’ या नावाने प्रकाशित केला आहे. ‘अस्वस्थतेची डायरी’ च्या रूपात डॉ.प्रतिभा जाधव यांच्या वाचक वर्गाला एक अतिशय उच्च दर्जाचे वाचन मूल्य असणारे पुस्तक हाती दिले आहे असे मी म्हणेन. आजकाल अनेक पुस्तके अक्षरश: मिनिटात चाळून दूर ठेवली जातात; कारण वरवर चाळले तरी पुस्तकाचा अंदाज येत असतो. परंतु या डॉ.प्रतिभा जाधव लिखित ‘अस्वस्थतेच्या डायरी’चे मात्र तसे होत नाही. ह्या पुस्तकातील सर्व लेख वाचल्यावर खरोखरीच मन कातर होते, अस्वस्थ होते, विचारप्रवृत्त होते. अनेक अनुत्तरित प्रश्नांचा भडिमार आपल्यावर होत राहातो. डॉ.प्रतिभा जाधव यांच्या लिखाणातील ही ताकद आहे. स्त्री, वंचित, अत्याचारित, दारिद्रयाचे केविलवाणे जिणे वाट्याला आलेल्या व्यक्ती व त्यांच्या प्रश्नांभोवती त्यांचे लेखन फिरत राहते.
खूप वेळा त्यांचे लेख स्त्रीच्या आयुष्याचे अनेक तरल पदर उलगडून दाखवतात. त्यांच्या ‘अस्वस्थतेची डायरी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठही अत्यंत बोलके आहे. आतील प्रत्येक लेख खरंच आपल्याला अस्वस्थ करून सोडतो. लेखिका आत्मीयतेने नाकारलेल्या-परिघाबाहेरील वर्गाचे दु:ख, वेदना, प्रश्न नेमकेपणाने वैचारिक तथा ललित लेखांच्या निमित्ताने जगापुढे मांडतात. त्यामागे असलेली त्यांची सहवेदना, तळमळ काळजाला वाचकांच्या सहजी हात घातल्याशिवाय राहात नाही. अतिशय उत्कट व भावनाशील प्रश्न विचारणारे लेखन या ‘अस्वस्थतेची डायरी’मध्ये आहे. वैचारिक तरीही ललित लेखनाची मोट डॉ. जाधव यांनी अतिशय उत्कृष्टपणे बांधली आहे. ‘माणूसपण जपणारी आसवं!’ या लेखातून आसवांचे महत्त्व विशद करतात. रडणे म्हणजे तुमच्यात संवेदनशीलता शिल्लक असणे, जिवंत असणे होय. ह्या संवेदनशीलतेचे प्रमाण किंवा पुरावा म्हणजे ही मानवी आसवं होत॰ त्यांच्या अनेक लेखांचे शीर्षक मानवी जीवनातील बोचरे प्रश्न वाचकांपुढे उपस्थित करतात. त्या प्रश्नांची प्रत्येकाने आपापल्यापरीने उकल करावी असे त्यांना सुचवायचे आहे. ‘हे जग सुंदर आहे!’ या लेखात जागल्याची भूमिका प्रामाणिकपणे निभावणार्यांची वानवा आहे असे त्या म्हणतात. प्रलोभनांना बळी न पडता, तत्वांशी तडजोड न करता आपले काम अतिशय प्रामाणिकपणे करणे किती तरी कठीण आहे परंतु अशा व्यक्तींची समाजाला गरज आहे हे आपल्या लेखनातून त्या अधोरेखित करतात. प्रामाणिकपणा तत्त्वनिष्ठता ठेवली तर हे जग सुंदर करता येते असे त्या ठामपणे सांगतात. ‘सावित्री तू होतीस म्हणूनच…!’ हा तर त्यांच्या व्याख्यानाचा लाडका विषय. ‘सावित्रीमाईला तिच्या लेकीने लिहिलेले पत्र!’ या लेखामध्ये ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांनी अत्यंट विपरीत परिस्थितीशी झगडून स्त्रीशिक्षणाचा पाया ज्या भिडेवाड्यात घातला. त्याच्या दुरावस्थेची हळवं आणि उद्विग्न करणारी भावना त्या पत्ररूपात लिहितात ते वाचताना डोळे आपसूक पाणावतात. ‘बाप मोठ्ठं पुस्तक असतं…’ या लेखातुन लेखिका स्वतःचा लेखनप्रवास उलगडते. त्यांच्या जडणघडणीत त्यांच्या वडिलांचे योगदान त्या कृतज्ञतेने मांडतात. साधारणपणे विविध प्रश्नांना हाताळणारे ६० लेख सदर पुस्तकात आहेत.
शिक्षणव्यवस्थेवर लिहिलेले लेख नुसते बोचकारे घेणारे नाहीत तर त्यात आहे एक हताश भय आणि ह्या भयाचा कडेलोट झाल्यावर येणारा एक तार्किक , निर्भय संताप. स्त्रीवर होणारे अत्याचार, स्त्रीच्या भावनांचा न होणारा विचार. पुरुषप्रधान संस्कृती या गोष्टींवर लेखिका शाब्दिक आसूड ओढते. त्यांच्या लेखात लालित्य तर आहेच तरीही त्यात तर्कशुद्ध वैचारिक मांडणी दिसून येते. अनेक लेख वाचताना अक्षरशः डोळ्यात आसवे उभी राहतात, मन विदीर्ण होते. त्यांच्या अनेक लेखांमध्ये त्यांची प्रगल्भ वैचारिक बैठक जाणवते. त्यांचे विचार एकांगी मुळीच नाहीत, चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणण्याचा विवेक त्यांच्याकडे आहे. त्यांच्या लेखनात अवास्तव कल्पनारम्यता नसून पूर्णतः वस्तुनिष्ठ मांडणी जाणवते. ही डायरी वाचकांना सजग व डोळस करते.
आईवडिलांबद्दल प्रचंड आदर, त्यांनी नकळत केलेले संस्कार, त्यांचे स्वभाव याबाबत लेखिकेने खूप सुंदर विवेचन केले आहे. एकंदरीतच त्यांची स्वतःची जडणघडण, अनुभवलेली चांगल्या-वाईट विचारांची माणसं, स्त्री-पुरुष भेद, जात-धर्म विषमता, रूढी-परंपरा, अंधश्रद्धा, आयुष्य सुंदर बनवणारे अनेक अनुभव या सर्व गोष्टींचे अतिशय उत्कट असे चित्रण असलेली अस्वस्थ करणारी अशी ही ‘अस्वस्थतेची डायरी’ आहे . वाचकांनी जरूर हे पुस्तक संग्रही ठेवावे असे झाले आहे.
- समीक्षक -डॉ. राजीव सप्रे (रत्नागिरी)
- संख्याशास्त्र विभागप्रमुख, गोगटे-जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालय,रत्नागिरी
- पुस्तक परिचय
- लेखिका- डॉ. प्रतिभा जाधव
- पुस्तकाचे नाव -अस्वस्थतेची डायरी (वैचारिक लेखसंग्रह)
- प्रकाशक- संवेदना प्रकाशन, पुणे
- प्रथम आवृत्ती ,१२ फेब्रुवारी २०२०
- एकूण पृष्ठे- १८४
- किमत २५० रु.