डॉ.कालिदास शिंदे यांचे ‘झोळी’ आत्मकथन प्रातिनिधिक विमुक्त व भटक्या जमातींच्या आत्मसन्मानाचा निखारा

    भारतामध्ये अठरापगड जाती जमातीचे लोक राहतात. यामध्ये अनुसूचित जाती ,जमाती, भटके, विमुक्त ,ग्रामीण ,आदिवासी, इत्यादी जाती-जमाती दलित वर्गामध्ये मोडतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ,शूद्र या चार वर्ण व्यवस्थेमध्ये शूद्र हे दलित, पददलित म्हणून ओळखले जातात .या जातीय उतरंडीमध्ये शूद्र हलके, कमी प्रतीचे व्यवसाय करत राहिले ,म्हणजेच वरील तीन वर्गांची सेवा करत राहिले .या दलित पददलित वर्गावर अन्याय अत्याचार होताना दिसतात. ओबीसी ,एससी या वर्गातील जाती स्थायिक स्वरुपाच्या आढळून येतात .तर भटके-विमुक्त जमाती स्थानिक स्वरूपाच्या नसतात .नाथपंथी डवरी गोसावी त्यापैकीच एक जमात आहे .दलित साहित्यामध्ये अनेक आत्मचरित्रे गाजली नाथपंथी डवरी गोसावी जमातीतील डॉ.कालिदास शिंदे यांनी लिहिलेले आत्मचरित्र झोळी नुकतेच माझ्या वाचनात आले.

    डॉ.कालिदास शिंदे लिखित झोळी आत्मकथन समिक्षा पब्लिकेशन प्रकाशक श्री.प्रवीण अनिलराव भाकरे यांनी प्रकाशित केले आहे. सदर आत्मकथन पर पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मा.लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते व शिवाजी विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख प्रसिद्ध ज्येष्ठ समीक्षक,प्राध्यापक रणधीर शिंदे व काळजातला बाप कार दलित साहित्यिक प्रा.अरूण कांबळे बनपुरीकर व या पुस्तकाचे प्रकाशक श्री. प्रविण भाकरे इत्यादींच्या उपस्थितीत 31 जुलै 2021 रोजी संपन्न झाले .सध्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिघंची जिल्हा सांगली पाल निवासावर जाऊन श्री.शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन झोळी आत्मकथन ला हार्दिक शुभेच्छा दिल्या. झोळी हे आत्मकथन अर्पण पत्रिका म्हणजे एक ओवी स्वरुपात आहे. या अर्पणपत्रिकेत बळीराजा, लेखकाचे आई-वडील ,छत्रपती शिवाजी महाराज ,राजे उमाजी, महात्मा फुले ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, व विमुक्त व भटक्या जमाती,नाथपंथी डवरी गोसावी समाजाला अर्पण केले आहे.

    डॉ.कालिदास शिंदे यांच्या झोळी आत्मकथनास सोलापूरचे श्री.बाळकृष्ण रेणके माजी अध्यक्ष राष्ट्रीय आयोग विमुक्त जाती व भटक्या जमाती नियम भटक्या जमाती भारत सरकार नवी दिल्ली यांचा शुभ संदेश मिळाला आहे .तर पुणे येथील लक्ष्मीकांत देशमुख माजी संमेलनाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदे 2018 यांची प्रस्तावना लाभली आहे .त्याच बरोबर डॉक्टर सुदाम राठोड शिकूचा तांडा जाटदेवळे तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर यांनी झोळी च्या वेदना या नावाने मनोगत व्यक्त केले आहे .भि.रा. इदाते दादा चेअरमन, विमुक्त घुमा तू विकास व कल्याण बोर्ड भारत सरकार नवी दिल्ली यांचा शुभ संदेश मिळाला आहे . झोळी या आत्मकथन लेखनास उचल्या कार ज्येष्ठ साहित्यिक श्री .लक्ष्मण गायकवाड मुंबई साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखकाचे मार्गदर्शन पर शुभ संदेश मिळाला आहे.

    डॉ. कालिदास शिंदे यांचे झोळी या आत्मकथनपर पुस्तकाची बांधणी सुंदर झाली आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ पुणे येथील चित्रकार अरविंद शेलार यांनी तयार केले आहे .प्रस्तुत मुखपृष्ठावर नाथपंथी डवरी गोसावी जमातीतील एक जोगी कुटुंब दाखविले आहे .वृद्ध आजोबा,वडील ,आई ,चुलते, चुलती, स्वतः लेखक ,लेखकाची बहिण-भाऊ इत्यादी सर्व कुटुंब आपले संसार कुटुंबीय रेखाचित्र रूपाने मांडले आहे . कुटुंबाचे साहित्य घोड्यावर लादून प्रवासाला निघाले आहे.सोबत दोन कुत्री आहेत.वेळ सकाळची आहे .सूर्यदेव क्षितिजावर बाल किरणे सोडत आहे .पार्श्वभूमीला अंधार काळोख दाटलेला आहे .अजुन उजडायचे आहे .आज इथे तर उद्या तिथं चल माझ्या मैतरा अशी अवस्था दाखवली आहे. मुखपृष्ठ फार बोलके झाले आहे. या चित्रातून भटके जीवन दाखवण्यात आले आहे.या पुस्तकाचे मलपृष्ठ विषयी थोडे,मलपृष्ठावर लेखकाचा फोटो दिला आहे. लेखक पालावरचा कालिदास ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस संस्थेतून बाहेर पडलेला डॉ. कालिदास शिंदे यांचा जीवनपट विषयी माहिती प्राध्यापक डॉ. श्यामल गरुड मराठी विभाग मुंबई विद्यापीठ यांचे डॉ.कालिदास शिंदे लिखित झोळी बद्दल मनोगत मांडण्यात आल आहे .नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा उगम जीवनपद्धती, रितीरिवाज, भटके जीवन यावर प्रकाशझोत टाकताना दिसतात. एकंदरीत मलपृष्ठ ही खूपच देखणे झाले आहे.

    हे आत्मकथन लिहिताना जसं घडलं तसं लिहिलं, जे पाहिले ते लिहिलं ,जे अनुभवलं ते लिहिलं. माणदेशी भाषा हा लेखन बाज डॉ. कालिदास शिंदे यांनी वापरला आहे .त्यांचे वडील स्टोह दुरुस्ती, भिक्षा मागणे, पतार पूजने ,जागरण ,गोंधळ घालणे, शिकार करणे ,मासेमारी करणे, छत्री दुरुस्त करणे ,इत्यादी कामे करून चरितार्थ चालवतात. त्यांची आई भिक्षा मागणे. भिकबाळी मदत मागणे इत्यादी कामे करतात व मुला लेकरांना खाऊ घालतात. त्यांना स्वतःचे राहायला घर नाही. भटकंती करत राहणे ही त्यांची जीवनपद्धती आहे. हे करत असताना आपल्या मुलांना चांगले दिवस यावेत. ही भावना त्यांच्या मनामध्ये आहे. यासाठी ते लेखक कालिदास त्यांचा भाऊ अमोल ,नवनाथ, इत्यादी ना कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथील आश्रम शाळेत ठेवतात. काही दिवस सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथील आश्रम शाळेत शिक्षण घेतात.शिक्षण घेत असताना दिवाळीच्या सुट्टीला व मेच्या उन्हाळी सुट्टीला ते आई-वडिलांसोबत पालावर राहताना दिसतात. राहण्याचे पाल नेहमी बदलत असत सध्या मुक्काम कोठे आहे यासंबंधीची माहिती पालक पत्राने कळवत असत त्यानुसार लेखक कालिदास शिंदे व त्याचे बंधू-प्रकल्प प्रवास करून सदर ठिकाणी ट्रकने जात असत.त्यांची भिक्षा मागून आणलेले लाडू करंज्याचा शिळा फराळ खाऊन दिवाळी साजरी होते. त्यांना मागून आणलेली जुनी कपडे सण उत्सवात घालावी लागतात. भिक्षा मागणे, नवनवीन ठिकाणी जाणे हे भटके जीवन त्यांच्या पाचवीला पुजलेले आहे. जमातीमध्ये कमालीची व्यसनाधिनता आढळून येते. त्यामुळे त्यांच्या संसारामध्ये उदासीनता व आर्थिक तारांबळ सदा सर्वदा भरलेले असते.भांडणे,जात पंचायतीचे नियम,यातून त्यांना सतत जावे लागते .या समाजामध्ये शिक्षणाविषयी अनास्था दिसून येते. लेखकाचे आई-वडील मात्र शिक्षणाविषयी प्रेम असणारे आहेत .ते आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट करतात . मुलांना शिक्षणासाठी पैसे पुरवितात. आपण उपाशीपोटी राहतात.लेखक कालिदास शिंदे यांनी परिस्थितीचे भान ठेवून शिक्षणावर प्रेम केले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे प्रेरणास्थान आहेत.ते अनेक अडचणीवर मात करून शिक्षण घेताना दिसतात. शाळेत त्यांनी चांगले गुण मिळविले आहेत. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण फलटण येथे झाले. कालिदास शिंदे इंग्रजी विषय घेऊन बीए झाले आहेत .त्याने कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ मध्ये एम एस डब्ल्यू हा शासकीय अधिकाऱ्यांचा व्यवस्थापकीय कोर्स केला आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई तर्फे त्यांनी एम फिल कोर्स पूर्ण केला आहे. त्याच बरोबर टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई तर्फे पीएचडी केली आहे नाथपंथी डवरी गोसावी या समाजाचा त्यांनी अभ्यास केला आहे. त्यांनी मानववंशशास्त्राच्या चांगला अभ्यास केला आहे.

    डॉ. कालिदास शिंदे यांनी झोळी आत्मकथनमध्ये माणदेशी भाषा वापरली आहे. नाथपंथी डवरी गोसावी यांची एक वैशिष्ट्यपूर्ण भाषा या आत्मकथनामध्ये वाचायला मिळते. बोलीभाषेतील शब्द व त्याचे अर्थ या चरित्र ग्रंथाच्या शेवटी दिले आहेत . उदाहरणार्थ खंपाळला म्हणजे पळाला ,जोगिन समाजातील स्त्री ,जोगी समाजातील पुरुष ,गवणी म्हणजे चप्पल, झुकली म्हणजे कुत्री, किरव म्हणजे खेकडा ,वैतने म्हणजे खाणे, खूरपुसि म्हणजे घोरपड, लिवका म्हणजे मुलगा, लिवकी म्हणजे मुलगी ,खावड म्हणजे चोर ,राका म्हणजे पैसा,खावाडकी म्हणजे चोरी, इत्यादी पारिभाषिक शब्द डवरी गोसावी या समाजामध्ये वापरले जातात.

    नाथपंथी डवरी गोसावी जमात म्हणजे गृहस्थाश्रमी जोगी.पुरुष कुटुंबात राहून देवभक्ती पूजाअर्चा करणे,भगवे वेश घालून वैराग्य दाखवणे,नाथपंथी डवरी गोसावी हे स्वतःला भैरवनाथाचे वंशज समजतात.भिक्षा मागणे म्हणजे आमचा धर्म आहे असे सांगतात. प्रामाणिक वागणे,निंदानालस्ती न करणे ,चोरी न करणे ,धर्माचे आचरण समजतात.मागून खाणे हे आपल्या पूर्वजानी दिलेली देणगी समजतात.प्रत्येक स्त्री पुरुष यांना नैतिकतेचे अधिष्ठान असते. बहुतांशी पुरूष दारूचे व्यसनी असतात. स्त्रिया मात्र भिक्षा मागण्याचे काम करून कुटुंब पालन-पोषण करताना दिसतात. जीवन जगत असताना लेखकाच्या कुटुंबामध्ये अनेक अडचणी येतात.इचलकरंजीला आजोबा मधुमेहाने आजारी असतात. त्यांचा पाय काढावा लागतो.त्याचे दवाखान्याचे बिल भागवणे,पनवेल परिसरात आई रस्ता क्रॉस करत असताना एसटी बसने तिला ठोकणे . तिला औषध उपचार करणे ,चुलता दारू पितो म्हणून त्याच्या मुलाने डोक्यात काठी घालने रक्तबंबाळ करणे,त्यांना आर्थिक मदत करणे, त्यांच्या कुटुंबांना समजावून सांगणे, वडील दारू पिऊन घरात आईशी भांडण करणे ,घरात कोलाहल माजणे ,घर बांधत असताना जागेचा वाद मिटवणे,कर्ज काढणे,गवंड्याच्या हाताखाली काम करणे, घरबांधणीसाठी आर्थिक मदत गोळा करणे,इतर भावांची शिक्षण फी भागवणे , घराचा खर्च चालवणे इत्यादीसाठी लेखक डॉक्टर कालिदास शिंदे स्वतःला मिळणाऱ्या स्कॉलरशिप ,पीएचडी फेलोशिप मधील पैसे खर्च करताना दिसतात.एक प्रामाणिक धडपडी मुलगा, विद्यार्थी म्हणून त्यांचे प्राध्यापक सुतार सर यांचेकडून श्री .शिंदे यांना आर्थिक मदत देतात.उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील सोनारी येथील सिद्धनाथ देवस्थान हे त्यांचे मूळ पीठ आहे .तेथे ते सखोल अभ्यासासाठी नाथपंथीय दीक्षा घेतात.लेखकाने डवरी समाजाचा अभ्यास करताना सदर दीक्षा घेतल्याचे कबूल करतात.तसे मांसाहार करणे हे डवरी जोगीमध्ये त्याज्य समजले आहे .पण भटकंती करताना शरीरामध्ये ताकद यावी म्हणून ते मटन मांस खाताना दिसतात.नाथपंथी डवरी गोसावी शिकार करण्यासाठी कुत्री पाळतात.तीतर ,घोरपडी, ससे यांची शिकार करतात .तर कधी लग्न झाल्यानंतर बोकड कापून समाजाला जेवण घालतात. इ नाथपंथी डवरी समाज याची वैशिष्ट्ये लेखकाने या आत्मचरित्रात मांडलेली आहेत.

    दलित साहित्यामध्ये आत्मकथने भरपूर आली आहेत.ती भरपूर गाजली आहेत.विद्यापीठ पातळीवर शाळा, महाविद्यालयातील अभ्यासक्रमाला लागली आहेत.यामध्ये बाबुराव बागुल यांचे मरण स्वस्त होत आहे , दया पवार यांचे बलुत ,साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लक्ष्मण गायकवाड यांचे उचल्या,गुलाब वाघमोडे यांचे रानभैरी, पार्थ पोळके यांचे आभरान,दादासाहेब मोरे यांचे गबाळ,माणदेशी साहित्यिक शंकरराव खरात यांचे तराळ अंतराळ ,उत्तम बंडू तुपे यांचे काट्यावरची पोटे,माधव कोंडविलकर यांचे अजुन उजडायचे आहे ,शांताबाई कांबळे यांचे माझ्या जन्माची चित्तरकथा प्र .ई. कांबळे यांचे आठवणीचे पक्षी इत्यादी आत्मचरित्रे विशेष प्रसिद्ध आहेत. डॉ. कालिदास शिंदे यांचे झोळी हे आत्मकथन सुद्धा या पठडीतलेच म्हणावे लागेल. शिक्षण घेत असताना त्यांनी प्राप्त परिस्थितीचे भान ठेवून खूप अभ्यास केला आहे .अगदी विजेच्या खांबाच्या खाली बसून व दिव्या खाली रात्रीचा अभ्यास केला आहे.झोपडीमध्ये अस्ताव्यस्त अवस्थेत ही अभ्यास केला आहे.रिकाम्या पोटाने ही शिकण्याचीआस्था ठेवली आहे. सुट्टीच्या वेळी अगदी भिक्षा मागत ते भटकले आहेत.समाजाचं आपण काही तरी देणे लागतो या भावनेने समाजामध्ये फिरून त्यांनी समाजातील रूढी,परंपरा, रितीरिवाज,धार्मिक भावना समाजाचे प्रबोधन व कर्तव्य भावना व्यक्त करताना दिसतात.या जमातीतील लोकांचे गावाबाहेर पालावरचं जगणं हा एक त्यांच्या जीवनाचा भाग आहे.लोकांची हगनदारी ती आपली वतनदारी हे त्यांचे तत्त्व आहे .कारण राहुटी करत असताना स्मशानभूमीजवळ हागनदारीला गावठाण जमिनी कुरण शेती अशा ठिकाणी त्यांना पाल ठोकावे लागते. मच्छर ,घाणी वरल्या माशा याच्याशी संघर्ष करत दलदल चिखलामध्ये पडत्या पावसात साठलेल्या पाण्याजवळ त्यांना राहावे लागते.दलित साहित्यामध्ये बरीच आत्मकथने ही नोकरीला लागल्यानंतर घरेदारे बांधल्यानंतर लिहिलेली दिसतात पण कालिदास शिंदे यांनी शिक्षण घेत असतानाच आलेला जीवन अनुभव व केलेला संघर्ष झोळी या आत्मचरित्राच्या रूपाने मांडला आहे. झोळी हे आत्मकथन नाथपंथी डवरी गोसावी जमातीला एक दीपस्तंभ ठरणार आहे.

    मुला-मुलींची लग्ने विधी पार पडल्यानंतर पतार पूजने ,गोंधळ घालणे,इत्यादी धार्मिक विधी पार पाडताना,उच्चभ्रू लोक पूजा करताना नाथपंथी डवरी गोसावीच्या पाया पडतात.दक्षिणा म्हणून नाम मात्र पैसे देतात.नंतर मात्र त्या जमाती जोगी डवरीला कवडी मोलाची किंमत नसते. भिक्षा मागत असताना वेगवेगळे अनुभव येतात.काही लोक अंगावर धावून येतात तर कधी असे म्हणतात की,चांगले धट्टेकट्टे आहात मग काम धंदा का करत नाही.असे त्यांना पुन्हा पुन्हा ऐकावे लागते.यावेळीही परंपरा जपणारे,डवरी जोगी निलाजरे बनले आहेत,परंपरा सोडायला तयार नाहीत हे दुःखही डॉ. शिंदे मांडताना दिसतात. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे काही नाथपंथी डवरी गोसावी भिक्षा मागण्यासाठी जातात.त्यापूर्वी तेथे लहान मुले पळविण्याची टोळी आली आहे.अशी अफवा पसरवण्यात आली होती.अशा प्रसंगाचे वेळी हे नाथपंथी जोगी एसटीतून प्रवास करून सदर ठिकाणी उतरले असता तेथील लोकांनी त्यांच्या जवळचे आधार कार्ड तपासून पाहूनही ते मुले पळवणारी टोळी समजतात.आणि मार मार मारतात.यावेळी सात लोकांचा बळी घेण्यात आला.वृत्तपत्रातून बातम्या आल्या.टीव्ही न्यूज झाले.सामाजिक कार्य म्हणून लेखक डॉक्टर कालिदास शिंदे सदर ठिकाणी हजर राहिले व त्यांना शासकीय मदत मिळवून दिली.आज या जमातीपुढे भिक्षा मागावी की नको हा प्रश्न उभा आहे.चरितार्थासाठी काही व्यवसाय उपलब्ध नाहीत.व्यवसाय उभारण्यासाठी त्यांच्याजवळ भांडवल नाही.राहायला घर नाही.शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नाहीत.अशी अवस्था समाजामध्ये निर्माण झाली आहे.स्वतः डॉ.कालिदास शिंदे उच्च शिक्षा विभूषित असूनही त्यांना अद्याप ही कायम स्वरुपी नोकरी नाही.शासन नोकर भरती काढत नाही.परीक्षेचे निकाल लवकर जाहीर करत नाहीत.निकाल लागला तरी लवकर पोस्टिंग दिली जात नाही. वशिलेबाजी,जवळचा,लांबचा हा विचार केला जातो.धनदांडगे लोक पैसे देऊन आपापली कामे साधून घेतात.सरकार प्रत्येक क्षेत्रात खाजगीकरण आणू पाहत आहे.अशा परिस्थितीमध्ये जगावे की मरावे हा प्रश्न आ वासून समोर उभा आहे. घरचे ,जमातीतील लोक केव्हा नोकरी लागणार? म्हणून विचारतात.त्यावेळी काय सांगावे हा प्रश्न निर्माण होतो. प्रस्तुत समाजाला प्रभावी नेता नाही.गाव पातळीवर मान नाही. राजकीय पटलावर आमदार-खासदार पद नाही.ना घर का ना घाट का अशी अवस्था या समाजाची झाली आहे. याची चीड लेखक डॉ.कालीदास शिंदे यांना आहे.आपल्या कर्तुत्वाने बंड पुकारणारे, जमातीतील फार थोडी माणसे शिकून कर्तबगार झाली आहेत.पदवीपर्यंतचे शिक्षण अपवादाने आढळते मुलींचे शिक्षण तर दहावीच्या पुढे झालेले नाही.डॉ.कालिदास शिंदे यांच्या रूपाने आई-दादांना,पत्नीला, नातेवाईकांना,जमातीला एक कर्तबगार माणूस मिळाला आहे. नाथपंथी डवरी गोसावी जमातीने कालिदास याला समजून घ्यावे.त्याला क्रांतिकारी साथ द्यावी साथ द्यावी असे मनोमन वाटते.डॉ. कालिदास शिंदे अल्पवयात बऱ्याच महान व्यक्तींशी संपर्कात आले आहेत.त्यांना बरंच काही करायचं आहे.भराडी, गोंधळी,डमरू वाजवणे,संबळ वाजवणे,शाहिरी काव्य गायन करणे,कथा,पुराण अध्यात्मातून मांडणी करणे,इत्यादी कला या जमातीने जोपासल्या आहेत.त्यांना शासनाकडून कलाकार मानधन मिळावे त्यांच्या मुलांना आश्रम शाळेत प्राधान्याने प्रवेश द्यावा.त्यांना शैक्षणिक साधने पुरवावीत इत्यादी बाबतीत काम करण्याबद्दल त्यांच्यामध्ये उमेद आहे.नाथपंथी डवरी गोसावी व इतर भटक्यांच्या जमाती मिळून या जमातीसाठी आर्थिक विकास महामंडळ शासनाकडून मागून घ्यावे निरनिराळे व्यवसाय त्यातून निर्माण होतील आणि ही झोळी कायमची बंद करतील अशी आशा वाटते.डॉ. कालिदास शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन पेपर वाचन वृत्तान्त लिहिले आहेत.प्रकाशित केले आहेत.त्यांचे काही लेख वृत्तपत्रातून प्रकाशित झाले आहेत.त्यांनी राष्ट्रीय विमुक्त व भटक्या जमाती आयोग यांना संशोधनास मदत व सहभाग नोंदवला आहे.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चासत्रात सहभाग घेतला आहे.त्यांनी झोळी या आत्मकथनाचा बरोबरच काही कथा,कादंबरी कविता,गोंधळ गीते,भारूड, लोकसंस्कृती,लोककला,बोलीभाषा याचा अभ्यास केला आहे.त्यावर लेखन केले आहे.लवकरच ते प्रकाशनासाठी वाटचाल करणार आहेत.त्यांनी विविध विषयावर व्याख्याने दिली आहेत.डॉ. कालिदास शिंदे धडपडी, प्रामाणिक,सद्भावना,कर्तबगार, तळमळीचे बंडखोर, समायोजन,इत्यादी गुणधारक आहेत.

    ग्रंथाच्या शेवटी राईनपाडा धुळे संबंधी अर्पण पत्रिकेत ते म्हणतात…
    संशयाचं थैमान देशाला
    अफवाच भूत उशाला
    सरकारनुसतं आश्वासनाला
    कित्येकांचा जीव असाच गेला
    चोर सोडून फाशी संन्यासाला
    सजा न केलेल्या गुन्ह्याला
    जमात लागली झुरणीला
    अश्रू आले धरणीला
    नाय दाद सरणाला
    स्वतःच्या मरणाला
    स्वतः सरण चाललो रचाला
    आम्ही जगतो मरण उशाला अंधकारमय जीवन वाट्याला
    काम द्या हाताला
    सन्मान हवा संविधानाला
    आमच्या उपेक्षित जगण्याला
    बास करा आयोगाला
    न्याय द्या जन्माच्या भोगाला
    आता कलंक नको कपाळाला
    मुक्ती द्या भिक्षापात्रला
    सांगतो आता जमातीला
    या समयाला
    जागा हो हा केला
    प्रेरणा घेत बाबासाहेब आला
    शिका संघटित व्हा संघर्षाला

    शोध एका जमातीचा या उद्देशाने नाथपंथी डवरी गोसावीकडे पहावे हा समाज देशामध्ये धार्मिक स्थळे सोनारी,म्हसवड,खरसुंडी, विटा,दिघंची हे व इतर तीर्थस्थानच्या ठिकाणी नाथपंथी तीर्थक्षेत्रे ज्या ज्या ठिकाणी आहेत तेथे डवरी जमात आढळून येते.या समाजाचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. हे उद्दिष्ट डॉ. शिंदे यांनी धारण केले आहे .एक प्रादेशिक अभ्यास म्हणून झोळी आत्मकथनकडे पहावे.काही ठिकाणी देवस्थान शेती ,वतन,काही उच्चभू लोकांनी खरेदी व्यवहार केले आहेत. अतिक्रमित आहेत.शासनाने याकडे विशेष लक्ष द्यावे.त्यांच्या जमिनी त्यांना मिळवून द्याव्यात असे डॉ.कालिदास शिंदे यांना मनोमन वाटते.आणि यासाठी त्यांनी दिघंची या ठिकाणी प्रयत्न केला आहे .डॉ.कालिदास शिंदे यांचे झोळी हे आत्मकथन दलित साहित्यमध्ये समाविष्ट झाले आहे. हे त्यांचे पहिले साहित्यिक पाऊल आहे ते अधिक दमदार आहे.यापुढेही लेखन अधिक दमदार व्हावे असे मनोमन वाटते. हे आत्मकथन विद्यापीठ पातळीवर अभ्यासाला लागावे,त्यावर चर्चासत्रे घडून यावीत,असे मला वाटते डॉ.कालिदास शिंदे यांनी आपली साहित्यिक पावले यापुढेही दमदार रीतीने टाकावीत. ती पडतील यामध्ये मला तिळमात्र शंका नाही.त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो.सदर लेखन कला कृतीस अनेक पुरस्कार मिळावेत.ही मनोकामना….

    समीक्षक
    रमेश जावीर
    Kharsundi
    ता. आटपाडी जि. सांगली
    संपर्क
    डॉ.कालिदास शिंदे
    पाल निवासी
    9823985351
    मु.पो.दिघांची
    ता.आटपाडी
    जि.सांगली
    महाराष्ट्र राज्य
    पुस्तकाची किंमत : पाचशे रुपये
    (20 टक्के सवलत देण्यात येईल.)

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
YouTube
Pinterest
LinkedIn
Instagram

Leave a comment