देवदासी….

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

सुनंदा व मी शाळेतल्या मैत्रिणी. एके दिवशी शाळा सुटल्यावर तिला घेऊन मी माझ्या घरी आले. पण ती आमच्याकडे आलेली माझ्या घरच्यांना आवडले नाही. ती घरी गेल्यावर आई मला म्हणाली, “क्षमा, त्या सुनंदाशी जास्त मैत्री नको करू हं”. “का गं आई? तिचं गणित खूप चांगलं आहे आणि ती नेहमी मला मदत करते”. “सांगीतलं ना, जास्त जवळीक नको.”

मी हो म्हटले, पण आईचे म्हणणे मनावर घेतले नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघी तिच्या घरी गेलो. तिथे ओट्यावर एक साडी नेसलेली बाई बसली होती. सुनंदाने ‘ही माझी ताई’ अशी ओळख करून दिली. आमचा आवाज ऐकुन सुनंदाची आई बाहेर आली. मला पाहून तिला फार आनंद झाला नाही आणि इशाऱ्याने तिने सुनंदाला आत बोलावून घेतले. मी मात्र वेंधळ्यासारखी तिच्या ताईकडे पाहतच राहिले.

ओठावर लिपस्टिक, लांबलचक केसांवर माळलेले गजरे, कपाळावर ठसठशीत कुंकू आणि डोळ्यात घातलेले काजळ ह्यामुळे तिची ताई फारच सुंदर दिसत होती. कुणाची तरी वाट पाहत असावी अशी ती पुन्हा पुन्हा रस्त्याकडे पाहत होती.

एवढ्यात एक अलिशान गाडी आली व त्यातून माझे काका उतरले. मला बघून काका थोडे चमकले. “काय करते गं इकडे?” असे खेकसले. सुनंदाची ताई आत गेली व सुनंदा माझा हात ओढत मला घेऊन घराबाहेर पडली.

रात्री काका घरी आले तेव्हा त्यांनी मला कॅडबरी दिली आणि “मी मावशीकडे होतो हे घरात कुणाला सांगू नको हं” अशी मला तंबी दिली.

सुनंदाची व माझी मैत्री कायम होतीच. दहावीचं वर्ष होतं. आम्ही प्रिलीमचा अभ्यास करत होतो. एक दिवस सुनंदा मला म्हणाली “आज रात्री मी तुझ्याकडे राहायला येते.” मी चक्रावले! ही आईला आवडत नाही. हिला मी माझ्या घरी राहायला कशी नेऊ, आणि नको तरी कशी म्हणू?

मला तिला घेवून जावेच लागले. मी काही बोलायच्या आधीच सुनंदा माझ्या आईचे पाय पकडून विनवणी करू लागली “क्षमाच्या आई, मला वाचवा हो. माझी आई माझे उद्या देवाशी लग्न लावणार. मला माझ्या आई ताई सारखं जगायचं नाही हो. मला खूप शिकून मोठं आणि स्वावलंबी व्हायचयं. माझं भविष्य क्षमाच्या बाबांच्या हातात आहे. मला मदत करा”, असे म्हणून ती आईचे पाय धरून रडू लागली. मला काही कळलंच नाही. मला ही रडायला येऊ लागले. ‘देवाशी लग्न’ याचा मला काही अर्थ लागेना. एवढ्यात माझे बाबा घरी आले होते. त्यानी ही तिचं बोलणं ऐकलं होतं.

माझे बाबा देवालयाचे ट्रस्टी होते. उद्या सुनंदाचं देवदासीकरण होणार होतं. ही गावची पुरातन प्रथा होती. देवदासी म्हणजे मुलीची आई भटा ब्राम्हणा समक्ष आपल्या मुलीचे लग्न देवळात देवाशी लावते. देवाची दासी असल्या कारणाने तिच्या शरिरावर गावातल्या सगळ्या प्रतिष्ठित पुरुषांचा अधिकार असतो.

देवालयाच्या उत्सवाच्या वेळी लालखी, पालखी, रथोत्सवाच्या वेळी अशा बायांचे नाच गाणे होत असत. त्यांना ‘कलावंतीण” असे ही संबोधले जात. समाजात त्यांना मान नसे. घरंदाज बायका त्यांच्याकडे बघत ही नसत. त्याचे पुरूष मात्र कलावंतीणीला आपली रखेल म्हणून वापरत. हे सगळं जेव्हा मला सुनंदा कडून कळलं तेव्हा माझे बाबा ही त्या निर्णयात सहभागी असतात हे ऐकून माझा तीळ पापड झाला.

मी रागाने सुनंदाला घेऊन माझ्या खोलीत गेले. नंतर आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना फोन करून तिची हकिगत सांगीतली. सुनंदा अभ्यासात हुशार व शाळेचे नाव उज्जवल करणारी मुलगी होती. आता प्रिलीमच्या वेळी तिच्या मनावर हा आघात झाला तर तिच्या परिक्षेवर त्याचा परिणाम नक्की होईल याची त्यांना खात्री होती. सर ही माझ्या बाबांशी फोनवर बोलले. त्यांनी ही आपला विरोध दर्शवला.

शाळेतल्या सगळ्या मुला मुलींना एकत्र करून मुख्याध्यापकांनी दुसऱ्या दिवशी देवळाकडे मोर्चा नेण्याचे ठरवले. माझ्या बाबांनी सुनंदाला आमच्याच घरी ठेवले. सुनंदाच्या आईने एकच आकांत केला. देवाचा कोप होईल असे ही त्या म्हणाल्या आणि काही गावकरी ही तिच्या बाजूने कौल देऊ लागले. माझ्या बाबांना ही लोक काहीच्या काही बोलू लागले.

शेवटी शाळेचा मोर्चा विजयी ठरला. सुनंदाला देवदासी होण्यापासून वाचवले. पुढे प्रश्न पडला सुनंदाचे काय? तिच्या आईसाठी ती मेली होती आणि तिला ही आईकडे जायचे नव्हते.गावातल्या तरूणांनी, मुख्याध्यापकांनी व माझ्या बाबांनी मिळून मोठी रक्कम जमा केली व सुनंदाला हॉस्टेल मध्ये भरती करून तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. माझी सुनंदा आज एका नामवंत हॉस्पिटल मध्ये प्रख्यात सर्जन आहे.

    सौ.शोभा वागळे
    मुंबई.
    8859466717

Leave a comment