आपल्या सर्वांच्याच डोळ्यांपुढे कुठल्या न कुठल्या स्क्रीन्स सतत असतातच. टीव्ही स्क्रीन, कॉम्प्युटर स्क्रीन, मोबाईल फोनचा स्क्रीन अश्या अनेक स्क्रीन्सवर दिवसभर आपले डोळे लागून राहिलेले असतात. काही वेळा दिवसभराच्या कामानंतर डोळे पार थकून जातात, त्यानंतर डोळे दुखणे, लाल होणे, डोळ्यांची आग होणे, त्यातून सतत पाणी येणे अशा तक्रारी सातत्याने सुरू होतात. कधी कधी कमी दिसू लागल्याची भावना देखील होते. अश्या वेळी काही घरगुती उपायांनी आपल्या डोळ्यांची निगा राखता येऊ शकते. सकाळी उठल्यानंतर स्वछ पाण्याने चुळा भरून डोळे स्वच्छ धुण्याची शिकवण प्रत्येक लहान मुलाला अगदी लहानपणापासून दिली जाते. या उपायाने श्वासाची दुगर्ंधी जाऊन डोळे स्वच्छ होतातच, पण त्याशिवाय तोंडामध्ये पाणी भरून घेऊन, डोळे उघडे ठेऊन त्यांच्यावर पाणी मारल्याने दृष्टीदोष कमी होतो. जर एखाद्या व्यक्तीला चष्म्याचा नंबर जास्त असेल, तर त्यांनी हा उपाय अवलंबून पाहावा. दृष्टीदोष कमी करण्यासाठी पायांच्या तळव्यांना मोहोरीच्या तेलाने दररोज मालिश करावी. तसेच स्नानापूर्वी पायांच्या अंगठ्यांना मोहोरीचे तेल चोळावे. यामुळे दृष्टीदोष सुधारतो आणि पुन्हा उद्भविण्याची शक्यता कमी होते.
डोळ्यांना आवश्यक ते पोषण मिळण्यासाठी आपल्या आहारामध्ये पालक, पालक, फुलकोबी, हिरव्या पालेभाज्या, आणि गडद रंगाची फळे समाविष्ट करावीत. या फळांमध्ये अ, क आणि ई जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते. याशिवाय पपई, संत्री, लिंबू, गाजरे या पदार्थांचा समावेशही आपल्या आहारामध्ये असावा. दररोज सकाळी उठल्यानंतर ताजे लोणी, अर्धा लहान चमचा बारीक दळलेली खडीसाखर, आणि चार- पाच काळी मिरी असे एकत्र करून खावे. त्यानंतर त्वरित ओल्या नारळाचे दोन लहान तुकडे चावून खावेत, व बडीशेप खावी. त्यानंतर दोन तासांपयर्ंत काहीही खाऊ नये.