नसबंदीला खुप महत्व होतं. कारण जर मुलं जास्त पैदा झाल्यास त्याचं शिक्षण, खानपानं,कपडेलत्ते याच्या सोयी बरोबर मिळत नाही असं सर्वांना वाटत होतं. त्यामुळं लोकं नसबंदी करीत होते. त्या नसबंदी करण्यामागे उद्देश एकच होता. तो म्हणजे स्रीयांना कुटूंबनियोजन शस्रक्रियेचा जास्त त्रास होतो. तेवढा पुरुषांना होत नाही. काही लोकं केवळ मुलीही झाल्या असतील तरी एक किंवा दोन मुलींवरच कुटूंबवाढीला कात्री लावत असत. परंतू असं ते घर की त्या घरात मुलगा हवा मुलगी नको या उद्देशाला खतपाणी भेटत होतं. नव्हे तर त्यासाठी त्यांनी सहा मुली पैदा केल्या होत्या. स्नेहा लहान होती. तेव्हापासूनच तिनं स्वप्न रंगवली होती. तसं पाहता त्या सात मुली होत्या. मुलाच्या हव्यासानं तिच्या बानं सात मुली एकामागून एक जन्मास घातल्या. शेवटी मुलगा न झाल्यानं पर्याय नाही म्हणून नसबंदीची कल्पना सुचली. मोहनीशनं त्यानंतर नसबंदी केली. आपण एवढे मुलं पैदा करणार नाही. तिन त्याचवेळी जणू शपथ घेतली होती. त्याचं कारणंही तसंच होतं. स्नेहाच्या बापानं नसबंदी न केल्यानं मुलाच्या हव्यासापोटी सात मुली ज्या जन्माला घातल्या. त्यामुळं की काय स्नेहासह तिच्या सर्व बहिणींना दृष्टचक्राचा सामना करावा लागला. त्यातच जे दृष्टचक्र आलं. ते दृष्टचक्र म्हणजे तिचे विचार बदलविणारे चक्र ठरले.
त्या सात बहिणी…….. यातच मायबाप दोघं धरुन नऊ जण. त्यातच कोणाला खायला मिळायचं नाही. कोणाला धड वापरायला कपडे मिळायचे नाही. सतत गरीबी आणि दुस-याच्या अन्नावर जगतजगत जिंदगी कापावी लागायची. त्यावेळी जे हालहाल झाले. ते पाहून स्नेहाचे विचार बदलले होते. आपण आपल्या मुलांना असे दिवस कधीच देणार नाही. असं तिला वाटायचं. आपल्या बापानं मुलाच्या हव्यासासाठी असा पवित्रा घेतला असून त्यानं मुलींचे हितच जणू पाहिले नाही असंही तिला वाटत होतं.
आज स्नेहाचा विवाह झाला होता. तसे तिच्या बहिणीचेही विवाह झाले होते. सर्व बहिणी चांगल्याच घरी पडल्या होत्या. पण स्नेहाला चांगलं घरदार मिळालं नव्हतं. स्नेहाला विवाहापुर्वी वाटलं की आपल्याला मिळणारा पती. आपण त्या पतीला वाकवू. काही दिवसातच त्याला आपल्या मतानुसार वागायला लावू. पण ते सपशेल खोटं ठरलं होतं. स्नेहाचा पती हा सर्वकाही मायबापाचं ऐकून करणारा होता. त्यातच मायबाप हे अडाणी असल्यानं ते मुलं पैदा होण्याला देवाची देणंच समजत असत. ते नसबंदीला विरोधच करणारे होते. अशातच पहिलं लेकरु झालं.
पहिलं लेकरु त्यातही ती मुलगी. घरी मात्र कोणताच आनंद झाला नाही. त्यातच तिला वाटत होतं की एक मुलगी का असेना, आपण कुटूंबनियोजन करायला हवं. तशी ती आपल्या पतीला त्यासाठी म्हणू लागली. विनवूही लागली. पण तो ऐकेल तेव्हा ना. अशातच पुन्हा ती गर्भार राहिली.तर याहीवेळी तिला मुलगीच झाली.
पहिली मुलगी ठीक. पण दुसरीही मुलगी होताच सासूच्या रागाला पारावार राहिला नाही. ती रागानं बेभान झाली होती. पण मनातला राग अंतर्मनात दाबत कशीबशी ती चूप राहिली. त्यातच ती आता ताने देवू लागली की मुलाला मागू नको म्हटलं तरी ही मुलगी मागीतली. तशीच ती तिच्या मायबापालाही ताने देवू लागली की हिच्या आईला जसा मुलगा झाला नाही. तशीच हिचीही कुस निघाली. तिच्या पोटी मुलीच होणं हा तिचा गुन्हा नव्हता. तरी घरची मंडळी तिलाच दोष देत होते. दुषणेही लावत होते. नव्हे तर तिच्यावर अत्याचार करीत होते. त्या अत्याचारात ती भरडली जात होती. अशातच तिच्या पोटात तिसरं मुल राहिलं.
दोनवेळा सीझरनं झालेली मुलं…….डॉक्टरनं तिसरं मुल होवू देवू नका असं ठामपणानं सांगीतलं. नाहीतर हिला काही समस्या येतील वा जीवही जाईल किंवा पैदा होणारी संतती ही अंगूपंगू पैदा होवू शकते हेही सांगीतलं होतं. हे अगदी निक्षून सांगीतलं असलं तरीही केवळ मुलाच्या हव्यासापोटी त्यांनी तिसरं मुल ठेवलंच. त्यातच यावेळी थोडी सावधगीरी बाळगत दोनवेळा भ्रृणहत्याही केल्या. नाही म्हणता म्हणता तिसरं मुल पैदा झालं. तिही मुलगीच निघाली. ती मात्र पंगू निघाली होती. मात्र तरीही सासूची इच्छा पुर्ण झाली नाही. तिला मुलगाच हवा होता. तिला मुलाचा हव्यास असल्यानं बोलत असे. मात्र मुलाची कमाई कमी असल्यानं ती बोलत जरी असली तरी मुलगा त्याकडं लक्ष देत नव्हता.
मुलगा समझदार बनला असला तरी त्याला असलेल्या तीन मुली. त्यातच तिसरं मुल हे अपंग. त्या मुलीची सेवा करतांना नाकीनव येत होतं. डॉक्टरांनी. आधीच सुचना सांगीतली. पण ती सुचना न ऐकल्यानं हा गंभीर परिणाम झाला होता. ते तिसरं मुल रात्र रात्र रडत होतं. कोणालाच बरोबर झोप घेवू देत नव्हतं.महागाईचा काळ. शिक्षणालाही आज शुल्क पडत होतं. त्यातच डॉक्टरनं सांगीतलं की बाईची कुटूंबनियोजन शस्रक्रिया होवू शकत नाही. तिची शस्रक्रिया केल्यास जीव गमवावा लागेल. त्यामुळं की काय पुरुषानच नसबंदी करावी. पण नसबंदी तो करणार कशी? त्याच्या मनात विचार होता. तो डॉक्टरचं काहीच ऐकत नव्हता.
आज सासूसासरे जीवंत नव्हते. स्नेहा आज खुप दुःखी होत असे. तिच्या आईच्या काळातलं ठीक होतं. पण तिच्या काळात ती सुज्ञ असतांनाही केवळ सासू आणि पतीच्या निरंकुशतेपणानं नव्हे तर मुलाच्या हव्यासानं आज तिलाही एकामागून एक सहा मुली झाल्या होत्या. त्यांचं शिक्षण, त्यांचे कपडे, त्यांचे खाणेपिणे पार पाडतांना तिला भयंकर त्रास होत होता. त्यातच वडील बनलेले तिचे पती केवळ तुटपूंजा पैसा आणत. तो तिच्या हातात देत व संपूर्ण खर्च करायला लावत. पण तो पैसा खर्च करतांना व कुटूंबातील गरजा भागवितांना जो त्रास तिला होत असे. तो त्रास तिच्या पतीला होत नव्हता. चूक त्याची व त्याच्या आईची जरी असली तरी हे सगळं एका नसबंदीमुळं घडलं होतं. जर स्नेहाच्या पतीनं नसबंदी केली असती तर कदाचित चित्र वेगळंच दिसलं असतं याची खंत तिलाही वाटत होती. ती रडत होती आता. आपल्या भाग्यावर. तिचं भाग्यानंच आज तिच्यासमोर संकट आणले होते. दोष तिचा नव्हता. तरीही तिच्याचमागे भोगमान का? हाही प्रश्न पदोपदी तिला सतावत होता. तो मात्र आपल्या कर्तृत्वावर साधा पश्चातापही करीत नव्हता.
- अंकुश शिंगाडे
- नागपूर
- ९९२३७४७४९२