ऋतूबदल तसंच अन्य कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तापाची समस्या निर्माण होते. यावर काही घरगुती उपचारांसोबत डॉक्टरांचा सल्लाही घेतला जातो. परंतु ताप हा आजार नसून आजाराचं लक्षण आहे हे समजून घ्यायला हवं. आजारावर इलाज झाल्याशिवाय ताप बरा होत नाही. त्यामुळेच अंगावर ताप काढण्याची सवय योग्य नाही.
नवजात बालकांच्या शरीराचं तापमान १00 डिग्रीपेक्षा जास्त आणि पाच ते सहा वयोगटातील मुलांच्या शरीराचं तापमान १0१ डिग्रीपेक्षा जास्त असेल तर ताप आहे असं समजलं जातं. बरेचदा स्पर्शाच्या आधारे शरीराच्या वाढलेल्या तापमानाचा अंदाज घेऊन ताप आहे अथवा नाही हे ठरवलं जातं. पण ही चुकीची पद्धत आहे. ताप मोजण्यासाठी थर्मामीटरचाच वापर करावा. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांच्या काखेत तीन ते पाच मिनिटे थर्मामीटर ठेवून वाढलेल्या तापमानाची नोंद घ्यावी. पाच वर्षांपुढील मुलांच्या तोंडात थर्मामीटर ठेवून तापमानाची नोंद घ्यावी.
ताप आल्यास एक चार्ट बनवावा आणि दर चार-सहा तासांनी शरीराच्या बदलत्या तापमानाची नोंद करावी. रुग्णाला कोंदट जागी ठेवू नये. खोलीचं तापमान सामान्य असावं. पेयाची मात्रा वाढवावी. मुख्यत्वे ताप आला असता मुलांना थंड पाण्याने आंघोळ घालू नये.