दिवाळीच्या काळातही दक्षतासूचनांचे काटेकोर पालन व्हावे
– जिल्हाधिकारीशैलेश नवाल
अमरावती : कोरोनाबाधितांची प्रतिदिन आकडेवारी घटत चालली असली तरीही जोखीम कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचे पालन केले पाहिजे. दिवाळीचा कालावधी लक्षात घेऊन याबाबत सर्वांनी सजग राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे केले.
कोरोनाबाधितांची संख्या रोडावली तरीही अजून संकट टळलेले नाही. याचे भान दिवाळीच्या काळातही विसरता कामा नये. मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर करण्याबरोबरच गर्दी टाळण्यावर भर द्यावा. अनावश्यकरीत्या बाहेर पडू नये. गर्दी टाळण्यासाठी फटाका विक्री केंद्रांना दोन केंद्रात विशिष्ट अंतर राखून परवानगी देण्यात येईल. नागरिकांनी ध्वनीप्रदुषण व धूरप्रदूषण टाळावे. कोरोनामुळे श्वसनसंस्थेवर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन फटाक्यांद्वारे होणारे धूरप्रदुषण टाळावे. मिठाईची शुद्धता कायम राखण्यासाठी वेळोवेळी काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी साथ द्यावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.