१२ जानेवारी हा राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस.ज्या मातेने या विश्वाला दोन छत्रपती दिले त्या राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव.जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथे दरवर्षी १२ जानेवारीला हा महोत्सव लाखो शिवप्रेमींच्या उपस्थितीत भव्य दिव्य प्रमाणात साजरा होतो. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी काही सहकार्यांसोबत तीस वर्षांपूर्वी सुरू केलेला हा जन्मोत्सव आज आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये साजरा होत आहे.याचे श्रेय मराठा सेवा संघ,पुरुषोत्तम खेडेकर साहेब तसेच मराठा सेवा संघाच्या लाखो कार्यकर्त्यांना जाते.छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सर्वांच्याच मुखी आहे.परंतु त्यांची माता असलेल्या व त्यांना घडवण्यात महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊंविषयी मात्र कोणीही बोलत नव्हते,लिहित नव्हते,ऐकत नव्हते.अशा वेळी मराठा सेवा संघाने राष्ट्रमाता जिजाऊंना प्रेरणास्थानी मानून सर्वप्रथम चित्राच्या माध्यमातून जगाला जिजाऊंची ओळख करून दिली.त्यानंतर जिजाऊंचा वास्तवादी इतिहास आपल्या अभ्यासू लेखकांच्या माध्यमातून जगासमोर आणला व त्यानंतर दरवर्षी १२ जानेवारीला मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव सुरु केला.
हळूहळू या उत्सवाची व्याप्ती आणि आकर्षण वाढत गेले आणि बघता बघता या उत्सवाने विराट स्वरूप धारण केले. देशभरातून आणि देशाच्या बाहेरून सुद्धा लाखो जिजाऊप्रेमी दरवर्षी सिंदखेडला यायला लागले आणि राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन, त्यांचा आशीर्वाद घेऊन व नवी ऊर्जा घेऊन आपापल्या गावी परत जायला लागले.मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रकोपामुळे या उत्सवावर विरजण पडले आहे.त्यामुळे लाखो जिजाऊप्रेमी नाराज झाले आहेत.परंतु या वर्षी पुन्हा नवी उर्जा,नवा जोश आणि नवीन चैतन्य घेवून हा आंतरराष्ट्रीय महोत्सव मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे.मराठा सेवा संघाने जिजाऊ जन्मोत्सवाला एक नवे परिमाण प्राप्त करून दिले आहे.एखाद्या महापुरुष किंवा महानायिकेचा जन्मोत्सव कसा साजरा करायचा असतो याचे आदर्श उदाहरण मराठा सेवा संघाने जगासमोर ठेवले आहे.कोणत्याही प्रकारचे निरर्थक कर्मकांड किंवा भक्तीमध्ये लीन न होता आमच्या महापुरुषांच्या वास्तववादी इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी मातृतीर्थावर प्रबोधनाची परंपरा सेवा संघाने सुरू केली.त्यामुळे हा जन्मोत्सव म्हणजे विचारांना दिशा देणारा प्रबोधनरुपी मेळा म्हणून सर्वत्र त्याची जोरदार चर्चा असते. त्याचबरोबर देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रज्ञावंत आणि गुणवंतांचा जिजाऊ पुरस्काराने जाहीर सत्कार त्याठिकाणी करण्यात येतो.एवढेच नाही तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनुष्याला पोटाच्या खाद्याबरोबरच मेंदूच्या खाद्याची सुद्धा नितांत आवश्यकता असते ही गोष्ट लक्षात घेऊन त्या ठिकाणी वैचारिक व बौध्दिक पुस्तकांची मोठ्या प्रमाणात दुकाने लावली जातात.एकाच दिवशी रेकॉर्डब्रेक अशी चार ते पाच कोटी रुपयांची विविध स्वरूपांची पुस्तके जिजाऊ सृष्टीवर विकल्या जातात व हे बौद्धिक खाद्य घेऊन लोक वर्षभराची ऊर्जा आपापल्या घरी आनंदाने घेऊन जातात.या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग असतो.भारताच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने महिला सुद्धा सहभागी होतात. महिलांना सन्मानाचे स्थान देऊन त्यांनाही आपले विचार प्रकट करण्याची संधी दिल्या जाते.त्यामुळे खऱ्या अर्थाने अपेक्षित असलेली स्त्री पुरुष समानता या महोत्सवाच्या माध्यमातून मातृतीर्थावर पाहायला मिळते.
सिंदखेडराजाला ११ हजार कोटींचे जिजाऊ सृष्टीच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे.सरकारी मदतीविना लोकसहभागातून हे काम सुरू आहे.त्यामुळे काम पूर्णत्वास येण्यास उशीर होत आहे.जिजाऊप्रेमींच्या सहकार्याशिवाय हे काम शक्य नाही.त्याच ठिकाणी सिंधू संशोधन केंद्र सुद्धा सुरू झाले आहे.त्या माध्यमातून भारतीय संस्कृतीच्या अस्सल व खऱ्या इतिहासाचे संशोधन व मांडणी होणार आहे.नुकतेच त्या ठिकाणी महिलांसाठी एक मोठे हॉस्पिटल सुद्धा सुरू झाले आहे. तसेच परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी एक अत्याधुनिक स्वरूपाची ॲम्बुलन्स सुद्धा उपलब्ध झाली आहे.पुढील काळात जिजाऊ सृष्टीवर अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प प्रस्तावित आहे व त्या दृष्टीने मराठा सेवा संघाचे पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेत आहे.येणाऱ्या काळात जिजाऊ सृष्टी हे जगभरातील लोकांसाठी एक आदर्श आणि अविस्मरणीय असे पर्यटनाचे स्थळ म्हणून उदयास येणार आहे. त्याकरिता मराठा सेवा संघाच्या प्रयत्नाला आपण सर्वांनी सुद्धा शिवप्रेमी म्हणून हातभार लावणे व तन-मन-धनाने सहकार्य करणे हे आपले कर्तव्य आहे.
आज सिंदखेडराजाला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे.या ठिकाणी तीस वर्षांपूर्वी फारसे कोणी येत नव्हते व जिजाऊंचे जन्मस्थान पूर्णपणे दुर्लक्षित होते.सरकारची अनास्था होती.तथाकथित इतिहासकारांनी या ठिकाणाला व जिजाऊंच्या कार्याला मोठ्या प्रमाणात लोकांसमोर आणले नाही.त्यामुळे ज्या ठिकाणावरून स्वराज्याचा उगम झाला,अशा राष्ट्रमातेच्या जन्मस्थळाची अवहेलना झाली होती.राजवाड्यामधे ढोरे, डुकरे,कुत्रे त्यांचा वावर होता हे आम्ही सुरुवातीच्या काळात प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितले आहे.ते पाहून प्रचंड वेदना होत होत्या.त्यामुळे मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी पुढाकार घेऊन राजवाड्याच्या समोरच जिजाऊ जन्मोत्सव घेण्यास सुरुवात केली.त्यामुळे हळूहळू राजवाडा व परिसराचा कायापालट व्हायला लागला. सरकारचेही लक्ष गेले आणि आज राजवाडा अतिशय सुंदर आणि देखणीय स्वरूपात आपणाला दिसून येतो.तसेच सेवा संघाच्या पुढाकारातून त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते जिजाऊंच्या भव्य पुतळ्याचे अनावरण सुद्धा त्याठिकाणी करण्यात आले.आज या ठिकाणी वर्षभर असंख्य पर्यटक येतात.ही सेवा संघाची देण आहे.
राजवाड्यासमोर होणाऱ्या जन्मोत्सवाला दरवर्षी लोकांची गर्दी वाढतच होती.शेवटी त्या ठिकाणी लोक मावत नव्हते. म्हणून २००५ पासून सिंदखेडपासून तीन किलोमीटर अंतरावरील मराठा सेवा संघाने निर्माण केलेल्या जिजाऊ सृष्टीच्या भव्य अशा जागेवर लाखोंच्या उपस्थितीत हा जन्मोत्सव साजरा होऊ लागला.२००५ ला शिवधर्माचे प्रकटन होते. त्यामुळे पहिल्याच वर्षी मातृतीर्थावर विराट जनसागर उसळला होता.गर्दीचे सारे उच्चांक मोडले गेले.हजारो गाड्या ठेवायला जागा कमी पडली होती.५-५ किमी.वरुन लोकांना गर्दीतून वाट काढत पायी चालावे लागत होते.आता दरवर्षी सुध्दा अशीच प्रचंड गर्दी मातृतीर्थावर असते.शिवधर्म पीठावर सुप्रसिद्ध विचारवंत डॉ.आ.ह. साळुंखे,खेडेकर साहेब व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शिवधर्माचे प्रगटन झाले. तेव्हापासून आजतागायत त्याच जागेवर १२ जानेवारीला दरवर्षी जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा होतो. पुस्तकांच्या रूपाने जिजाऊप्रेमी आपल्या घरी हजारो रुपयांची पुस्तके घेऊन जातात.कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमात ही पुस्तके लोकांना सप्रेम भेट देतात व जिजाऊ जन्मोत्सवाचे महत्त्व विशद करतात.मराठा सेवा संघाच्या प्रयत्नांमुळेच सिंदखेडराजाला आज एक वैभवशाली आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरूप प्राप्त झाले आहे हे कोणीही नाकारू शकत नाही.त्यामुळे शिवरायांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मातृतिर्थ सिंदखेडराजाला वर्षातून एकदा निश्चित भेट द्यावी व आपल्या राजाला घडवणाऱ्या मातेच्या पवित्र ठिकाणाचे दर्शन घ्यावे. जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांमधून जिजाऊंच्या प्रेरणेतून आम्हाला आधुनिक शिवराय आणि संभाजी महाराज घडवता येतील व या देशाची विस्कटलेली घडी नीट बसवण्यासाठी जिजाऊंच्या चरित्राचा आणि चारित्र्याचा मोठा उपयोग होईल.तेव्हा १२ जानेवारीला किंवा मध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा प्रत्येकाने जिजाऊंच्या जन्मस्थळी नतमस्तक होण्यासाठी आयुष्यातून एकदा तरी निश्चितपणे यावे ही आग्रहाची विनंती.
- जिजाऊ जन्मोत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक सदिच्छा..!
- -प्रेमकुमार बोके
- अंजनगाव सुर्जी
- १२ जानेवारी २०२३
- ९५२७९१२७०६
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–