कोमट दुधासोबत चमचाभर तुपाचे फायदे

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

सध्याच्या जीवनशैलीत लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटासंबंधित समस्या उद्भवणं सहाजिकच आहे. अलीकडे बहुतांश व्यक्ती बद्धकोष्ठता आणि अँसिडीटीच्या समस्येशी झुंजत आहेत. तशी तर ही एक सामान्य समस्या आहे पण जर त्याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात अल्सरसारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते. पोटाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी बरेच लोक डॉक्टरांकडे जातात पण तुम्ही घरगुती उपचारांनी देखील ही समस्या दूर करू शकता.
ही एक फूलप्रूफ स्वदेशी रेसिपी आहे ज्याचा आयुर्वेदिक डॉक्टरांनीही दावा केला आहे. याचा वापर केल्याने तुमची बद्धकोष्ठतेची अर्थात पोट साफ न होण्याची समस्या चुटकीसरशी दूर होऊ शकते. या रेसिपीसाठी एक चमचाभर तूप, एक ग्लास कोमट दूध किंवा पाणी इतकंच साहित्य लागतं. याचे इतरही अनेक फायदे आहेत याबद्दल आयुर्वेदिक डॉक्टरांनी माहिती दिली आहे. बंगळुरूच्या जीवोत्तम आयुर्वेद केंद्राचे डॉक्टर शरद कुलकर्णी यांनी चर्चा करताना सांगितले की कोमट पाणी आणि तूप या घटकांचा आयुर्वेदिक औषधांच्या गोल्डन बूक मध्येही उल्लेख आहे. त्यांनी एक ग्लास गरम पाणी आणि १ चमचा साजूक तूप बद्धकोष्ठतेसाठी रामबाण उपाय असल्याचे सांगितले आहे. डॉक्टर म्हणाले अनेकदा तुपाबद्दल गैरसमज पसरवले गेले आहेत. तुपाचे फायदे मिळविण्यासाठी त्याचे सेवन कसे करावे याची योग्य पद्धत माहित नसल्यामुळे आपल्या मनात त्याविषयी गैरसमज आहेत. तूप हे ब्युटीरिक अँसिडचा समृद्ध स्रोत आहे. अभ्यासात असेही म्हटले आहे की ब्युटीरिक अँसिडच्या सेवनाने आतड्यांसंबंधित चयापचयमध्ये सुधारणा होते, ज्यामुळे मल त्यागाची प्रक्रिया सोपी व त्रासविरहित होते. यासोबतच तुपाचे या पद्धतीने सेवन केल्याने पोटदुखी, सूज येणे आणि बद्धकोष्ठतेच्या इतर लक्षणांपासूनही आराम मिळतो. आयुर्वेदिक आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तूप आपल्या शरीरात चिकटपणा निर्माण करण्यास मदत करते आणि त्यामुळे आतडी व आजूबाजूचा भाग स्वच्छ राहतो. पोलिश र्जनल प्रेजेग्लॅड गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या एका वैज्ञानिक अभ्यासानुसार, एक ग्लास कोमट पाण्यासोबत एक चमचाभर तुपाचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या कमी केली जाऊ शकते. पोट साफ करण्यासाठी तूप हे एक उत्तम औषध मानले जाते. याशिवाय त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. तूप खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि चांगली झोप येते. हे वजन कमी करण्यात देखील उपयुक्त ठरू शकते. डॉ. कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार, जर तुपाच्या या स्वदेशी रेसिपीद्वारे तुम्हाला अधिक फायदे मिळवायचे असतील तर सकाळी सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा. आपणास हवे असल्यास आपण एक चमचाभर तूप गरम पाण्यात किंवा गरम दुधात मिसळून पिऊ शकता.

Leave a comment