कार्य मूत्रपिंडाचे….

शरीरयंत्रणेतील गुंतागुंत आणि त्यात विस्कळीतपणा आल्यास होणारे परिणाम अभ्यासण्याजोगे असतात. आपल्या शरीरात अनेक जीवरासायनिक क्रिया सतत सुरू असतात. अशा प्रत्येक क्रियेदरम्यान काही टाकाऊ पदार्थ तयार होत असतात. ते साचून राहणं घातक ठरतं. त्यामुळे त्यांचा नियमित निचरा होण्याची गरज असते. त्याशिवाय आपण कळत-नकळत शरीरावर अत्याचारही करत असतो. अबरचबर खात असतो. त्यांच्या पचनातून शरीराला घातक अशी उच्छष्ट उरतात. त्यांचाही नचरा होणं आवश्यक असतं. यापैकी टाकाऊ पदार्थ रक्तात उतरतात आणि ते त्यातून काढून रक्त शुद्ध करण्याची जबाबदारी मूत्रपिंडावर असते. रक्त गाळून त्यातले टाकाऊ पदार्थ विरघळवून शरीराबाहेर टाकण्याचं कामही मूत्रपिंडाद्वारे होतं. शिवाय शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा समतोल राखण्याचं कामही मूत्रपिंडांना करावं लागतं. उन्हाळ्यात भरपूर घाम येतो. त्यामुळे शरीरातल्या पाण्याचा निचरा होतो. त्यामुळे मूत्राद्वारे अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्याची आवश्यकता नसते. हिवाळ्यात याविरुद्ध परिस्थिती असते. त्या काळात घाम येत नाही. सहाजिकच अतिरिक्त पाण्याचा निचरा मूत्रातून करणं आवश्यक असतं. त्या दिवसांमध्ये वरचेवर लघवी लागते याचं कारणही हेच आहे. अशाप्रकारे शरीरयंत्रणा सुरू ठेवण्यासाठी मूत्रपिंडाची महत्त्वाची भूमिका असते. त्यात बिघाड झाल्यास मोठी किंमत मोजावी लागते.

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
YouTube
Pinterest
LinkedIn
Instagram

Leave a comment