कोरोना व्हायरस आला आणि सर्वच गोष्टीवर परिणाम करुन गेला.त्यात मुख्यतः खालील बाबींबर कोरोनाचे परिणाम दिसून आले नव्हे तर दिसून येत आहेत.
*अधिका-यांची मनमानी व शिक्षकांसमोरचे प्रश्न*
कोरोना व्हायरसच्या रुपातील पहिला गंभीर परिणाम म्हणजे अधिकारी वर्गाची वाढलेली मनमानी.अधिकारी वर्ग कोरोनाचा गंभीर धोका लक्षात घेवून गंभीरतेने वागतात हे जरी खरे असले तरी तो वर्ग केवळ आपल्या अधिकाराचा वापर करुन केवळ आदेश देण्याचे काम करीत आहे.शिक्षणक्षेत्राबाबत सांगायचं झालं तर माननिय शिक्षणमंत्री नवीन नवीन आदेश काढतात.ते आदेश पाळतांना अधिकारी चालढकल करतात.जे कामाचे आदेश आहे.त्यांचं ठीक.पण बाकीचे फालतू आदेशही ते पाळायला लावतात.उदाहरण द्यायचं झालं तर सर्व शिक्षकांना शाळेत येण्याचं बंधन नाही.परंतू काही शाळेत अधिकारी असलेला मुख्याध्यापक शाळेत येत नाही.परंतू सर्व शिक्षकांना शाळेत बोलावतो.तसेच मुलांची परीक्षा घेवू नये असे आदेश आहेत.पण चक्क हे मुख्याध्यापक ऑनलाइन परीक्षाही घेत आहेत.त्यातच शिक्षकांना वेठीस धरत आहेत.या परीक्षेत तोंडी परीक्षाही आहे.त्यामुळे ज्यांच्याजवळ स्मार्टफोन किंवा फोन आहेत,त्यांचं ठीक आहे.परंतू ज्यांच्याजवळ असे फोन नाही.त्यांची परीक्षा कशी घ्यायची हा प्रश्न शिक्षकांसमोर उभा आहे.त्यातच मुख्याध्यापकाचे म्हणणे असे की विद्यार्थ्यांसाठी तुमची नियुक्ती झालेली असून त्यांची जर परीक्षा नाही घेतली तर तुम्हाला घरी बसावं लागेल.अशी मुख्याध्यापक म्हणून नियुक्त असणा-या अधिका-याची मनमानी दिसून येत आहे.त्यातच बहुतःश खाजगी अनुदानीत शाळेत विद्यार्थ्यांची वानवा असल्यानं याच संकट काळात विद्यार्थी प्रवेशासाठी वस्तीवस्तीत शिक्षकांनी जावे असे आदेश बहुतःश शाळेचे मुख्याध्यापक देत अाहेत.तेव्हा कोरोनानं मरण्याची वेळ शिक्षकांसमोर येवून ठेपलेली आहे.
*रोजगार बुडाले;लोकं हवालदील*
कोरोनाच्या संक्रमणाला रोखण्यासाठी ज्या काळात लाकडाऊन लागलं,त्या काळात पूर्णतः रोजगार बंद होतं.परंतू आज लाकडाऊन उघडल्यावरही लोकांना रोजगार उपलब्ध नाही.लोकं हवालदील झाले आहेत.कोरोनाचा फैलाव होतो, म्हणून बरेचसे लोकं खानावळीत जात नाहीत.ठेल्यावरही खात नाहीत.तर आपल्या घरीच स्वयंपाक करून खातात.तसेच जास्त फिरायला जात नाहीत.तसेच हा संसर्ग होतो,म्हणून लोकं बांधकाम करीत नाहीत.यातच याचा गंभीर परीणाम लोकांच्या व्यवसायावर झालेला असून आजही ब-याच लोकांना व्यवसाय नाही.ते घरी बसले असून काही लोकांना आजही खायला अन्न मिळत नाही.
*पालक उदासीन;विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान*
कोरोनाच्या या संक्रमणकारी संकटकाळाचा परीणाम विद्यार्थ्यावर ब-याच प्रमाणात झालेला अाहे.काही मुलांकडे स्मार्टफोन जरी असला तरी ते त्या स्मार्टफोनवर अभ्यास करण्याऐवजी खेळ खेळत आहेत.पालकांचं त्याकडं लक्ष नाही.पालकांना मुलं ऐकत नाहीत.तसेच पालक आपल्या मुलांवर जास्त प्रेम करीत असल्यानं आपल्या प्रेमाखातर विद्यार्थ्यांवर अभ्यासाबाबत सक्ती करीत नाही.यातच मुलांचं मागील वर्षी शिकविल्याचं सर्व विसरल्याचं दिसत आहे. मुख्याध्यापकाच्या आदेशानं जेव्हा अशा परीक्षा घेतल्या गेल्या.तेव्हा चक्क उत्तरे देखील पालकांनी स्वतः आपल्या हस्ताक्षरात लिहिलेली आढळली.तसेच काही पालक तर आपल्या पाल्याबद्दल खोटंही बोलतांना दिसतात.मुले गावातच असून देखील बाहेरगावी गेल्याचं सांगतात.तसेच विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी असलेल्या ग्रुपमधून काही पालक चक्क बाहेर पडली.शिक्षकांनी संपर्क साधू नये म्हणून काही पालकांनी तर चक्क फोनच बंद करुन ठेवले.काही पालक शाळा सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवशी शाळेला भेट द्यायला आले.त्यानंतर काही पालक तर अजिबात भेटीस आलेले नसून साधा संपर्कही त्यांनी केलेला नाही.
पालकांचे फोन लागत नाही.काहींनी जाणूनबुजून फोन बंद करुन ठेवले.तर काहींनी जाणूनबुजून फोननंबरच दिलेले नाहीत. ज्यांचे लागतात तेही आमच्या मुलाला नापास करा म्हणतात.मुख्याध्यापकांच्या आदेशाने परीक्षा घेतल्या.पण काही पालकांनी त्याला प्रतिसाद दिलेला नाही.त्यामुळं आता मुख्याध्यापक नावाच्या अधिका-याच्या आदेशानं विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावायचा? हा प्रश्न संबंधीत बहुतेक शाळेच्या शिक्षकांसमोर उभा आहे.
महत्वाचं सांगायचं म्हणजे कोरोना व्हायरसने थैमान माजविले असून एक मोठं संकट सर्व वर्गासमोर उभं झालेलं आहे.ते कसं निस्तरायचं हाही प्रश्न उभा झालेला आहे.लोकांजवळ पैसा नाही.पण वीज बिल,महानगरपालिका कर,पाण्याची बिलं…….. या सरकारी बिलानी तर माणसाचे कंबरडे मोडले आहे.जिथे स्वतःचं पोट भरायला साधनं उपलब्ध नाही.तिथं अशी बिलं भरायची कुठून? तसेच ज्या माणसाचं पोट घरातील किरायावर आहे.त्यांचाही किराया येत नसल्यानं आता जगायचं कसं असे प्रश्न लोकांच्या समोर उभे आहेत.
मुख्य म्हणजे कोरोना व्हायरसने जनजीवनावर गंभीर परीणाम केलेले असून हे कोरोनाचे परीणाम रोखता येतील का? असाही आणखी एक प्रश्न जनमाणसांना सतावत आहे.तेव्हा यात कोरोनाचा तर दोष आहेच.व्यतिरीक्त प्रशासनाचाही दोष आहे.प्रशासनही लोकांना जगू देत नाही.तेव्हा काय करावे असं सर्वांना वाटत आहे.असंच जर सुरु राहिलं तर काही दिवसानंतर नक्कीच लोकं आत्महत्या करतील.दोष प्रशासनाचा राहिल.पण तो दोष प्रशासन कोरोनाला देईल यात शंका नाही.कोरोनाचा काहीही दोष नसतांना.कारण कोरोना व्हायरस ही नैसर्गीक आपत्ती आहे.
अंकुश शिंगाडे,नागपूर
९३७३३५९४५०