गावाकडच्या गोष्टी – अनुभवसमृद्ध आठवणी !

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

माझ्या परिचयातील एका जवळच्या व्यक्तीने शहरात स्थिरस्थावर झाल्यानंतर     मध्यंतरी आपल्या गावाला गेल्यावर तेथील शेतातील पिकाचे, परिसराचे फोटो फेसबुकवर पोस्ट केले होते. ते फोटो पाहून मी, ‘माणूस गावापासून दूर गेला की जास्त प्रमाणात आपलं गाव काळजात जपत असतो’ अशी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया नोंदवली होती. त्याचं कारण म्हणजे,               ‘ओढ लावते या जीवाला गावाकडची माती, वाट पहात असतात आपुलकीची नाती.’ या माझ्यासारख्या अनेक व्यक्तींच्या मनातील बोलक्या भावना होय.

‘आपण खूप खूप शिकून मोठ्ठं व्हावं’ असं लहानपणी प्रत्येकालाच वाटत असलं तरी शिकून मोठ्ठं झाल्यावर आपण आपल्या गावाला पारखं होणार, परकं होणार याची किंचितसुद्धा कुणाला कल्पना नसते आणि होतंही तसंच… पोटापाण्यासाठी गावाला मुकावं लागल्यावर शहरात किंवा दूर कुठंतरी स्वप्नांच्या दुनियेत स्वप्न पूर्ण करण्यासाठी जावं लागतं. मग कालांतराने पाहुण्यासारखं गावात कधीतरी येणं-जाणं होतं, पर्यायाने काळजात गावाचं महत्व अधिकच वाढत जातं. अप्रत्यक्षपणे कळत नकळतपणे आपल्या गावाचं गावपण व्यक्ती काळजात जपत सगळीकडे अभिमानाने मिरवत असते. गावात गेल्यावर तेथील शेतीमाती, शाळा, व्यक्ती, नदीनाले, डोंगरदऱ्या पहिल्यापेक्षा आपल्याला प्रिय वाटू लागतात. आणि आपसूकच आपल्या गावावर आपण अधिकच प्रेम करू लागतो.

हे सारं लिहिण्याचे कारण म्हणजे माझे मार्गदर्शक ज्येष्ठ लेखक, सेवानिवृत्त शिक्षक तसेच नामवंत मुद्रितशोधक श्री अर्जुन वेळजाळी सरांच्या ‘गावाकडच्या गोष्टी’ या आत्मबंधात्मक ललितलेखसंग्रहाचे प्रकाशन सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी श्री. वि. ग. बोरस्ते, ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे, ज्येष्ठ लेखक डॉ. यशवंत पाटील, आकाशवाणीचे माजी संचालक कवी उत्तम कोळगावकर, माजी सनदी अधिकारी डॉ. बी. जी. वाघ, ज्येष्ठ लेखक, ॲड. मिलिंद चिंधडे, ज्येष्ठ कवी लक्ष्मण महाडिक, ज्येष्ठ गजलकार तुकाराम ढिकले, शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा संघटक श्री. अशोक दुधारे, गिरणा गौरव प्रतिष्टानचे अध्यक्ष, माणुसमित्र सुरेश पवार आदी मान्यवरांच्या हस्ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हुतात्मा स्मारकात मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

नामवंत अशा ग्रंथाली प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून चित्रकार प्रमोद जोशी यांनी रेखाटलेले बोलक्या मुखपृष्टासह प्रमोद जोशी व अभिषेक भंडारे यांनी रेखाटलेली आतील रेखाचित्रे, विजयालक्ष्मी मणेरीकर यांची समर्पक प्रस्तावना तसेच वाचकांचे भावविश्व श्रीमंत करणारे मृद्गंधात माखलेल्या आठवणी व अनुभवसमृद्ध ललितलेख ही या पुस्तकाची बलस्थाने म्हणावे लागतील.

साहित्यिक आपले अनुभव, आपले भावविश्व आपल्या लिखाणातून मांडत असला तरी यातून वाचकांना निखळ आनंद देणे याबरोबरच वाचकांचे मनोरंजन करत त्यांचे भावविश्व समृद्ध करणे, भावी पिढ्यांना मार्गदर्शन करत त्यांना दिशा देणे, हेसुद्धा मुख्य हेतू असतात. हे हेतू  साध्य करण्यात लेखक यशस्वी झाल्याचे मला या पुस्तकातील लेख वाचताना जाणवल्याशिवाय राहिले नाही. असे लिखाण वाचताना वाचक रममाण होतात, त्यांना त्यातून स्वर्गीय आनंद मिळतो. असाच अनुभव मला हे पुस्तक वाचताना आला.

‘जीवन म्हणजे अनुभवाची शाळा.’ पावलोपावली आलेल्या अनुभवाच्या बळावर पुढील मार्गक्रमण ठरत असले तरी भावी आयुष्याची पायाभरणी बालपणीचे अनुभव तसेच प्राप्त परिस्थितीनुसार होत असते हे नक्की. एखादा साहित्यिक आपल्या साहित्यातून जनमानसाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम करत असतो. ओघवत्या, सहज, सोप्या रसाळ भाषेत लिहिलेले या लेख असून आपल्या अनुभवांचं दालन लेखकाने या लेखांमधून वाचकांना मोकळं करून दिलं आहे. या लेखांमधील स्थळ, काळ, पात्रे आपल्या अवतीभवती असलेली, आपल्या जीवनातील वाटतात. आणि त्यामुळेच हे लेख वाचकांच्या मनाला भिडतात.

सोडताना रडलो मी गाव माता
भावनांना उरला ना भाव आता (भावनांना उरला ना भाव आता)

तसेच

नेहमी आठवतो मला
आपला गाव मनातला

तिथं माणसं डोंगराएवढी
माणुसकीला समुद्राची खोली
मुखी झिरपते सदा
ज्यांच्या काळजातली बोली (आपला गाव मनातला)

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त होऊन प्रकाशित झालेल्या माझ्या ‘वेदनेचे काटे’ या कवितासंग्रहातील वरील ओळी मला हे लेख वाचताना परत परत आठवत होते. एकूणच काय तर  हे लेख वैश्विक आहेत याची प्रचीती येते. त्यामुळे मी या ओळी इथे नमूद केल्या.

‘बालपणीचा काळ सुखाचा’ असे म्हटले जाते. दररोज नवनवीन अनुभवांची शिदोरी अनुभवसंपन्न करत असते. त्यातून व्यक्तीची जडणघडण होते. एकांतात हे सारं संचित आठवत आयुष्याची वाटचाल निरंतर सुरु राहते. यातूनच ‘गावाकडच्या गोष्टी’ सारख्या आत्मबंधात्मक लेखनाचा जन्म होतो. पहिल्या लेखात आपल्या गावाची ओळख करून देताना ‘वावी : ऐतिहासिक वारसा असलेलं माझं गाव !’… गावापासून दूर गेले, की गावाकडील आईवडील, शेतीवाडी, शाळा, मित्र यांची आठवण येऊन गावातील सुखाची, आनंदाची कल्पना येते अन् मन गावाकडे धाव घेऊ लागतं. अशी सहज, समर्पक सुरुवात केली असल्याने एकूणच लेखांचा आवाका सहज लक्षात येतो. परिणामी वाचकाच्या मनात पुढे काय याची उत्सुकता वाढत  जाते.

तसे पहिले तर लेखक हे एक हाडाचे शिक्षक तर आहेच त्याचबरोबर ते उत्तम साहित्यिक आहे. त्यांचे ‘सुविचारातील आई’, ‘वावी : ऐतिहासिक वारसा असेलेलं गाव’, ‘शालेय विशेष दिनविशेष’ आणि आता हे ‘गावाकडच्या गोष्टी’ इत्यादी दर्जेदार साहित्यिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे प्रत्येक पुस्तक एक उत्तम साहित्यिक दस्तऐवज ठरावे असेच आहे.

अवर्षणप्रवण भागात त्यांचे गाव येत असल्याने तसेच बालपणी भयंकर दुष्काळ सहन करावा लागल्याने प्रतिकूल परिस्थितीत काबाडकष्ट करत त्यांना शाळा व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करावे लागले, त्यासाठी प्रसंगी आईला विकावे लागलेले मंगळसूत्र, याची सल त्यांना सतत बोचत असल्याने ती त्यांच्या लेखणीतून झिरपली असल्याचे जाणवल्याशिवाय राहत नाही. गनिमी काव्याने गायींची केलेली सुटका, बैलाशी झुंज, डोके व कान झोडपणारा पाऊस, लळा लावणारी आठवणीतील शाळा, विनातिकीट प्रवास केल्याची सल अशा चित्तवेधक लेखांसह गुरुजींनी जीवनाला दिशा दिली हे सांगायला लेखक विसरत नाही.

● हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे  कारंजे ….आधुनिक कारंजा महात्म्य

पूर्वी गावापासून दूर तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी मुलांना रहावं लागे, अशा वेळी गावाकडून एस.टी. मधून जेवणाचा डबा पाठवला जाई. ही महत्वाची तसेच खडतर असली तरी जीवनाला दिशा देणारी अशी आठवण त्यांनी ‘विद्यार्थ्यांची अन्नपूर्णा : एस. टी.’ या लेखात उत्तमरित्या वर्णन केली आहे. आपल्या आईच्या बाबतीत मात्र लेखक हळवे होत ‘ त्यागमूर्ती माझी आई ‘ असे सार्थ वर्णन त्यांनी आपल्या आईचे केले आहे.

अर्जुन वेलजाळी सरांचे ‘गावाकडच्या गोष्टी हे प्रेरणा देणारं, मनात आपल्या गावाबद्दल प्रेम निर्माण करणारं कथन आहे. त्यांनी वर्णन केलेले प्रसंग बोलके व वाचकाच्या मनात कुतूहल निर्माण करणारे आहेत. हे लिहिताना त्यांची स्मरणशक्ती अफलातून असल्याचे जाणवते. बालपणीच्या घटना, प्रसंग जसे की, साळुंकीला झालेली इजा, खारुताईच्या पिलांची व चिमणीची झालेली हत्त्या, त्यावेळी असलेले मित्र, लाभलेले शिक्षक व या सर्वांची नावे आजही सरांच्या लक्षात आहेत हे विशेष. फक्त आर्थिक नव्हे तर प्रेम, माया, ममता, संस्कार, निसर्ग याबाबतीत श्रीमंत असणारी ग्रामसंस्कृती आजच्या पिढीला समजण्यास हे लेख हातभर लावतात. कारण ग्रामसंस्कृतीचं चित्र डोळ्यासमोर हे लेख वाचताना निर्माण होते. लोकप्रिय लेखकांची वाक्ये, वाक्प्रचार यांची चपखल पेरणी या लेखांमध्ये आढळते.

आठवणींचा धांडोळा घेत त्यांनी प्रसंग वर्णन केलेले असून वाचकांना खिळवून ठेवतील अशी लेखांची मांडणी केली आहे. बालपण, आईवडील, भाऊबहिण, शाळा, कुटुंब, शिक्षक, आपले मित्र, जनावरे, एस. टी. यांसह लेखातील  विविध पात्रे व व्यक्तिमत्वे सहजच आपली वाटून जातात. आयुष्यभर आपल्या गावाची नाळ त्यांनी तुटू दिली नाही. थोडक्यात, गावाच्या आठवणींद्वारे त्यांनी जीवनाच्या विविध टप्प्यांवरील गावाला आठवण्याचा प्रयत्न केला आहे. 

‘लहानपणी माझे जीवन घडत असताना माझ्यावर ज्या ज्या शिक्षकांनी उत्तम संस्कार केले, मित्रांनी नि:स्पृह सहकार्य केले अन् नातेवाइकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत केली, त्या सर्वांना माझ्या या ‘गावाकडच्या आठवणी’ सविनय समर्पित !’ अशी समर्पक कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी ही त्यांची साहित्यकृती अर्पण केली आहे. या लेखसंग्रहात ‘वावी : ऐतिहासिक वारसा असलेलं माझं गाव’, ‘माझ्या आठवणीतील शाळा’,  ‘शेतक-यांची सांस्कृतिक श्रीमंती –चुरमा, तुकडे,… असे एकूण चौतीस वाचनीय लेख वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या आहेत.

हा उहापोह करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे आज शुक्रवार  दि १४ फेब्रुवारी २०२५ रोजी हुतात्मा स्मारकात, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात  ‘गावाकडच्या गोष्टी’ या लेखक अर्जुन वेलजाळी सरांच्या पुस्तकावर ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिक वाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च २०२४ पासून दर मंगळवारी व दर शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होत आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना आपल्या साहित्यकृतीवर व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

मराठी साहित्यात / कथाविश्वात प्रकाशित झालेलं हे पुस्तक म्हणजे एक दर्जेदार लेखसंग्रह असून वाचकांनी हा लेखसंग्रह आवर्जुन वाचावा हा आवाहन व आग्रह करून लेखक अर्जुन वेलजाळी सरांना पुढील साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !

*पुस्तकाचे नाव :-* गावाकडच्या गोष्टी ( आत्मबंधात्मक ललित लेखसंग्रह )
*ISBN :-* 978-93-5650-729-6
*लेखक :-* अर्जुन वेलजाळी. *संपर्क नं.* ९०४९५२२२४० 
*प्रकाशक :-* ग्रंथाली, मुंबई 
*प्रस्तावना :-* विजयालक्ष्मी मणेरीकर
*मुखपृष्ठ :-* प्रमोद जोशी
*रेखाचित्रे :-* प्रमोद जोशी, अभिषेक भंडारे 
*स्वागत मूल्य :-* ₹ २५०/- मात्र ( सवलत मूल्य व टपालखर्च यासाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा)

Oplus_131072

*आस्वादक :-* सोमनाथ पगार (सॅप), नाशिक
(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदानप्राप्त साहित्यिक (गीतकार/ कवी,लेखक), ट्रान्सलेटर, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट (Engineer), इंग्लिश लँग्वेज ट्रेनर, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर.)                                                      
*संपर्क क्र.:-* ९२७३३५७१५९,        

Email :-* sahityatirthasp@gmail.com
फ्लॅट न. १,  वैष्णवी विहार, सिद्धेश्वर नगर, रेशीमबंध लॉन्समागे, हिरावाडी, पंचवटी, नाशिक – ४२२००३.

Leave a comment