वयाच्या चाळशीनंतर आरोग्याची अधिक काळजी घेणं गरजेचं ठरतं. मात्र, अनेक महिला या महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष देत नाहीत. वास्तविक चाळशीनंतर महिलांच्या शरीरात बरेच बदल होतात. चयापचय क्रिया मंदावते आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. म्हणून या वयातील महिलांनी योग्य आहाराकडे लक्ष द्यावं. याबाबतच्या टीप्स..
तशीनंतरच टप्याटप्यानं चयापचय क्रिया मंदावण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे पांढरा ब्रेड किंवा पांढरा भात याऐवजी महिलांनी ब्राउन राईस, व्हट ब्रेड किंवा ओट्स खावेत. यामुळे शरीराला फायबर मिळेल. फायबरमुळे वजन वाढण्याला प्रतिबंध होतो आणि वजन कमी होण्यासही मदत होते. आहारात फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. सॅलेड, कोशिंबीरी हा फायबरचा चांगला स्रोत आहे. पालक, गाजर, काकडी, टॉमेटो, संत्री, स्ट्रॉबेरी यांचं सेवन महत्त्वाचं ठरतं. यातून फायबरबरोबर पोटॅशियम, क जीवनसत्त्व, अँटीऑक्सडंट्स विपुल प्रमाणात मिळतात. यामुळे त्वचा चांगली राहून सूर्याच्या अतिनील किरणांपासून तिचं रक्षण होतं. आहारातलं मीठाचं प्रमाण कमी करावं. मीठामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. या वयात जास्त साखरेचं सेवनही धोक्याचं ठरतं.