सत्तरच्या दशकात 1975 मध्ये शोले चित्रपट आला होता.हा चित्रपट 70 एम.एम.च्या पडद्यासाठी बनवला गेला होता .त्या अगोदर 35 एम.एम.चे पडदे असायचे. या चित्रपटात,खूपच रंजक गोष्टी होत्या.यात,मैत्री होती, प्रेम होते,संघर्ष होता,गाणे होते, मनोरंजन होते,दरोडे होते असूया होती,नौटंकी होती.अशा अनेक गोष्टी एकच चित्रपटात बघायला मिळाल्या होत्या. विशेष म्हणजे याचे डायलॉग खूप छान होते, डायलॉग त्या काळातल्या प्रेक्षकांना मुखोद्गत होते,प्रेक्षकांचे एकदा चित्रपट बघून मन भरत नव्हते ,प्रेक्षकांनी अनेकदा चित्रपट पाहिला,आजही पाहतात.मुंबईतील मिनर्वा टॉकीज इथे साधारणपणे पाच वर्षे हा चित्रपट रोज मॅटीनी शो ला होता तरीही प्रेक्षक मिळायचे.एकदा पाहून कोणाचे समाधान होत नव्हते, वारंवार पाहिला जायचा.इतके गारुड या चित्रपटाचे प्रेक्षकांवर होते. आजही आहे.या चित्रपटाने अमिताभ बच्चनला,धर्मेंद्र ला महानायक बनवले.तर गब्बरच्या भूमिकेत असलेल्या अमजद खान यास मोठा व्हिलन बनवले, त्यानंतर अमजद खान यांस अनेक चित्रपटात भूमिका मिळाल्या सर्वच पात्रांच्या भूमिका छान होत्या,यातील कुठलेही पात्र घेतले तर लक्षात राहील अशी भूमिका आणि संवाद होते.
जेलर(असराणी), सुरमा भूपाली (जगदीश),कालिया(विजू खोटे) ,सांभा(मॅक मोहन),सचिन,ए. के.हंगल ,जया भादुरी,हेमा मालिनी ,यांच्या लहान लहान भूमिकाही गाजल्या होत्या.त्यातली सुरमा भूपालीची भूमिका आज यासाठी निवडली आहे की,या चित्रपटात सुरमा भूपाली हा,एक वखार मालक असतो.त्याला सवय असते की,गावातल्या रिकामटेकड्या लोकांना जमा करायचे आणि,ज्या गोष्टी त्याने केल्या असतील- नसतील त्याही तिखट मीठ लावून सांगायच्या.लोकांना त्याच्या गोष्टी खूप आवडायच्या .त्या यासाठी की, त्यांचे मनोरंजन व्हायचे.लोक त्याला उचकवायचे आणि तो आणखी आणखी गोष्टी सांगत असे.त्याच्या सगळ्या गोष्टी म्हणजे बहुतेक थापा असत ,किंवा थोडें काही केले असेल ते जास्त करून सांगितलेले असे. पण असे वारंवार खोटे बोलणाऱ्याचा खोटेपणा कायमचा टिकत नाही,हेच खरे.कधी न कधी पितळ उघडे पडतेच पडते.काहींचे लवकर पडते, काहींचे खूप उशिरा. पण पितळ उघडे पडायचे ते पडतेच.
सुरमा भूपाली, जय आणि विरु हे कसे मोठे गुंड आहेत ,यांना कसे पकडले आणि त्यांना कसे मारले हे सांगत असताना त्यांच्या पाठीमागे जय आणि विरु येऊन उभे रहातात.सुरमा भूपाली अगदी तावात आलेला असतो.त्याच्या गप्पा ऐकायला आलेले खुश मस्करी करणारे लोक जय आणि विरुला बघतात.पण ते काही बोलत नाहीत,तो बोलत असताना त्या दोघांना कसे पकडले हे सांगत असताना,हात पाठीमागे नेतो, दोघांना पकडतो आणि पुढे आणतो.दोघांना साक्षात समोर बघून त्याची बोबडी वळते.तो त्याच्या गप्पा ऐकायला आलेल्या लोकांना म्हणतो,’चला निघा इथून,काही काम धंदा आहे की नाही, कधीही येऊन बसता.चला निघा.’असे म्हणून त्यांना हाकलून लावतो.
सुरमा भूपालीची भूमीला प्रेक्षकांना इतकी आवडली की त्यातील काही प्रेक्षक त्याच्या प्रेमात तर पडलेच पण स्वतःही सुरमा भूपालीच्या भूमिकेत वावरायला लागले. आजही आपल्याला असे सुरमा भूपाली गल्ली बोळात आणि चौकाचौकात दिसतात.एक बाजूला तरुणांनी काम धंदा करावा ,कुटुंबाला पोसावे, शिक्षण पूर्ण करावे ,राजकारणी लोकांच्या मागे लागू नये.राजकारणी तरुणांचा उपयोग कडी पत्ता सारखा करतात.कडीपत्ता कढीला चव आणण्यासाठी वापरला जातो पण जेवताना कडीपत्ता बाहेर काढून टाकून फक्त कढी खाल्ली जाते.’ असे उदाहरण देऊन तरुणांना वळणावर आणण्याच्या प्रयत्नात समाज माध्यमांवर असतात.आतां सर्वच तरुण कामधंदा करायला लागले तर यांच्यां गप्पा ऐकायला कोण येईल?तरुणांनी कमीत कमी एक तास तरी स्वतःचे मनोरंजन करून घ्यावे यासाठी एक पॅक( अर्ध्या चहामधील अर्धी चहा-नवीन शब्द) तरुणांना पाजला जातो.आणि आपल्या घडलेल्या न घडलेल्या गोष्टी त्या तरुणांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो.
प्रत्येक दिवशी कोणाची तरी उखाळी पाखाळी काढली जाते.कोणाला तरी बदनाम केले जाते,त्याच्या जीवनात घडलेल्या न घडलेल्या गोष्टी तिखट मीठ लावून सांगितल्या जातात.अगदी अशा थाटात सांगितल्या जातात की ते स्वतः तिथे हजर होते.तरुण हुशार असेल आणि त्याचा कावा ओळखत असेल तर त्याला हसण्यावारी नेतो, तिथल्या गोष्टी तिथेच सोडून आपल्या घरी जातो.पण जर तरुण अपरिपक्व असेल तर सुरमा भूपालीने सांगितलेल्या गोष्टी खऱ्याच मानून आपल्या मनावर बिंबवून ठेवतो.चांगल्या लोकांबद्दल त्याचे विचार वाईट करण्यात सुरमा भूपाली यशस्वी होतो.,मग तोही सुरमा भूपालीच्या रोल मध्ये जाऊन त्याच्यापेक्षा अधिक तिखट मीठ लावून त्याच्या सहकाऱ्यांना सांगतो. सुरमा भूपाली आपल्या कुटील डावात यशस्वी होतो त्या खुशीत असतानाच सत्य बाहेर पडते त्याचा डाव फसतो आणि मग तोंड लपवत फिरत असतो.
चौकात रिकामटेकडेपणा करणारे हे सुरमा भोपाली स्वतः बरोबर इतरांचाही वेळ घेत असतात.एखादा पुरुष कामावरून घरी थकून भागून चाललेला असेल तर त्याला हाक मारून बोलवले जाते.तिथे आणखी रिकामटेकडे बसलेले पाहून तोही येतो.चमत्कार नमस्कार होतो,तो तिथे सुरमा भूपालीच्या कहाण्या ऐकण्यात रमून जातो,कारण सुरमा भूपाली गोष्टी सांगण्यात इतका तरबेज असतो की,एखादा प्रसंग असा सांगतो की जसे काय तोच तिथे होता.तो पुरुष कामावरून घरी जात असतो त्याला अडवून त्याचा तास दिड तास तिथे वाया जातो.जेंव्हा त्याने आणलेल्या मच्छिचा वास सुटतो तेंव्हा त्याच्या लक्षात येते की,आपण घरी रात्रीच्या स्वयंपाकासाठी मच्छी आणली आहे.मग तो काढता पाय घेतो.त्याच्या फजितीला हा सुरमा भूपाली हसत असतो. तो गेल्यावर मग इतर लोकांसमोर त्याची न घडलेली गोष्ट सांगतो,त्याची कशी फजिती झाली हे इतरांना ऐकवतो.
सुरमा भूपाली रोजच जोंरात फेकत असतो,त्याला काही काम धंदा नसल्यामुळे आणि घरी काही टाईमपास नसल्यामुळे,घरी राहिलो तर बायकोला कामात मदत करायला लागते म्हणून तो कामचुकार चौकात येऊन लोकांना आपल्या टाईमपासचे साधन बनवतो,त्यात जेष्ठ नागरिकांची मर्यादा न ठेवता त्यांचीही खेचत असतो. त्याला काय व्यक्ती किती मोठी आहे,कोणत्या हुद्द्यावर आहे यापेक्षा आपल्या टाईमपासचे साधन आहे हेच त्यासाठी महत्वाचे असते.त्याचा कावा जेंव्हा सामान्य नागरिकांना कळतो तेंव्हा त्याच्या गोष्टी ऐकून कंटाळलेले सुज्ञ नागरिक पुन्हा यांना पाहिले की,दुरूनच रस्ता बदलतात.
काही सुरमा भूपाली खरोखरच सुरमा भूपालीच्या भूमिकेत असतात,पान किंवा गुटका खाऊन तिथेच पचापच थुंकत असतात.याची त्याची टिंगल टवाळी करत असतात.त्याच्या सोबत असलेल्या लोकांना आपण कसे फसवतो आणि आपल्या टाईमपासचे माध्यम बनवतो या खुशीत ते असतात.आणि त्याच्या सोबत असणारेही खूप छान टाईमपास म्हणून त्याच्याकडे पाहत असतात.,त्रयस्थ गोंधळात पडतो की यातील सुरमा भूपाली नक्की कोण आहे.काही वेळेस घरी काही खायला नसते बिचारी बायको कधी आईवडील हाडाचे काडे करून संसार चालवत असतो याचे या सुरमा भूपालीला काही वाटत नाही,.मुलांना साधी खेळणी घेऊन देऊ शकत नाहीत.काम कवडीचे नसते आणि फुरसत बिलकुल नसते,इस्त्रीचे कपडे घालून चौकात यायचे आणि चार लोक गोळा करून पुड्या सोडायच्या हेच काम हा सुरमा भूपाली अखंड करत असतो,आणि त्यातच धन्यता मानत असतो.अशा सुरमा भूपालीना सप्रेम नमस्कार.स्वतः बिघडले इतरांना बिघडवू नका, त्यांना बायकामुलात जाऊ द्या, ही नम्र विनंती.
- -शांताराम निकम
- 9822758676
—–