चुंबळ  

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram
  चुंबळ  
शेजारी बांधकाम सुरु आहे. बांधकामाची वाळू आणि कच यांचे ढीग बांधकामाच्या ठिकाणी टाकले आहेत. पाऊस पडल्याने कच आणि वाळू ओली झाली आहे. मुलांना वाळूत खेळायला आवडते. मुले वाळूच्या ढिगावर खेळत होती. मी शेजारी उभे राहून त्यांचा खेळ पाहत होतो. त्यांचा खेळ पाहताना अचानक माझी नजर एका गोलाकृती वस्तूवर गेली. जवळ जाऊन ती वस्तू पाहिली तर ती चुंबळ होती.. बांधकामासाठी वापरलेल्या सिमेंटच्या गोण्याची चांगली चुंबळ तयार केली होती. भक्कम व जाड दोऱ्याच्या मदतीने ती चुंबळ तयार केली होती..
 बांधकाम मजूर महिला वरच्या मजल्यावर विटांची वाहतूक डोक्यावर विटा घेऊन करत होत्या. एका लाकडी फळीवर जवळपास दहा बारा विटा ठेऊन त्या डोक्यावर घेऊन वरच्या मजल्यावर जात होत्या..विटाची फळी घेऊन वर जाताना त्या फळीच्या खाली ती चुंबळ त्या ठेवत होत्या..त्यांची ती चुंबळ होती. काम झाल्यावर त्यांनी ती बांधकामाच्या ठिकाणी ठेवली होती.
             ..ती चुंबळ पाहून मला लहानपणीचे दिवस आठवले. पूर्वी गावी घरोघरी पाण्याचे नळ नव्हते. पाणी आणण्यासाठी गावाच्या बाहेर असणाऱ्या विहिरीवर जावे लागत होते. एक किलोमीटर लांब असणाऱ्या विहिरीवरून किंवा हातपंप यावरून पाणी आणावे लागत होते. पाणी आणताना डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागत होते. डोक्यावरून  पाण्याचा हंडा भरून आणण्यासाठी हंड्याखाली चुंबळ वापरली जात होती. शक्यतो चुंबळीसाठी टॉवेलचा वापर केला जात होता.. टॉवेल नसेल तर जे कापड उपलब्ध असेल त्याचीही चुंबळ तयार केली जात असे.
काही जण विशेषता महिला  डोक्यावर चुंबळ ठेऊन त्यावर दोन हंडे एकावर एक ठेऊन पाणी आणत असत.. काही जण खूप चांगली चुंबळ बनवत असत. चुंबळीने डोक्यावरील हंड्याचा एक बॅलन्स साधला जात होता.. डोक्यावरील हंडे त्यामुळे अजिबात हलत नव्हते.. काही जण इतका बॅलन्स साधत असत कि एकदा डोक्यावर हंडा घेतल्यावर त्याला आधारासाठी हात लावत नव्हते.. या लोकांचे एक वेगळे कौतुक वाटत होते.. कधी कधी या चुंबळीमुळे डोक्यावर अलगद वस्तू ठेऊन नेता येत होती.
कधी कधी जर हंड्याच्या खाली ठेवलेली चुंबळ व्यवस्थित तयार केली नसेल तर पाणी आणताना मधेच चुंबळ निसटत असे तेव्हा डोक्यावरील हंडे खाली पडत असत. चुंबळ नसेल तर डोक्यावरून पाण्याचा हंडा आणताना खूप त्रास होत असे. त्यामुळे सगळेजण चुंबळीचा वापर करत असत.
            डोक्यावरून ओझी वाहून नेताना या चुंबळीचा वापर केला जात होता. बाजारात विक्रीसाठी शेतमाल नेताना पाटीच्या खाली या चुंबळीचा वापर केला जात होता.. सरपणाची मोळी आणताना, माती, मुरूम, वाळू, कांदे व इतर आवश्यक गोष्टीची डोक्यावरून वाहतूक करताना या चुंबळीचा वापर केला जात होता.  पाटीत वस्तू विकणारे विक्रते त्यांना रोज चुंबळ लागत असल्याने ते कपड्याची चुंबळ कायमस्वरूपी स्वरूपात तयार करत असत.. गावात येणारा देऊळवाला याच्या बायकोच्या डोक्यावर असणाऱ्या देवळासाठी असणारी चुंबळ कायमस्वरूपी तयार केलेली होती आणि तिला तेल, हळदी कुंकू लागलेले असायचे.
    शेतात कामासाठी लवकर गेलेला कारभारी आणि  घरातले काम उरकून डोक्यावर पाटी घेऊन पाटीमध्ये न्याहारी घेऊन निघालेली कारभारीण नेहमी पाहायला मिळत होती.. कारभाराणीने डोक्यावर पाटी घेण्याच्या अगोदर पाटीखाली चुंबळ ठेवलेली असायची.. चुंबळीवर पाटी ठेवल्यावर ती अलगदपणे चालत शेतात जात होती.. पाटीत पातळ कालवण, पाण्याची कळशी हे सांडणाऱ्या गोष्टी असायच्या, पण चुंबळीवर पाटी अश्या पद्धतीने ठेवलेली असायची कि पाण्याचा एकही थेंब सांडत नव्हता.
आजही अनेक  जे कष्टकरी लोक डोक्यावरून वाहतूक करतात ते या चुंबळीचा वापर करतात.. ती चुंबळ अनेक कष्टकरी लोकांचा आधार होती.. आणि आहे. अनेकांना ज्यांना डोक्यावर ओझे वाहून न्यावे लागते त्यांच्यासाठी ती एक चांगली मदतनीस आहे .त्यांचे ओझे वाहण्याचे काम सोपे करण्यासाठी चुंबळीचा उपयोग होतो.
माणसाचे जगणं सहज सोप्या करणाऱ्या अनेक गोष्टी असतात. काही सजीव तर काही निर्जीव असतात.. चुंबळ ही तर निर्जीव वस्तू.. पण कष्टकरी लोकांच्या जीवनातील एक आधार.. त्यांच्या कष्टाला साथ देणारी वस्तू.. कष्ट सुसह्य करणारी वस्तू..अशी चुंबळ एक जरी एक निर्जीव वस्तू असली तरी कष्टकरी लोकांच्या जीवनात एक मोलाचं स्थान आहे..चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा.. असा या चुंबळीचा उल्लेख संत एकनाथ महाराज  एका गवळणीत करतात आणि तिचे महत्व अधिक अधोरेखित होते..
–  प्रा. कुंडलिक कदम