“जगण्याचा शोध घेत असतांना आपल्या मातीतल्या माणसांच्या वाट्याला येणारे जीवन, त्यांच्या पडझडीच्या काळातील जगणं हे अक्षय टेमकर यांच्या ‘गाडा’ मधील कथांचे सूत्र आहे, गाभा आहे.” आपण ज्या मातीत जन्माला आलो वाढलो,खेळलो, तेथील माणसातील सुख-दु:खात कधी कधी वाटेकरी झालो त्यांचे ऋण फेडण्याचे महत्वाचे कार्य हा कथासंग्रह करतोय. ग्रामीण जीवनाचे अतिशय मनोवेधक चित्रण करण्यात लेखक यशस्वी झाला आहे. एकाच गावातील वेगवेगळ्या माणसांचे जीवन जगण्यातील कंगोरे मांडत मानवी स्वभावाचे चित्रण व त्यातून होणारे व्यक्तीच्या जीवनातील बदल टिपण्यात अक्षय यशस्वी झाला आहे.
एकाच गावातील वेगवेगळी पात्रे रेखाटतांना कोठेही पुनरावृत्ती होत नाही. नेमक्या शब्दांत पात्राच्या मनातील भावभावना, त्यातील चढउतार व मानसिक ताणतणावातील बारीक सारीक प्रसंग व विचारांनी ग्रासलेले थैमान लेखक समर्पक शब्दांत मांडतांना सर्वच कथांची जन्मभूमी व कर्मभूमी एकच असूनही त्यांची कथाबीजे एकमेकांत न मिसळता ते वेगळेपण रेखाटण्यात, जपण्यात अक्षय यशस्वी झाला आहे.
कथा वाचतांना वाचक कथा पूर्ण करुनच ऊठतो. कथा कुठेच रेंगाळत नाहीत की कंटाळवाण्या होत नाहीत. गावात मोकळं ढाकळं जगणारी माणसं, हात पसरून आभाळाकडं बघत वावरातून बेभानपणे धावणारी माणसं, शेणामातीच्या घरात आपुलकीनं नाती जपणा-यांचे हे जीवनविषयक अनुभव अक्षयच्या मनाला भिडणारे अनेक बरे वाईट प्रसंग हे सारे वाचतांना आपणही साक्षी होऊन जातो. यातील प्रत्येक कथा जीवंत होऊन आपणापुढे येत राहते..’गाडा’ या कथासंग्राहात एकूण चौदा कथा असून तेरा कथा पुरुषकेंद्रित आहेत तर ‘यडी संगी’ ही एकच कथा स्त्रीकेंद्रित कथा आहे .पण प्रत्येक कथेतील प्रसंग, त्यांची मांडणी, आरंभ, मध्य व शेवट रेखाटण्यात कथाकार कोठेच कमी पडत नाही. शिवाय या कथा वाचतांना कथेतील पात्रे ही आपल्या आयुष्यात भेटली आहेत व समाजात अशी माणसे आहेत. फक्त आपल्या शोधक नजरेने टिपणे महत्वाचे आहे. इथे लेखकाने तेच केले आहे.
कथेची भाषा ओघवती असून सहज समजेल अशी, ग्रामीण लहेजा असलेली आहे. निवेदन पध्दतीच्या कथनामुळे कथा सरस व वाचनीय होते, त्यास आगळा साज चढतो. कथेतून मानवी संघर्षाबरोबर उन्मुक्त जीवनाचा आशावाद पाखंडी व घमेंडी शोषकांच्या घातक रुढीला प्रहार करीत कथा प्रवास करत राहतात. यातील कथा भोळ्या भाबड्या माणसांच्या जीवनाचा आलेख मांडत, जीवनमुल्ये स्पष्टपणे मांडत जातात. सामाजिक संघर्ष उजागर करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. यात ग्रामीण जीवन, प्रेम , आसक्ती, सामाजिक सबंध आणि वास्तवतेचे अनोखे सृजनशील प्रयत्न यातील संवाद, परिसरातील निसर्ग वर्णन हे कथा परिणामकारक व्हावयास ज्याची आवश्यकता आहे तेवढेच पण सकस वर्णन लेखक करतो. याचमुळे प्रत्येक कथा परिणामकारक होते . यातील कथा माणसांच्या शारीरिक, आर्थिक, उत्कट भावनिक पातळीवरच्या संघर्षाचा अनोखा अनुभव दिल्याशिवाय राहत नाहीत. याचसाठी हा कथासंग्रह संग्रही ठेवून एकदा वाचावा असा हा साहित्यिक ऐवज आहे.
अक्षयच्या कथेविषयी आपले विचार मांडतांना श्री देवा झिंगाड लिहितात, “जेंव्हा अक्षय सारखा संवेदनशील लेखक समाजातील माणसे पहातो, त्यांच्या अनेक लकबी,सवयी,चांगलं वाईट वागणं व त्यामुळे होणारे सामाजिक परिणाम पाहतो तसेच जागतिकीकरणाच्या धबडग्यात सामान्य माणसाचं होणारं अजागतिकीकरण अन् त्यातून निर्माण होणारे आर्थिक प्रश्न हळव्या मनानं टिपू लागतो तेव्हा ‘गाडा ‘ सारखी एखादी दर्जेदार कलाकृती जन्मास येते. प्रत्येक कथेच्या माध्यमातून तो आपल्या अंतर्मनाला साद घालतो.अस्वस्थ करुन सोडतो. विचार करायला भाग पाडतो. सुखाची, दु:खाची, गावाबद्दलची सगळी कारणं तो त्याच्या कथेतून अभिव्यक्त करता करता मानवी स्वभावाचे अनेक कंगोरे तो आपल्यासमोर पोटतिडकीनं मांडतं राहतो. कृषीसंस्कृतीशी असलेली घट्ट नाळ न तोडता अन साक्षर झाल्यानंतर शहरात जाऊनही आपला भवताल टिपताना वास्तववादी घटनांचा ‘गाडा ‘ दामटायचा हा त्याचा प्रयोग मराठी वाचक नक्कीच डोक्यावर घेतील यात शंका नाही. एकूणच अक्षयच्या रुपाने एक सर्जनशील लेखक ह्यानिमोत्ताने लाभला आहे.” याची सत्यता कथा वाचतांना वाचकांना होतेच.
खुद अक्षय आपल्या कथेविषयी म्हणतो, “या पुस्तकाचं वेगळेपण हे आहे की यातील चौदा कथामधील प्रमुख चौदाही माणसं हे एकाच गावात राहात आहेत. भोरवाडी असं या गावचं नाव. हे गाव खरोखरच अस्तित्वात आहे. ता आंबेगाव जि.पुणे. ही चौदाही माणसे एकमेकांसोबत जोडलेली आहेत. त्यांचा एकमेकांसोबत सबंध आहे.
मानवी भावभावना, हिंसा, गाव आणि तालुका पातळीवरचं राजकारण , खून, अनैतिक प्रेमसंबंध, ग्रामीण भागातील देवाप्रती असलेल्या रूढी व परंपरा, शेतीचे किचकट व्यवहार या सा-यानी ओतप्रोत अशा या चौदा कथा आहेत.चौदाही पात्रांचं आयुष्य खूप आनंदी आणि सुखाने चाललेलं असतं. अचानकपणे एके दिवशी एक अशी घटना घडते ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात उलथापालथ होते. एका वेगळ्याच सापळ्यात ही माणसं अडकून जातात आणि त्या सापळ्यातून बाहेर निघण्याचा त्यांचा प्रवास वाचकाला उत्कंठावर्धक, अफलातून व संस्मरणीय असणार आहे.”
चौदा कथातून, बाळ्या, त्याचा सासरा मुंजाबा, उत्तम, दत्तू, शिरपा, जालिंदर , बापू बेल्हेकर, तुकाराम, नामदेवराव ढमाले, रामशा, गोवर्धन, शिवा ठाकर, भारत शेठ, पांडोबा, यडी संगी (संगीता), अनुराग, श्यामराव विठ्ठल भोर, भिडे सर, तानाजीराव, नामा अशी पात्रे त्याचबरोबर या पात्राभोवती कथेला अस्सलपणा येण्यासाठी बरीच पात्रे आपल्याला या चौदा कथा वाचतांना भेटतात. प्रत्येक पात्र आपली वेगळी झलक घेऊन, जीवन जगण्याचे तत्वज्ञान घेऊन येतात. त्याच बरोबर लेखकाने वर्णन केलेले निसर्ग वर्णन आटोपशीर पण अचूक व अप्रतिम असेच आहे.
जगण्यातील जीवनमूल्ये ही अशास्त्रीय असतात. ती बदलत नाहीत. ते मुल्य समाजात रूजवण्यासाठी परिस्थितीनुसार संदर्भ बदलत असतात. या ठिकाणी अक्षय टेमकर यांनी आपल्या कथेतून ही जीवनमूल्ये, कौशल्ये फारच उत्कृष्टपणे रुजवली आहेत. जसे (पृ.क्र.१९) ‘निसर्ग नियमानुसार एखादी गोष्ट अतिप्रमाणात केल्यानं त्याचे दुष्परिणाम माणसाला भोगावे लागतातच'(पृ.क्र.२०)”जीधर बोजा उधर सोजा ” (पृ.क्र.२५) “ज्या माणसाच्या घरातलेच ज्याचा सन्मान करीत नाहीत त्याला समाजसुध्दा निर्दयी वागणूक देतो.”
“आयुष्यात एक वेळ येते जेव्हां या जगाचा, समाजाचा आणि स्वतःचाच विचार करणं सोडून देतो, अशा वेळी माणूस फक्त शरीराने जिवंत असतो. त्याच्याकडे आनंदाने आयुष्य जगण्याचं एकही कारण नसतं. तो आत्महत्यासुध्दा करु शकत नसतो.(पृ.क्र.३०)”आयुष्य म्हणजे सापा-मुंगुसाचा खेळ हाय. कदी आपण साप आसतो आन नशीब म्हणजे ना सापा-मुंगुसाचा ख्येळ हाय. कदीआपण साप असतो आन नशीब मुंगुस आसतं तर कदी आपण मुंगुस आन नशीब साप आसतं……. ह्यो खेळ खेळण्यातच मजा हाय.(पृ.क्र.३२) “हे जग निर्दयी आहे जगाला आसवांचा नाही तर पैशाचा नैवेद्य लागतो.” “(पृ.क्र.३३)सुंदर आयुष्य तरुण आणि प्रौढ माणसाचं असतं, वृद्ध मनुष्याचं कधीच नसतं”, “आयुष्यात एक वेळ येते जेंव्हा माणसाला जगणं आणि मरणं यातला फरक खूप स्पष्टपणे जाणवू लागतो.” (पृ.क्र. ३७)”श्यातकरानं कसं श्याना -मातीच्या घरातच -हावं.आरं मानसाला सोताच्या मातीचा अबिमान पाह्यजे.”(पृ.क्र.४६) “प्लस होण्यासाठी कदी कदी माणसाला मायनस होयाला लागतंय…” “(पृ.क्र.७२)”आविष्य असचं असतंय पग … नागोबा म्हसोबा पैशाला दोन …पंचमी झाल्यावर पुजतयं कोण? “(पृ.क्र.१३४)”हे विश्व चांगल्याला लुबाडतंय आणि वाईटाला डोक्यावर घेतयं “(पृ.क्र.१८५)”लोकांच्या स्वप्नासोबत खेळायचं आणि त्यांना झूलवत ठेवायचं, त्याचसोबत लोकांना एखाद्या व्यवहारात अडकवून ठेवायचं ….. ज्यामुळे लोकं तुमच्यावर विसंबून राहू लागतील.” “सत्ता केंद्रस्थानी असते व तिच्याभोवती राजकारणी लोकं घिरट्या घालत असतात. (पृ.क्र.१८६) “माणसाला ही येडी लोकंच पद आणि सामर्थ्य देत असतात.”
अशा अनेक जीवन तत्वज्ञानाचे धडे अक्षय टेमकर देत कथेला वास्तवाची झालर लावत जातात. सर्वच चौदा कथा वाचनीय आहेत. बाळ्याचा सासरा, जालिंदरचा पुनर्जन्म, गाडा, घुंगरु, वरात, शिवा ठाकर, म्हातारपण लय वंगाळ, यडी संगी, झाकली मूठ सव्वा लाखाची, सरपंचाचं कार्ट, आमदारकीची संगीत खुर्ची. या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा आहेत.
अक्षय टेमकर यांनी सदर कथासंग्रह “माझे आई वडील, बहिणी नूतन व नम्रता व माझे गुरु श्री इब्राहिम आफगाण सर, माझा खास मित्र अनिकेत बोले यांना हे पुस्तक अर्पण करुन सा-याचे ऋण फेडण्यास ते विसरत नाहीत. वारी पब्लिकेशन्स या स्वतःच्याच प्रकाशन संस्थेमार्फत प्रकाशन केले आहे. मुखपृष्ठ व रेखाचित्र अन्वर हुसेन यांचे असून नेहमीप्रमाणे अप्रतिमच. कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती फारच कमी कालावधी मध्ये निघाली यावरूनच या पुस्तकाचे महत्व समजून येते. स्वागत मुल्य २६०रुपये आहे.मला हा कथासंग्रह माझे मित्र दिनेश कवडे,(गझलसूर्य) पुणे यांचेकडून मिळाले.चांगला कथासंग्रह वाचण्याचा योग दिनेशमुळे घडून आला. “गाडा ” या कथासंग्रहाविषयी याहीपेक्षा विस्ताराने लिहावे असे बरेच काही आहे, तरी तो आपण वाचावा व संग्रही ठेवावा असा हा ऐवज आहे. सहज व सोपी भाषा ही या कथासंग्रहाची शक्ती आहे.
अक्षय टेमकर यांना त्यांच्या पुढील लेखनकार्यासाठी अंत:करणपुर्वक सदिच्छा देतो.
- कथासंग्रह : गाडा
- (आकलन क्र.३०)
- लेखक : अक्षय टेमकर,
- नेरुळ,नवी मुंबई.
- प्रकाशन व वितरण : वारी पब्लिकेशन्स, पुणे.
- संपर्क : ९१ ३७ ३७ ८८ १२.
- मुखपृष्ठ व रेखाटन:अन्वर हुसेन.
- द्वितीय आवृत्ती : ०१/१०/२०२२.
- स्वागत मुल्य : २६०/रुपये.
- *आस्वादक
- -मुबारक उमराणी,
- शामरावनगर ,सांगली
- ९७६६०८१०९७.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–