नाट्यप्रेमी करजगाव…!

नाट्यप्रेमी करजगाव…!

करजगावातील नागरिकांना आपली रोजची कामे आणि जबाबदाऱ्या पार पाडून आलेला थकवा शिनभाग घालवण्यासाठी आणि आपले जीवन सुखी समाधानाने घालविण्यासाठी मनोरंजनाची अनेक साधने होती. भजन , किर्तन, प्रवचन, रामलीला, कटपुतली , लोकगीते, लोकनृत्य, दंढार, कलापथक, जलसे, तमाशे याद्वारे गावातील प्रत्येक जण आपले मनोरंजन करून घेत असे त्याच प्रमाणे नाटक सुद्धा करजगावकरांचे मनोरंजनाचे महत्त्वाचे साधन होते. नाटकाद्वारे समाजातील वाईट प्रथा, परंपरा ,सामाजिक प्रश्न याबाबत जनजागृती होऊन सामाजिक परिवर्तनाला मोलाची मदत झाली. मागील आठ दशकापासून करजगावला नाटकाची परंपरा लाभली. या काळात वेगवेगळ्या नाट्य मंडळाद्वारे प्र .के. अत्रे ,बाळ कोल्हटकर , मधुसूदन कालेलकर या सारख्या प्रसिद्ध नाटककारांच्या सामाजिक विषयावरील अनेक नाटकांचे प्रयोग येथे करण्यात आले.

 

करजगावात नाटकाची सुरुवात 1950 पूर्वीचं झाल्याचे दिसून येते . याकाळात मंगळवेढ्याचे संत दामाजी यांच्या दातृत्वावर “झाला महार पंढरीनाथ” हे धार्मिक नाटक बसविण्यात आले होते. भीषण दुष्काळात दामाजीचे भुकेल्यांना गोदामे खुली करणे, बिदरच्या बादशहाची दामाजीवर अवकृपा, विठुरायाने महाराचे रूप घेऊन गोदामातील धान्याची किंमत मोहरांच्या रुपाने देऊन त्याची पावती घेणे, नंतर बादशहाकडून दामाजीचा सत्कार, त्यांची मंगळवेढ्याला सन्मानपूर्वक रवानगी ही सर्व दृश्य त्यात हुबेहूब दाखविली होती. बादशहाचे प्रवेशाचे वेळी तणसेचा घोडा बनवून त्याच्या पायाला चाके लावून प्रत्यक्ष रंगमंचावर आणला होता असे म्हणतात. या नाटकात स्वर्गीय बळीरामजी चौधरी, रामचंद्र चौधरी, रामचंद्र माहुलकर, भगाजी डांगे, महादेव तवकार, आणि भद्राजी ठाकरे यांनी वेगवेगळ्या भूमिका वठविल्या होत्या. हेच करजगावातील सुरुवातीचे नाट्यकलावंत होत.

 

एकोणविशे साठ पूर्वीच उकंडराव चौधरी, कोलवाईचे राऊत, लोहतवाडीचे सदाशिव भेंडे, सालोडचे वरघट सर, सदाशिवराव भोयर, गुरुजी, शेखोभाऊ ऊडाके, काशिनाथ पेंटर ,रामकृष्ण राऊत, या मंडळींनी बाळ कोल्हटकर लिखित ‘वेगळ व्हायचं मला ‘हे नाटक बसविले होते. पैशामुळे आणि महत्त्वाकांक्षेमुळे कुटुंबात होणारा कलह यात दाखविण्यात आला होता. याच काळात लक्ष्मणराव हिरवे, विश्‍वनाथ ठाकरे, माधवराव ठाकरे, रामचंद्र चौधरी, उकंडराव चौधरी, सदाशिव भेंडे, नत्थू पाटील या नाट्य मंडळींनी* संगीत प्रेमाचा सौदा* हे नाटक बसविले होते. रामकृष्ण टेलर आणि बाबुराव पेंटर यांनी स्त्रीपात्र वठविले होते. साठच्या दशकात भालजी पेंढारकर लिखित गोकुळचा चोर  या नाटकाचा प्रयोग करजगावात करण्यात आला होता. यात कनिराम महादेव कठातला,सकलाल गोबरे- आडे, लिंबा बेहरू कुंभकर्ण, किसन हरसिंग राठोड हे नाट्य कलाकार सहभागी झाले होते.

एकूण विषय 61-62 च्या दरम्यान करजगावातील कलाकारांनी आचार्य प्र के अत्रे लिखित संगीत साष्टांग नमस्कार हे नाटक बसविले होते त्यात लक्ष्मणराव हिरवे, सदाशिवराव भोयर ,नत्थू पाटील, वरघट सर ,माधवराव ठाकरे हे नाट्यकलावंत होते. या नाटकात काशिनाथ तवकार ,किसनसिंग राठोड,आणि रामकृष्ण राऊत यांनी स्त्री पात्र रंगवले होते. हिरामण माहुलकर आणि प्रभाकर चौधरी हे या नाटकातील बालकलाकार होते. याशिवाय कसना नाईक,भावराव खोडे, गुलाब उपाध्ये, बालाजी हिरवे हे मदतनिस होते. विशेष म्हणजे या नाटकाच्या प्रयोगातून गोळा झालेल्या रकमेपैकी 501 रुपये भारत चीन युद्ध करिता *युद्धनिधी *पाठवून करजगाववासियांनी राष्ट्रीय कार्यासाठी आपला खारीचा वाटा देऊन आपल्या देशभक्तीचा परिचय दिला होता.

*संगीत साष्टांग नमस्कार* मधील चंदू ची भूमिका साकारणारे बालकलाकार *प्रभाकर चौधरी* यांनी हायस्कूलमध्ये शिकत असताना प्रेमा विना भिकारी हे नाटक बसवले होते. या नाटकाचे चिखली, सांगलवाडी आणि वाईगौळ अशा तीन ठिकाणी प्रयोग केले होते.नाटकादरम्यान विठू झोलबाजी हिरवे मध्येच एखादे सोंग घेऊन लोकांची करमणूक करायचे. करजगावातील काही नाटकात काम केल्यानंतर माधवराव ठाकरे गुरुजी यांना नाटकाची इतकी गोडी लागली की त्यांनी रामगावचे काणे सर, सदाशिवराव भोयर आणि काही शिक्षकांना सोबत घेऊन मधुसूदन कालेलकर यांचे दिवा जळू दे सारी रात* या नाटकाचा प्रयोग केला होता. त्यासाठी नागपूर वरुन खास नट्यांना सुद्धा बोलावले होते. पिंपळगावला खारीत सात आठ एकरात फारच मोठा रंगमंच उभारला होता. या नाटकाच्या प्रयोगाला आजूबाजूच्या वीस-पंचवीस खेड्यातील नाट्यप्रेमी प्रेक्षकांची इतकी गर्दी उसळली होती की, प्रेक्षकांना बसायला जागा सुद्धा कमी पडली होती. असे म्हणतात. या यशस्वी प्रयोगाने माधवराव गुरुजींचा हुरूप इतका वाढला कि, सिनेसृष्टीत हिरो बनण्याचे भूत त्यांच्या डोक्यात शिरले होते .अर्थात ते दिसायला सुद्धा फारच सुंदर होते. आणि घरूनही सधन होते. त्यासाठी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा सुद्धा दिला होता. असे नाट्यवेडे कलावंत सुद्धा येथे होऊन गेलेत.

 

1970 च्या दशकात सुधाकरराव नाईक यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले, तेव्हा त्यांचा करजगाव येथे ग्रामगौरव सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. याप्रसंगी सदाशिवराव भोयर आणि धनंजय बेंद्रे सर दिग्दर्शित मी नावाचा भदाजी तेली हे तीन अंकी नाटक ठेवण्यात आले होते. त्यातील भदाजीच्या तोंडी “मी नावाचा भदाजी तेली माणसाची मिशी पडली म्हणजे माणसाचा अपमान होतो” हे पालुपद होते. या नाटकात *राजेश कठातला, अंबादास चिपडे, हंजारीलाल जाधव, नामदेव वामन राठोड ,आणि देवराव जाधव आदि करजगावच्या शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळेत सुद्धा पाठ्यपुस्तकातील नाटिका 26 जानेवारी किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने सादर केल्या जाई.

 

ऐंशीच्या दशकात करजगावात चंदनशेष कलावृंद नाट्य मंडळाची स्थापना झाली रामराव भोयर यांचे दिग्दर्शनाखाली या मंडळाने *’गंगासागर’, दोन गडी बारा भानगडी, भयान थुथरे, अशी बायको हवी* अशी एकूण चार नाटके सादर केली. करजगावात सर्वात जास्त काळ अस्तित्वात असणारं आणि जास्तीत जास्त नाटकाचे प्रयोग करणारं हे नाट्य मंडळ होतं.

तसं तर *गंगासागर* ची कल्पना मुळात देविदास आडेची होती. शिकत असताना त्याने कुठेतरी कलापथक पाहून त्याचे कथानक आम्हाला सांगितले होते. त्यानंतर मी स्वतः आणि अंबादास चिपडेनी कलापथकाचं नाटकात रूपांतर करून संवाद लिहून काढले. कधीकधी राजेश शर्मा ही आमच्या सोबतीला असायचा. मी स्वतः नवीन सिनेमा चालीवरील गीते लिहिली होती. यातूनच *संगीत गंगासागर* ची निर्मिती झाली होती. या नाटकाचे करजगाव, मांगकिन्ही, कोव्हळा, भांडेगाव ,लोही, दहातोंडा, ,महागाव कसबा रामराव हरू आणी भोयनी ईत्यादी ठिकाणी या नाटकोचे 25 पेक्षाही जास्त प्रयोग करून झालेत. नाटकात देविदास आडे, देविदास सिताराम राठोड, अंबादास चिपडे, रमेश वरघट, राजेश कठातला, संजय जाधव, हंजारीलाल जाधव, शेषराव चव्हाण इत्यादी कलाकार होते. तर -शेषराव सपावट, देवानंद राठोड ,भीमराव राठोड ,विष्णू तवकार,आणि प्रकाश शिंदे हे स्त्रियांच्या भूमिका साकारायचे. अंबादास आडे आणि यशवंत गडलिंग हे सुद्धा छोट्या छोट्या भूमिका करायचे. याशिवाय बापूराव तवकार हे मेकअप मन होते वेशभूषेची जबाबदारी फत्तुसिंग चव्हाण सांभाळायचे. किसन वानखडे आणि फरिदा वानखडे हे उत्तम हार्मोनियम वादक होते. तब्बलजी म्हणून बालाजी हिरवे, सुखदेव हिरवे, किसनसिंग राठोड , काही काळ मांगकिन्हीचा तुकाराम सुद्धा सोबत असायचा लाइटिंगची आणि माईकची व्यवस्था मधुकर चव्हाण वर होती. तर फत्तुसिंग चव्हाण, गोबरू फुलसींग राठोड, शंकरराव चिपडे आणि फुलसिंग आडे हे परगावी प्रयोगाला कायम सोबत असायचे.

 

चंदनशेष कलावृंद नाट्य मंडळाने के. डी .पाटील लिखित ‘दोन गडी बारा भानगडी’ या तुफान विनोदी नाटकाचे प्रयोग केले होते. तसेच प्र. के .अत्रे यांच्या ‘अशी बायको हवी’ दिघेकर लिखित ‘भयान थुथरे‘ * या नाटकाचे सुद्धा करजगावात तसेच बाहेरगावी प्रयोग केले होते. या नाटकात *वंदना श्रीपतवार, ज्योती श्रीपतवार माला बारेकर *या नट्यांनी सुद्धा काम केले होते. चंदनशेष कलावृंद नाट्य मंडळात नाटकाच्या जोडीला फिल्मी गीते, नकला आणि नृत्य हे सुद्धा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सादर केले जायचे.

 

करंजगावच्या चंदनशेष नाट्य मंडळातील* शेषराव चव्हाण* हा लेखक , गीतकार , गायक, नर्तक , दिग्दर्शक, असा सबगुणी नाट्यकलावंत आहे. गंगासागर नाटकात तो बाल कलाकार होता. तेव्हा त्याने तीन रोलमध्ये काम केले होते. त्यानंतर *वसंत कला कुंज नाट्य मंडळात त्याने दिग्दर्शनाचे काम सांभाळले होते. तसेच त्याने दोन VIDEO कॅसेट. चटक चांदळी आणि तांडरी नंबर व सुध्दा काढल्या तसेच PEEP/ पाणलोट /यूनिसेफ आणि आरोग्य विभागामार्फत त्याने महाराष्ट्रभर माहितीपर कार्यक्रम सादर केले. महिला सक्षमीकरण ,शिक्षण, आरोग्य, व्यसनमुक्ती ,आणि पर्यावरण या विषयावर गडचिरोली पासून नंदुरबार पर्यंत आणि गोंदिया पासून रत्नागिरी पर्यंत महाराष्ट्रभर माहितीपर कार्यक्रम सादर केलेत. मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण दिले. तसेच एकपात्री प्रयोग सादर केलेत.

 

1992-93 या काळात वसंत कला कुंज नाट्य मंडळाची स्थापना झाली गजानन प्रभाते या गुणी कलाकाराने ‘नको ही लालसा’ हे तीन अंकी सामाजिक नाटक लिहिले त्यात हुंड्याशिवाय व्यसनमुक्ती, शिक्षण, आरोग्य हे विषय सुद्धा त्याने हाताळले होते. शेषराव चव्हाण या नाटकाचे दिग्दर्शन केले होते. तसेच शेषराव ने मी डॉक्टर विसरभोळे  ही तुफान विनोदी एकांकिका सुद्धा लिहिली होती आणि दिग्दर्शित केली होती. त्यात गजानन प्रभाते, शेषराव चव्हाण, गजानन नासरू चव्हाण, देविदास कसनदास राठोड, नारायण रामचंद्र चव्‍हाण, बंडूकुमार धवणे, सुरेश नथ्थूजी चव्हाण, एकनाथ वानखडे हे कलाकार होते. तर प्रेमदास आडे, सुरेश बदु राठोड, विष्णू हिरवे, रामगांव रामेश्र्वर येथील सुरेश वरघट, रमेश राठोड (धुमा) या कलाकारांनी स्त्रियांच्या भूमिका साकारल्या होत्या. या मंडळाच्या नाट्यकलाकारा सोबतच प्रमोद चौधरी, पुरुषोत्तम ठाकरे, किसन वानखडे, नाना चौधरी, सुभाष राठोड, अंबादास चिपडे, देविदास पवार, रामप्रसाद चव्हाण, रामजीवन चव्हाण, पांडुरंग चव्हाण, विनोद भोयर, देविदास आडे, श्रीकृष्ण चव्हाण ,आणि शिवदास जाधव हे अन्य सहकारी असायचे. या नाटकाचे करजगाव, पिंपळखुटा, धामणगाव, मांगकिन्ही, हातोला आणि बोदेगाव इत्यादी ठिकाणी प्रयोग झालेत.

 

प्रशांत गजानन प्रभाते हा करजगावातील एक गुणी कलावंत महसूल विभागात कार्यरत आहे. महसूल विभागामार्फत त्याने आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती , शेतकरी आत्महत्या आणि पर्यावरण अशा अनेक विषयावर प्रबोधन पर कार्यक्रम सादर केलेत. महसूल विभागामार्फत घेण्यात आलेल्या नाट्यस्पर्धेत तो जिल्हास्तर विभागीय स्थळ तसेच महाराष्ट्र स्तरापर्यंत चमकला आहे. अशाप्रकारे अखंडपणे कां नसेना पण स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर आजपर्यंत करजगावातील ही नाट्यपरंपरा अव्याहतपणे चालू आहे. धन्य ते नाट्यकलावंत यांनी मागील 80 वर्षापासून करजगाव वासियांचे मनोरंजन केले. धन्य ते नाट्यप्रेमी प्रेक्षक ज्यांनी या सर्व कलाकारांच्या कलेला वाव दिला. त्यांच्या कलेची कदर केली. आणि धन्य ती करजगावची माती या मातीत असंख्य नाट्यकलावंत आणि नाट्यप्रेमी प्रेक्षक जन्मास आलेत…!

    शब्दांकन : प्रा. रमेश वरघट

    माहितीचा स्त्रोत:-
    कृष्णाजी वरघट,
    प्रभाकर चौधरी
    जनार्दन धवणे,
    फत्तुसिंग चव्हाण
    धनंजय बेंद्रे सर

 

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
YouTube
Pinterest
LinkedIn
Instagram