नेत्रदान पंधरवडा विशेष लेख
परिवार व स्वास्थ कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे गेल्या 22 वर्षांपासून 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा म्हणून राबविला जात आहे यानिमित्त हा विशेष लेख.
भारतीय संस्कृतीत दानास खूप महत्व आहे. दानास अध्यात्माची, धर्माची, प्रतिष्ठेची जोड दिल्याने अन्नदान, गोदान, धनदान करण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. अवयव रोपणाची कल्पना प्रत्यक्ष आणण्यास 16 व्या शतकात इ.स. 1668 मध्ये मिनरल या तज्ज्ञाने कुत्र्याच्या हाडाचे रोपण मानवाच्या कवटीवर केले होते. इ.स. 1900-1920 या काळात याबाबत भरपूर प्रयत्न झाले, यातूनच नेत्ररोपणाची अभिनव कल्पना जन्माला आली. इ.स. 1906 मध्ये मिर्झा या नेत्रतज्ज्ञाने नेत्ररोपणाची पहिली शस्त्रक्रिया केली. मात्र यशस्वी नेत्रतज्ज्ञाने नेत्ररोपणाची पहिली शस्त्रक्रिया केली. मात्र यशस्वी नेत्ररोपणाचे श्रेय डॉ. मॅक्स फाईन व डॉ. कस्ट्राव्हेजो (1950) यांना जाते. यापुढे अनेक बदल वैद्यक क्षेत्रात झाले.
भारतात जवळपास 1 कोटी 40 लाख व्यक्ती अंध असून त्यातील 40 लाख लोकांना दृष्टी येऊ शकते. जगाचा विचार केला तर 3 कोटी 70 लाख व्यक्ती अंध असून 1 कोटी लोकांना नेत्ररोपणाची गरज आहे. त्याकरिता कृत्रिम नेत्रदान करणार्यांची संख्या नगण्य असल्याने अशा अंधांना दृष्टी मिळवून देणे अशक्य होऊन बसले आहे.
नेत्रदान हे जीवंतपणी नव्हे तर मरणोत्तर करावयाचे असते. काही सुशिक्षितांचा तसा गैरसमज असतो. काही अंध व्यक्ती जीवंतपणी नेत्रदान करु शकतात. ज्यांची पटले उत्तम स्थितीत आहेत, परंतु उर्वरित डोळा पूर्णपणे निकामी असल्याने ज्यांना कुठलाही उपाय न चालणारे अंधत्व आल्याने अशा व्यक्ती जीवंतपणीही पटल दान करुन अमूल्य दृष्टीदान करु शकतात. भारतात होणार्या नेत्ररोपणासाठी श्रीलंकेसारख्या छोट्याशा शेजारी राष्ट्राकडून बहुसंख्य नेत्र आलेले असतात. जागतिक पातळीवर भारतात असलेल्या अंध बांधवांची संख्या लक्षात घेतली, तर नेत्रदान ही बाब देशव्यापी चळवळ म्हणून राबविली पाहिजे.
नेत्रदानाच्या जागृतीची आवश्यकता ओळखून दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींनी 1985 मध्ये पंधरवड्याची सुरुवात केली होती. नेत्रदानाची जागृती केल्यास मृत व्यक्तीचे नेत्र ज्यांचे पटल खराब आहेत, अशा अंध व्यक्तीला मिळवून त्याचे अंधत्व दूर होऊ शकेल. भारतात सुमारे दीड कोटी दृष्टीहीन लोक आहेत. त्यापैकी सुमारे 46 लाख लोकांचे अंधत्व पटल बदलल्याने दूर होऊ शकणारे आहे.
मृत्यूनंतरही जग पाहत राहणे, हे नेत्रदानाने शक्य आहे. आधुनिक काळात अमरत्वाचे एकमेव साधन म्हणजे दृष्टीदान होय. आज देशपातळीवर नेत्रदात्यांची संख्या वाढवून निशुल्क नेत्रदानाचा मानवतावादी दृष्टीकोन स्वीकारणे आवश्यक आहे. मृत्यू अटळ आहे. मृत्यूनंतर मानवी प्रेताला जमिनीत पुरले जाते किँवा अग्नि दिला जातो. अमूल्य मानवी देह अशाप्रकारे नष्ट केला जातो. नष्ट केला जाणारा प्रत्येक अवयव गरजूच्या गरजा अवयव रोपणाने भागू शकतात. मृत्यू आल्यानंतर देह नष्ट करताना अत्यंत मौल्यवान असे नेत्र ही नष्ट केले जातात. ज्या अंधांनी जग पाहिले नाही, त्यांना सुंदर जग पाहता येऊ शकते. ज्यांच्या जीवनात अंधाराशिवाय काही नाही अशांचे जीवन नेत्रदानाच्या बाबतीत पिछाडीवर आहोत, खरंच नेत्रदान ही एक काळाची गरज बनली आहे.
कोण करू शकतो नेत्रदान
मृत्यूनंतर सहा महिन्याच्या बालकापासून वृद्धालाही नेत्रदान करता येतो.
नेत्रदान म्हणजे आपले डोळे गरजू अंध व्यक्तींना दृष्टी येण्यासाठी दान देणे होय.
यात दान केलेल्या दात्यांच्या डोळ्यांच्या केवळ बुबुळांचे रोपन केले जाते.
स्त्री, पुरुष, वंश, जाती, धर्म हा भेद मानला जात नाही.
कोणत्याही वयोगटाच्या व्यक्तीस नेत्रदान करता येते.
मोतीबिंदू काढलेल्या व्यक्तीचे डोळेदेखील नेत्रदानासाठी उपयोगात येऊ शकतात.
दृष्टीदोष घालविण्यासाठी चष्मा लावणारी व्यक्ती देखील नेत्रदान करु शकते.
परंतु विषबाधेमुळे किँवा पाण्यात बुडून मृत असलेले तसेच धनुर्वात, रेबिज, इन्फेक्टीव हिपॅटायटीस, इनक्यापॅटीस, सेप्टेसिनिया, सिकोरिस इत्यादी व्याधींमुळे डोळ्यावर गंभीर परिणाम झालेली व्यक्ती नेत्रदान करु शकत नाही.
याशिवाय मधुमेह, कुष्ठरोग, ट्युबरकोलिस इत्यादी व्याधीग्रस्त नेत्रदानास अपवाद ठरतात.
मोतीबिंदू काचबिंदू असलेल्या व शस्त्रक्रिया झालेल्या तसेच चष्मा असलेल्या व्यक्ती नेत्रदान करु शकतात.
कावीळ, कर्करोग, एड्स अशा आजाराच्या रुग्णांनाही नेत्रदान करता येते.
संशोधनासाठी असे नेत्र वापरले जातात. मृत्यूनंतरच नेत्रदान करता येते.
नेत्रदान असे करावे
मानवसेवेचे हे पवित्र व महान कार्य नेत्रपेढीत इच्छापत्र भरुन संकल्पाद्वारे करता येते.
यासाठी नेत्रदानाचा संकल्प करार करुन कुणीही नेत्रदान करु शकतात.
मरणोत्तर नेत्रदानाचे ठराविक नमुन्यातील इच्छापत्र आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या समक्ष भरुन दिल्यावर नेत्रदात्यास एक डोनर कार्ड दिले जाते.
पती-पत्नी, मुले-मुली आणि परिवारातील सर्वांना याची कल्पना द्यावी.
नेत्रदात्यास जेव्हा केव्हा मुत्यू येईल तेव्हा अविलंब नेत्रपेढीस किँवा प्रत्यक्ष नेत्रपेढीला जाऊन कळविणे आवश्यक असते.
डॉक्टर येण्यापूर्वी मृत्यूचे प्रमाणपत्र उपलब्ध करुन द्यावे.
नेत्रदात्याच्या मृत्यूनंतर घ्यावयाची काळजी
नेत्रदाता मृत्यू पावल्यानंतर मृतदेह ज्याठिकाणी असेल तेथील पंखे बंद करावेत.
जेणे करुन मृतकाचे डोळे कोरडे पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
खोलीत ए.सी. असल्यास सुरु ठेवावा.
डोक्याखाली उशी ठेवावी.
डोळ्यात टाकावयाचे एन्टीबॉयोटिक्स ड्राप्स टाकून उघडे पडलेले डोळे बंद करावे.
डोळ्यावर स्वच्छ कापडाच्या पट्ट्या ठेवाव्या.
नेत्रदात्याच्या संकल्पपूर्तीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी ठराविक वेळेपूर्वी डोळे काढून घेणे आणि नेत्रपेढीत जमा करणे आवश्यक असते.
डोळ्यांचे बुबुळ दोन ते चार तासापूर्वी उन्हाळ्यात आणि सहा ते आठ तासापूर्वी हिवाळ्यात काढणे आवश्यक असते.
तसेच डोळ्यांना थंड पाण्याने थंड ठेवावे.
डॉक्टरांनी डोळे काढून घेतल्यानंतर मृतदेहास कसलाही व्यंग येत नाही.
डोळ्यामध्ये कापसाचे बोळे घालून त्यावर तीन चार टाके घालून मृतदेह अंत्यदर्शनासाठी नातेवाईकांसमोर ठेवता येतो.
नेत्रदान करणार्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला आवश्यक आहे.
नेत्रदानात देशात महाराष्ट्र तिसर्या स्थानावर आहे. राज्यात यंदा सहा हजार 600 नेत्रांचे लक्ष्य होते त्यातील चार हजार 449 नेत्र संकलित झाले. देशात गुजरात, आंध्रप्रदेश नेत्रदानात आघाडीवर आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्र मागे पडल्याचे दिसते. 2007 ते 2012 या काळात राज्यात निश्चित केलेले नेत्रदानाचे लक्ष्य गाठता आले नाही.
लेसर उपचाराचा वापर
पूर्वी नेत्ररोपणासाठी रुग्णाच्या डोळ्यातील बुबुळ पूर्ण काढावे लागत असे. बुबुळ काढण्यासाठी पूर्वी ब्लेडचा वापर केला जात असे. अलीकडे आलेल्या पेनेटेरटिंग केरॅटोप्लास्टी या पद्धतीत ब्लेडऐवजी लेसरचा वापर केला जातो. 2-3 टाक्यांमध्ये ही शस्त्रक्रिया होते. ही पद्धत अधिक सुरक्षित मानली जाते. या दोन्ही पद्धती पुण्यात वापरल्या जात असल्याचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजीकडून सांगितले.