हुडहुडी भरवणार्या थंडीत सकाळी उठून व्यायाम करणं जीवावर येतं. अंगावरचं पांघरून बाजूला करावंसं वाटत नाही. पण तासभर झोपण्यासाठी आपण आपल्या आरोग्याकडे, फिटनेसकडे दुर्लक्ष करतो. एखाद्या दिवशी झोपणं ठीक आहे. पण दररोजचा आळस उपयोगाचा नाही. थंडीच्या दिवसातही स्वत:ला व्यायामासाठी कसं सज्ज करता येईल याबाबतच्या काही टिप्स.
थंडीत घराबाहेर पडायचं नसेल तर घरीच व्यायाम करा. योगा, जॉगिंग, डान्स असं काहीही करता येईल. घरच्या घरी करण्यासारखे साधेसोपे व्यायामप्रकार आहेत. हे व्यायाम करून तुम्ही फिट राहू शकता. ? दररोज एकाच प्रकारचा व्यायाम करून कंटाळा येतो. मग व्यायाम टाळला जातो. व्यायाम एकसुरी होत असेल तर डान्स, जीम, योगा, धावणं असं वैविध्य आणण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला दररोज व्यायाम करावासा वाटेल. व्यायाम करण्यामागची कारणं टिपून ठेवा. काही जण वजन कमी करण्यासाठी किंवा फिटनेससाठी व्यायाम करतात. आपल्याला व्यायामाची गरज का आहे, त्यामागचा आपला उद्देश काय हे लिहून ठेवलं की तुम्हाला व्यायामाची प्रेरणा मिळेल.
व्यायामासाठी एखादा जोडीदार सोबत घ्या. या जोडीदारामुळे तुम्हालाही सकाळी उठून व्यायामाची प्रेरणा मिळेल. फिटेनेसची आवड असणार्या मित्राची किंवा मैत्रिणीची निवड करा. ही मंडळी तुम्हाला व्यायामाची प्रेरणा देतील.