कुटुंबामध्ये आपुलकी, जिव्हाळा, भावना, प्रेम, राग, लोभ अशा अनेक बाबींचा अंतर्भाव असतो. माता, पिता व अपत्य आणि अन्य आप्तसंबंधी व्यक्तींनी मिळून कुटुंब तयार होत असते. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ कुले कुटुंबास ‘प्राथमिक समूह’ असे म्हणतात. कुटुंबाचे संयुक्त, विभक्त, भग्न असे प्रकार पडतात. पूर्वी संयुक्त कुटुंबाचे प्रचलन मोठ्या प्रमाणात होते.‘एकमेकास साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे कुटुंब कार्यप्रवण राहत असे. मानवी जीवनाला शिस्त, सुकरता आणि सुलभता यावी म्हणून कुटुंबाची निर्मिती झाली. लैंगिक गरजांची पूर्ती, प्रजोत्पादन, संगोपन,योग्य सामाजिकरण अशा अनेक महत्त्वपूर्ण समाजमान्यभूमिकांची व्यवस्था कुटुंबाद्वारे केली जाते. त्यामुळेच विवाहसंस्था व कुटुंबसंस्था यांचा जवळचा सहसंबंध असतो.
मानवाचे जतन, बाल संगोपन, सुयोग्य सामाजीकरण, मानवी जैविक घटकांचे समाजशील मानवी प्राणी बनवण्याची प्रक्रिया कुटुंबामध्ये मूलभूत रित्या पार पाडली जाते.कुटुंबातील सदस्य त्याच जबाबदार असतात. नव्हे समाज तसे कुटुंबावर बंधन टाकतो. तशी अपेक्षा व्यक्त करतो. संयुक्त कुटुंबात सामायिक संपत्ती, सामायिक निवास, सामायिक भोजन याबाबी महत्त्वाच्या असल्याचे प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ डॉ. इरावती कर्वे सांगतात. संयुक्त कुटुंबात दोन पेक्षा अधिक पिढ्यांचे लोक एकत्रित राहतात. त्यांच्यामध्ये सहकार्य, समायोजन, आत्मसातीकरण याबाबी असणे गरजेच्या आहेत. संयुक्त कुटुंब सर्वांना सांभाळून घेऊ शकेल व एकजुटीने राहील. परंतु त्यामध्ये जर आंतरपिढीय संघर्ष उद्भवू लागला. असमायोजन दिसू लागले.आंतरपिढीयअंतर निर्माण होऊ लागले तर संयुक्त कुटुंब टिकणे कठीण होत असते.आजमितीस तीच स्थिती संयुक्त कुटुंबाची झाली आहे.
भारतात पूर्वी प्रामुख्याने ग्रामीण भागात सर्वत्र संयुक्त कुटुंबाचे प्रचलन आढळत असे. बदलत्या काल प्रवाहात आधुनिकीकरण, व्यक्ती स्वातंत्र्याला वाव, विभक्त कुटुंबाचे फायदे व संयुक्त कुटुंबाचे दोष किंवा मर्यादा लक्षात घेता लोकविभक्त कुटुंबासचअत्याधिक पसंती दर्शवू लागले. आज विभक्त कुटुंबाचेच प्रचलन आढळते. समाजात अनेकदा विवाह जोडतांना विभक्त कुटुंबाची अट घातली जाते. विवाहानंतर विभक्त राहण्याचा आग्रह धरला जातो.तसे घडले नाही तर विवाह विच्छेदही घडून येतो. ही बाब कुटुंब व्यवस्थेच्या अस्थिरतेची गांभीर्यता निदर्शित करते. प्रत्येक बाबीचे जसे दोन पैलू किंवा दोन बाजू असतात. चांगल्या आणि वाईट तसेच विभक्त कुटुंबाच्याही जमेच्या बाजू आणि काही मर्यादाही आहेत.“या जमेच्या बाजूंना टिकवून ठेवण्यासाठी व मर्यादा किंवा दोषांना कमी करण्यासाठी संयुक्त कुटुंबाची नवसंरचना नावारूपाला आणणे गरजेचे आहे. ज्यामध्ये जुन्या पिढ्या, सासू-सासरे, आई-वडिलांनी नव्या पिढ्यांचे जीवनमान, त्यांची कार्यसंस्कृती जडणघडण लक्षात घेऊन त्यांच्याशी समायोजन करावे तर नव्या पिढ्यांनी जेष्ठांच्या स्वभाव मर्यादा क्षीण होत चाललेल्या क्षमता वयोमर्यादा लक्षात घेऊन त्यांच्या अनुभवाचा साठा जतन करावा. जीवनात येणाऱ्या चढउतारांना सामोरे जाताना त्यांच्याशी केलेला संवाद निश्चितच उपयुक्त ठरू शकतो. कदाचित काही वेळा तो उपयुक्त ठरणारही नाही. त्यावेळी एक सल्लाम्हणून आपण त्याकडे पाहू शकतो.
सोबतच नव पिढीची जीवन प्रणाली,त्यामधील मर्यादा आणि तुलना जसे आमच्या काळात किंवा आमच्या वेळी असे नव्हते या बाबींना बाजूला सारून त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा, आत्मसन्मानाचा आदर राखणे गरजेचे आहे. अनुचित वाटणाऱ्या गोष्टींचे सौम्य पद्धतीने नवपिढ्यांशीहितगुज करणे हिताचे व आंतरपिढीयसमंजस्य ठरेल. तसेच नव पिढ्यांनी जेष्ठांचा आदर राखत, त्यांचे जीवनमान, आजपावेतो जगलेली जीवनपद्धती लक्षात घेऊन त्यांना आपल्या प्रवाहात कसे सांभाळून घेता येईल याचा विचार करावा व जिवाभावाचा जिव्हाळ्याचा सेतू बांधावा.
तेच आपले, कुटुंबातील सदस्यांचे आद्य कर्तव्य आहे. कुटुंब ही मानवी जीवनात अद्वितीय बाब आहे. जीवन जगताना जी भूमिका कुटुंबीय पार पाडतात. ती अन्य कोणीही पार पाडू शकत नाही. त्यामध्ये सातत्य राखू शकत नाही. जसे; विभक्त कुटुंबात कोणी आजारी पडल्यास, त्यांना दवाखान्यात दाखल (Admit) करावे लागल्यास घरातील लहान बाळांना, मुलांना सांभाळणे. दवाखान्यात डब्बा देणे. घरकाम करणाऱ्या महिलांकडून कामे करून घेणे. प्रसंगी स्वयंपाक करणे. अशा अडचणीच्या वेळी हा आधार खूप महत्त्वाचा आणि मोठा वाटतो.
आजच्या काळात पती-पत्नी दोघेही नोकरदार किंवा व्यावसायिक बनले आहेत. त्यावेळेस त्यांना आई-वडील, सासू-सासरे यांचा मोठा आधार असतो व होऊ शकतो. म्हणून या पिढ्यांचे जतन करा. त्यांचे महत्त्व जाणा. आपल्या धावपळीचे जीवन सुकर करण्यासाठी त्यांचा आधार घ्या. तर जुन्या पिढ्यांनी आपली उतरत्या वयातील गरज लक्षात घेऊन कुटुंबाची सून नातवंडांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्याशी समरस व्हावे. त्यांना आपलंसं करावे. जुळवून घ्यावे आणि जीवनाला आनंदी कसे करावे यातच व्यक्ती आणि कुटुंब हीत सामावलेले आहे. म्हणूनच विभक्ततेकडून नवसंयुक्ततेचा कुटुंबाचा प्रवास समर्पक होईल.
प्रसिद्ध मानसशास्त्र अभ्यास कौटुंबिक समुपदेशक व सल्लागारडॉ. प्रतिभा देशपांडेत्यांच्याकडे येणारे कौटुंबिक कलहाचे प्रकरण पाहता ‘भविष्यात कुटुंब संस्था टिकेल की नाही’ याबाबत शंका व्यक्त करतात. कुटुंब किंवा विवाह टिकवायचा असेल तर सद्यस्थितीत तरी मुलांना अधिक बदलावं लागेल. समायोजन करावे लागेल. पितृसत्ताक कुटुंब प्रणालीच्या पारंपारिक, मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. विवाहाचा जोडीदार, साथीदार म्हणून एकमेकांकडे आदराने पहावं लागेल. एकमेकांचा आत्मसन्मान राखावा लागेल. तसेच मुलींनी देखील आदर्शपती बाबतच्या अपेक्षा वास्तव जीवनाशी जोडून त्याचा सारासार विचार व सारासार अपेक्षा ठेवाव्या लागतील.
सोबतच आंतरपिढीय संबंधाचे, सहकार्याचे उपयुक्ततेचे महत्त्व जाणून घेऊन त्याचा समन्वय साधावा लागेल.त्या दीर्घानुभावाच्या आधारे कवयित्री विमल लिमये कथन करतात,की
घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती.
त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी. सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसते गाणी
त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी. अश्रुतूनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी.
या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य घेऊनि शक्ती,
आकांक्षाचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती,…उंबरठ्यावर भक्ती.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा

प्रा.डॉ.सीमा शेटे-नवलाखे,
(समाजशास्त्र विभाग)
सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ.
(dr.seemasjcsw@gmail.com) 9404373282
एका उपयुक्त विषयवारील विचार मंथनास आपण प्रसिध्दी दिली. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद!