अमरावती : जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी १० एप्रिल २०२१ रोजी प्रवेश परिक्षा होणार असून, जिल्ह्यातील अधिकाधिक शाळांनी या प्रक्रियेत सहभाग द्यावा व आपल्या विद्यार्थ्यांना नवोदयमधील शिक्षणाची संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय व्यवस्थापन समितीचे चेअरमन तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
आता इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेद्वारे पुढील वर्षासाठी सहावीत प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येक शाळेने किमान आपले ३० ते ३५ विद्यार्थी परीक्षा प्रक्रियेत सहभागी होतील यादृष्टीने प्रयत्न करावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध सुविधांसह उत्तम निवासीय शिक्षण मिळवून देणारी ही संधी आहे. त्यामुळे शाळांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन या प्रक्रियेत सहभागी करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिले. शिक्षण विभागानेही यादृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
प्रवेश परीक्षा प्रक्रियेत सहभागासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार www.navodaya.gov.in आणि www.nvsadmissionclassnine.in, तसेच www. jnvamravati.org या संकेतस्थळावर अर्ज व माहिती १५ डिसेंबरपर्यंत उपलब्ध आहे.