जयभीम च्या निमित्ताने…

    तब्बल साडे पाच वर्षांनी आज चित्रपट बघितला. गेली दहा वर्ष झालीत माझे टी.व्ही.चे खूळ सुटून, मालिका अन सिनेमे तर कब के बहुत पिछेछुट चुके है! नाही म्हणायला टॉकीजला जाऊन ‘नटसम्राट’ अन त्यानंतर मे २०१६ ला ‘सैराट’ हा शेवटचा बघितलेला चित्रपट. भूल पाडू शकेल वा ‘हा चित्रपट बघितलाच पाहिजे!’ अशी अलीकडे पार आतून उत्कंठा ,आकर्षण, जिज्ञासा वगैरे अजिबात वाटत नाही किंवा एका ठिकाणी बसून २-३ तास द्यावे हेही बरेचदा बहुअंगी व्यापामुळे परवडण्यासारखे नसते पण ‘जयभीम’ पाहायचाच आणि सहकुटुंब पाहायचा! हे समाजमाध्यमातील ‘जयभीम’ वरील अभिप्राय, प्रतिक्रिया यामुळे प्रकर्षाने वाटत होते. शिवाय आज सकाळीच साम टीव्हीच्या फेसबुक पेजवर प्रसन्ना जोशी यांच्या ‘लक्ष असतं माझं’ मध्ये ‘बॉलिवूडला जयभीम करणं का जमत नाही?’ हे लाईव्ह ऐकून सारी कामं बाजूस सारून आज दुपारी दोन्ही मुलं आणि आम्ही नवराबायको अशा चौघांनी ‘जयभीम’ बघितला.

    अफाट,अचाट,असाधारण,अथक प्रवास म्हणजे ‘जयभीम’!‘जयभीम’ मध्ये कुणीच कुणाला ‘जयभीम’ म्हणालेलं नाही वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर वारंवार फोकस केलेले नाहीत तर वंचीत आदिवासी समूहातील गरीब ,निरक्षर, गरोदर स्त्रीला न्याय मिळवून देण्याचा जो झंझावाती न्यायनिष्ठ प्रवास ह्या आख्ख्या सिनेमात अडव्होकेट के. चंद्रुच्या साहाय्याने दाखविला आहे तो न्यायापर्यंतचा अफाट,अचाट, असाधारण, अथक प्रवास म्हणजे ‘जयभीम’!

    पोलीस कस्टडीमध्ये हत्या झालेल्या निरपराध नवऱ्याची विधवा केस मागे घेण्यासाठी डीआयजीचा भरगच्च रकमेचा प्रस्ताव लाथाडत म्हणते की, “माझा स्वाभिमान मला जास्त प्रिय आहे!” तेव्हा कळते हा चित्रपट ‘जयभीम’ का आहे? ” मै किस्मत पे भरोसा नही करता, सच्चाई पे करता हूं!” , “चोर कौनसी जाती में नही होता? मेरी,तुम्हारी सब की जाती में बडे बडे चोर होते है, पहले लोगों को जाती में बाटना छोड दो!” “हर पुलीसवाला बुरा नही होता और हर पुलीसवाला अच्छा भी नही होता!” “सिर्फ कानून ही मेरा हाथियार है!” हे करारी संवाद ऐकल्यावर कळते हा सिनेमा ‘जयभीम’ का आहे? ‘जयभीम’ हा मूळ तमिळ चित्रपट असलातरी जगभरातून मोठ्या प्रमाणात दर्शकांनी त्यास पसंती दर्शविलेली आहे ही ह्या चित्रपटातून मिळणाऱ्या वैचारिक संदेशाचे श्रेय आहे.

    सत्य घटनेवर आधारित चित्रपट

    १९९३ मध्ये घडलेल्या ‘राजकन्नू’ ह्या आदिवासी प्रामाणिक होतकरू तरुणाची पोलीस कस्टडीत अमानवी छळ करून हत्या करण्यात आली त्या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे आणि चेन्नई हायकोर्टात दीर्घकाळ चाललेला प्रसिद्ध ऐतिहासिक खटला म्हणून ह्या खटल्याची नोंद आहे. अडव्होकेट के.चंद्रु ह्यांनी रुपयाही फी न घेता लढलेले निर्दोष गरिबांचे मानवाधिकाराचे जे खटले आहेत त्यातील हा एक विशेष खटला. मुख्य प्रवाहाने युगायुगांपासून बहिष्कृत केलेल्या, गावकुसाबाहेर फेकलेल्या समूहातील माणसासाठी आणि इथल्या उच्चपदस्थासाठीदेखील कायदा सारखाच आहे हे हा चित्रपट जोरकसपणे अधोरेखित करतो.

    जयभीम ने व्यापलेला सिनेमा

    खरे तर चित्रपटात जयभीम कुठेच नाही तरीही हा जयभीमने व्यापलेला सिनेमा आहे. ‘जयभीम’ हा केवळ शब्द नाही तर तो स्वाभिमानाचा मंत्र आहे, अस्तित्वाची जाणीव देणारे तत्व, विवेक, सत्य आणि समतेची सर्वात कमी शब्दातील व्याख्या आहे. ‘जयभीम’ हे युगानुयुगे जातिव्यवस्थेच्या प्राणांतिक छळामुळे मुर्दाड केलेल्या शोषितांसाठी ‘प्राणतत्व’ आहे. न्यायाचा समानार्थी शब्दच मुळात ‘जयभीम’ आहे हे इथल्या प्रत्येक नागरिकाने लक्षात घेतले पाहिजे व त्यासाठी कुठलाही पूर्वग्रह मेंदूत न ठेवता ‘जयभीम’ बघणे अपरिहार्य आहे. अर्थात ‘देखो तो जानो’ असं आहे ते!

    चित्रपट सुरू झाल्यापासून संपेपर्यंत खिळवून ठेवतो , डोळे, कान,मेंदू,मन, विचारचक्र सजग ठेवतो. चित्रपट बघून-अनुभवून माझे पावणे तीन तास सत्कारणी लागलेत. चित्रपटात कुठेही बाबासाहेब नाहीत तरीही ते प्रत्येक क्षणाला दिसत राहतात, मेंदूत रेंगाळत राहतात हे खरे ‘जयभीम’ चे वैशिष्ट्य आहे.

    डॉ.आंबेडकरांच्या एका सहीने केवढा मोठा नाकारलेला समूह ‘माणूस’ झाला.पोलीस अधिकारी, सरपंचाघरच्या न केलेल्या चोरीची कबुली द्यावी म्हणून वाट्टेल त्या पद्धतीने हाल करून, रक्तबंबाळ करून, नातेवाईक, गर्भार पत्नी, निर्दोष बहीण ह्यांना भयावह पद्धतीने मारहाण करणारे चित्र संताप आणि अश्रू दोघेही अनावर करतात. आज आपण जे सन्मान-सुरक्षित आणि शिक्षित जिणे जगतोय ते बाबासाहेबांचे, संविधानाचे देणे आहे हे सिनेमा बघताना नववीत शिकणाऱ्या लेकाला सांगताना डोळे अखंड वाहत होते. चित्रपटात दाखवलेला निर्दोष राजकुन्नूचा रक्ताळलेला देह हे इथल्या इतिहासातले भीषण सत्य आहे कायदेमंत्री डॉ.आंबेडकरांच्या एका सहीने केवढा मोठा नाकारलेला समूह ‘माणूस’ झाला. हेही लेकाला सांगत राहिले.

    वरिष्ठांचा दबाव, खालच्या जातीबद्दलचा द्वेष हे सारे क्रूर वास्तव ‘जयभीम’ मध्ये दाखविण्यात आले आहे. खोट्या गुन्ह्यात अडकवून पोलीस कस्टडीमध्ये अमानवी अत्याचार करून हत्या केलेल्या गरीब आदिवासी नायकाची मृत्यूनंतरही होणारी भीषण अवहेलना, त्याच्या बायकोची घुसमट, न्यायासाठी वणवण, मानवाधिकाराचे खटले मोफत लढणारा संवेदनशील, विवेकी, सच्चा ,अभ्यासू हाय कोर्ट वकील चंद्रु हा असा व्यापक भव्य व चिरस्मरणीय पट ‘जयभीम’ आपणासमोर उभा करतो.

    शिक्षण, मतदानाचा अधिकार, कायद्याचे ज्ञान , संघटन, संघर्ष या बाबींचे महत्व ‘जयभीम’ ठळक लक्षात आणून देतो.चंद्रुच्या प्रत्येक हालचालीत ‘आंबेडकरवाद’ आहे, तो स्पष्ट दिसतो. फक्त ते ओळखण्याइतपत प्रेक्षकांच्या जाणिवा विकसित असाव्यात नाहीतर अनेकांकडे केवळ नावावरूनच काही गोष्टी गृहित धरण्याचे वैचारिक दारिद्र्य असते.

    ‘जयभीम’ ही अशी कलाकृती आहे ज्यात बाबासाहेब नाहीत तरीही बाबासाहेबच आहेत,त्यांचे विचार, सिद्धांत, तत्व, निर्भीडता, प्रचंड आत्मविश्वास , नागरिकत्वाची व्याख्या,शेवटच्या माणसाला ‘माणूस’ म्हणून स्थान मिळावे समतेचे स्वप्न, सामाजिक समान न्याय हे सारं चित्रपटभर प्रकर्षाने धाडधाड मनमेंदूवर आदळत राहातं.

    ‘जयभीम’ इथल्या प्रत्येकासाठी नवीन दृष्टी आहे, नवे ज्ञान , नवा बदल, नवा ध्यास ‘जयभीम’ इथल्या प्रत्येकासाठी नवीन दृष्टी आहे, नवे ज्ञान , नवा बदल, नवा ध्यास असला पाहिजे मग तो कुणीही अगदी कुणीही असो. राहता राहिला प्रश्न बॉलिवूड ‘जयभीम’ सारखे सिनेमे करण्याचे धैर्य का दाखवत नाही तर त्यामागे अनेक कारणे आहेत. आर्टिकल १५ ,आरक्षण व इतरही काही दुर्मिळ चित्रपटांच्या निमित्ताने थोडीबहुत वास्तवावर भाष्य करणारे सिनेमे येण्यास सुरुवात झालीय, खरे तर त्यासाठी खूप उशीरच झालाय तसा पण येणाऱ्या काळात तद्दन गल्लाभरू फालतू विषयांवरील सिनेमे कमी होऊन ही संख्या वाढेल अशी भाबडी आशा ठेवू, रसिकांनी चोखंदळ व्हावे म्हणजे तुमच्या अभिरुचीची दखल घेणे बॉलिवूडलादेखील भाग पडेल.

    लख्ख विवेकवाट म्हणजे ‘जयभीम’

    वास्तवावर बोलू, लिहू, ऐकू, बघू ब्रीद रसिकांचे असले पाहिजे पण भयंकर वर्तमानकाळात ते जरा कठीणच दिसतेय तरीही चित्रपटक्षेत्रात नवनवीन प्रयोग होत राहतील यासाठी आशावादी असू. कुठलेही गीत, रोमान्स, नृत्य वा अनावश्यक हिरोगीरी, स्टन्ट्स नसताना एक प्रगल्भ अंतर्मुख करणाऱ्या चित्रपटाचा रेकॉर्ड जयभीमने निर्माण केला आहे. चित्रपट म्हणजे केवळ मनोरंजन नाही तर अनेकांच्या आयुष्याला व विचारप्रक्रियेस मिळणारा असाधारण वळणबिंदू , लख्ख विवेकवाट असते व त्याचे चपखल उदाहरण म्हणजे ‘जयभीम’ होय.
    चित्रपट संपताच पडद्यावर ‘जयभीम’चा अत्यंत अचूक अर्थ एका कवितेत येतो तो म्हणजे-

    ‘Jaibhim means light
    Jaibhim means love
    Jai-bhim means journey
    From darkness to light
    Jaibhim means tears
    Of Billions of people!’

    भारतीय संविधान आणि कायदा यापुढे सर्व समान आहेत, कुणीही शोषक नको वा शोषित नको,सारे समान आहेत याची आठवण ‘जयभीम’ आपणास करून देतो. दिग्दर्शक टी. एस. ग्नानावेल यांनी ‘जयभीम’च्या रूपाने प्रचंड मोठे काम करून ठेवले आहे. अभिनेता-निर्माता सूर्या, नायिका लिजोमोल जोस, रजिशा विजयन, प्रकाशराज चित्रपट संपल्यावर देखील सतत स्मरणात राहतात! सत्याची ताकद, प्रामाणिकपणा, संवेदनशिलता, तत्वांशी असणारी बांधिलकी काय असते? व त्याचा प्रभाव किती असतो? हे अनुभवायचे असेल तर आज ‘जयभीम’ ला पर्याय नाही आणि नाहीच हे मात्र निश्चित!

    जयभीम!!
    -डॉ.प्रतिभा जाधव
    pratibhajadhav279@gmail.com
    लासलगाव (नाशिक)


—–

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
YouTube
Pinterest
LinkedIn
Instagram

Leave a comment