शारीरिक स्वच्छतेमध्ये दुर्लक्षित राहणारा घटक म्हणजे पाय. बरेचदा पायांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होतं. परिणाम पायाचा तळपाय, गुडघे, घोटे, टाचा असा भाग काळा दिसू लागतो. तिथे घट्टे पडू लागतात. पायांच्या या काळ्या पडणार्या भागांची स्वच्छता करणं बरचं कठीण असतं. पण याकामी येणारा एक घटक म्हणजे बेकिंग सोडा. क्षारीय गुणधर्मांमुळे त्वचेच्या स्वच्छतेसाठी याचा मोलाचा उपयोग होतो. तळपायांवर बेकिंग सोड्याने स्क्रब केल्यास अथवा बेकिंग सोड्याची पेस्ट तळपायावर लावल्यास टॅनिंग, पादत्राणांचे व्रण, काळसर डाग निघून जातात आणि त्वचा मऊमुलायम होते. बेकिंग सोड्यामुळे मृत त्वचा दूर होते. सहाजिकच त्वचेतील अशुद्ध तत्त्वं नाहिशी झाल्यामुळे त्वचा कोमल आणि तेजस्वी होते. बेकिंग सोडा, ओटमील आणि खोबरेल तेल ही सामग्री सम प्रमाणात एकत्र करुन तयार होणारी पेस्ट भेगाळलेल्या टाचांवर लावा. दहा मिनिटांनंतर ब्रशने स्क्रब करुन पाय धुवा. या उपायाने टाचांच्या भेगा कमी होतात, टाचा मऊ-मुलायम आणि गुलाबीसर दिसतात. या लेपाने पायांची दुर्गंधीही नाहीशी होते.