गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!

भारतीय संस्कृती मध्ये सण उत्सवाला खूप महत्व आहे. मराठी वर्षामध्ये सण उत्सव उत्साहात साजरे केले जातात. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांनी एकत्र यावे, विचारांची देवाणघेवाण व्हावी, बिकट परिस्थितीत एकमेकांना मदत करावी, आपुलकी निर्माण व्हावी, कामाच्या व्यापातून थोडाफार विरंगुळा मिळावा, भजन पुजनाने मनातील कर्मठ विचार दूर व्हावे यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा चालू केली..

पूर्वी एक गाव एक गणपती अशी संकल्पना होती. त्यामुळे या उत्सवाबद्दल लोकांच्या मनात खूप उत्सुकता असायची.. सर्व गाव एकत्र येवून गणपती उत्सव साजरा करायचे. गणपती सजावट प्रसाद, हार, तोरण या सर्व गोष्टी एकत्र येऊन करायचे. आरती, भजन, कीर्तन सर्व गाव एकत्र येऊन ऐकायला बसायचे. त्याच निमित्याने आपुलकी, जिव्हाळा वाढायचा दुसरे कुठले विरंगुळ्याचे साधन नसल्याने विचार विनिमय होऊन सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्या अशा गोष्टी एकत्र येऊन विचारविनिमय करायचे. पडद्यावर सामाजिक चित्रपट दाखविल्या जायचे. अशा प्रकारे पूर्ण गाव एकत्र येत असे.. त्यानंतर गणपती उत्सवाचे स्वरूप बदलत गेले; आणि त्याला स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झाले.

अनेक गणपती मंडळ तयार झाले आणि चौका चौकात गणपती बसायला लागले. गणपती उत्सवाला आधुनिकीकरण, जागतिकीकरण आणि भांडवलशाहीचे स्वरूप प्राप्त झाले. चढाओढ सुरू झाली. आपल्या मंडळाची गणपती सजावट इतरांपेक्षा वेगळी असावी, आपला गणपती सर्वात मोठा असावा अशी भावना निर्माण झाली आणि भांडवल जमा करण्यासाठी वर्गणीची मागणी वाढली. गणपतीचे वेगवेगळे रूप साकारण्यासाठी अनेक रुपात गणपती बनवू लागले. गणपती उत्सवाच्या ठिकाणी भजन, आणि देवादिकांची गाणी सोडून चित्रपटाचे गीत वाजू लागले, ढोल ताशे या कर्कश आवाजात गणपतीचे आगमन आणि विसर्जन होऊ लागले.

दहा दिवस गणपती जवळ कार्यक्रम राबवितांना काही चुकीच्या गोष्टीही तिथे केल्या जाऊ लागल्या. विरंगुळा म्हणून पत्ते खेळणे, हौजी खेळणे, हे पण अशोभनीय खेळ खेळले जाऊ लागले. वर्गणी देण्यासाठी परिसरातील लोकांना सक्ती केली जाऊ लागली. आकडा निश्चित करून प्रत्येकाने तेवढीच वर्गणी द्यावी असा अट्टाहास असल्यामुळे परिस्तिथी नाही त्यांची गोची होऊ लागली. याच वर्गणीच्या पैशातून दारू पिणे. गणपती बाप्पा पुढे नाचणे. मुलींची महिलांची छेड काढणे हे प्रकार पण घडायला लागले. भक्ती पेक्षा दिखाव्याला जास्त महत्व येत गेले.

शाडू चे गणपती नसल्याने ते पाण्यात विरघळल्या जात नाही त्याच बरोबर  निर्माल्य तलावात टाकल्या जात असल्याने ध्वनी प्रदुषण, पाणी प्रदुषण या गोष्टी घडतात. आज त्यासाठी अनेक ठिकाणी बंदोबस्त केला जातो अनेक ठिकाणी विसर्जनासाठी प्लॅस्टिकचे ट्रंक ठेवल्या जातात. गणपती विसर्जनाची प्रचंड गर्दी त्यामुळे प्रदुषण वाढत आहे. याला कुठेतरी आळा बसायला हवा त्यासाठी कार्यकर्त्यांनी आज विचार करण्याची गरज आहे सुंदर भारत स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शाडूच्या आणि इकोफ्रेंडली गणेश मूर्तीची स्थापना करावी. आज प्रत्येक घराघरात गणपती बाप्पा बसविल्या जाते.

त्यामुळे कुटुंब एकत्र येते आपुलकी जोपासल्या जाते.. भक्तिमय वातावरण घरात राहते पण इकोफ्रेंडली गणपती बसवावे त्यामुळे प्रदूषणाला आळा बसेल. निश्चितच उद्याच्या येणाऱ्या काळात गणपतीचे आगमन ढोल ताशांच्या कर्कश आवाजात दारू पिऊन तल्लीन होऊन न करता साध्या सोपे टाळ मृदंगाच्या गजरात आदराने व्हावे. यासाठी सर्वांनी आज विचार करणे गरजेचे आहे. आपली श्रद्धा आणि भक्तीचे आधुनिकीकरण, जागतिकीकरण जाहिरातबाजी न करता सार्वजनिक उत्सव साजरा करण्यात यावा. मुलांसाठी त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम राबवावे. वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विविध खेळांच्या स्पर्धा राबवाव्या.

श्रध्दा तिथे भाव आणि भाव तिथे भक्ती असते त्यामुळे खूप मोठा गणपती बसवला लाखो रुपये खर्च करून सजावट केली तर गणपती खुश होणार नाही. उलट त्याच पैसात गरीबांना मदत करावी. अनाथायलात, वृध्दाश्रमात मदत करावी. कुणाच्या शिक्षणासाठी मदत करावी. समाजसेवेचे बीज लोकांच्या मनात या सार्वजनिक कार्यक्रमातून रुजवावे, रक्तदान, देहदान यासारखे महत्व सांगणारे चर्चासत्र आयोजित करण्यात यावे. कुणालाही वर्गणीची सक्ती न करता यथाशक्ती जे देईल ते घ्यावे. आणि लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेश उत्सव चालू केला. तो उद्देश त्यावेळच्या परिस्थितीनीरूप असला तरी त्याचे आज बदललेले स्वरूप बघता आज कार्यकर्त्यांनी या उत्सवावर विचार करून उद्या येणाऱ्या गणपती उत्सवाचे स्वरूप बदलावे. जेणेकरून उत्सव हा एकोप्याने आणि शांतेत भक्तिमय वातावरणात पार पडेल. आणि बाळगोपलांना त्याचे खरे महत्व कळून पुढे त्याचे स्वरूप ते बदलवेल…

सौ निशा नरेंद्र खापरे
नागपूर
7057075745
Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
YouTube
Pinterest
LinkedIn
Instagram