निद्रानाशावर..

निद्रानाश अथवा झोपेशी संबंधित अन्य काही तक्रार असेल तर डॉक्टर झोपेच्या गोळ्या देतात. मात्र या गोळ्यांचं दीर्घकाळ सेवन घातक ठरु शकतं हेही लक्षात घ्यायला हवं. म्हणूनच या गोळ्यांच्या आहारी न जाता झोप न लागण्याची कारणं शोधून त्यावर उपाय करणं आणि शांत झोपेचा लाभ घेणं गरजेचं आहे. अर्थात झोपेच्या काही गोळ्या आरोग्यवर्धकही सिद्ध होतात कारण या गोळ्यांमध्ये बेन्जोडयाजीपाईनर नावाचं शरीरावरील अतिरिक्त ताण दूर करणारं तत्व असतं. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या गोळ्यांचं सेवन करायला हवं. या गोळ्यांसमवेत डॉक्टर गोळ्यांचे दुष्परिणाम दूर करणार्‍या काही गोळ्या देतात.
त्या टाळू नयेत. झोप अनियंत्रित होण्याच्या अनेक कारणांमध्ये जीवनशैलीतील बदल हे एक कारण आहेच. त्याचबरोबर काही विशिष्ट औषधोपचरांचा प्रभाव, किडनी अथवा लिव्हरशी संबंधित आजार यामुळेही निद्रानाशाचा त्रास संभवतो. म्हणूनच तज्ज्ञांना सर्व लक्षणं सांगावी. त्यानंतरच निद्रानाशाचं योग्य नदान करता येतं. झोपेच्या गोळ्यांचं व्यसन लागू शकतं. म्हणूनच डॉक्टर गोळ्यांचा ठराविक डोस लिहून देतात. त्याचं पालन करावं. डॉक्टरांनी दिलेल्या क्रमानुसारच गोळ्या घ्याव्यात. सध्या ओरल स्प्रेद्वारेही निद्रानाशावर मात करता येते. त्याचप्रमाणे जिभेवर ठेवताच विरघळणार्‍या गोळ्याही हे काम करू शकतात. पण निद्रानाशावर मात करण्यासाठी औषधांच्या आहारी न जाता जीवनशैली सुधारावी.

Leave a comment