निसर्ग आपल्याला कधीही फसवत नाही, खरे तर आपणच स्वतःला फसवत असतो. रुसो तत्वज्ञ यांच्या विचाराची सत्यता मांडत,भाकीत करीत पर्यावरणासंबंधी संवेदनशील चिंतनशील कवीच्या कविता म्हणजे अँड.हाशम पटेल यांचा “डोंगराचा आक्रोश” निसर्ग वेळोवेळी आपत्तीचा इशारा देत असतो. त्याची प्रचिती सध्या उत्तराखंड राज्यातील जोशीमठ येथील रहिवाशांच्या वाट्याला येत आहे. अचानक जमीन फाटणे, खचणे, घरे-इमारतीला तडे जाणे, जमिनीतून पाण्याचे फवारे येणे या समस्यांनी ऐतिहासिक, धार्मिक, संरक्षण व पर्यावरणीयदृष्ट्या महत्वाच्या अशा या गावात घबराट पसरली आहे.हिमालयाच्या कुशीतील बदलती भौगोलिक, भूस्तरीय स्थिती, तिच्या रचनात्मक त्रुटी कारणीभूत होत आहेत,जोशीमठाचा परिसर भुसभुशीत जमिनीचा, कडे कोसळणे, हिमप्राताच्या दुर्दैवी घटना. त्यास टणक शिळेसारखा दणकट पाया नाही.
चारधाम काॅरिडाँर अंतर्गत रस्त्याची व्यापक कामे, डोंगरकपा-या कोरुन रस्त्याचे रुंदीकरण, जलविद्युत प्रकल्पासाठी व्यापक प्रमाणात बोगद्यासह इतर कामे, खडी मुरूम, माती, दगडासाठी डोंगर पोखरला जातोय परिणाम घरांना तडे, जमिनी खचणे, महापूर, वितळणाऱ्या हिमनद्या, नद्यांच्या प्रवाहात बदल, जंगलांना लागणा-या आगी, भूकंप क्षेत्र, भूगर्भातील हालचाली. विकास म्हणजे भकासपणा आणणे. निसर्गाला ओरबडून आपण गांधारीच्या भूमिकेत आपल्याच जीवाशी खेळत आहोत. या सृष्टी विनाशाचे महादु:ख प्रकट करणारा कविता संग्रह म्हणजे अँड. हाशम पटेल यांचा, “डोंगराचा आक्रोश.” तंतोतंत अशा विनाशकारी घटनापासून सावधतेचा इशारा देणारा संग्रह. कवी पोटतिडकीने सांगतो आहे. याची आगावू सूचनाच तो देतो आहे. असा चांगला संग्रह वाचनात आला. सर्वच जाणत्या माणसांचा आक्रोश ते कवितांमधून व्यक्त करीत आहेत.
नागनाथ कोत्तापल्ले सर प्रस्तावनेत लिहितात,”पावसाचा आणि डोंगराचा अन्योन्य संबंध असतोच डोंगरामुळे पाऊस पडतो आणि सृष्टी बहरून येते. हे माणसांचे जीवन फुलून जाते. एकूण काय की पृथ्वीचा तोल सांभाळून ठेवणारे, हे अनादि डोंगर मानवी जीवनासाठी वरदान आहेत. एवढे असूनही माणूस डोंगर भुईसपाट करीत निघाला आहे. मोठमोठी यंत्रसामुग्री आणून डोंगराच्या ठिक-या ठिक-या करीत आहे. डोंगरावर घरे बांधत आहे, पण रस्त्यासाठी,पुलासाठी,मानवी वस्त्यासाठी डोंगर नष्ट करीत आहे. विकासाच्या नावाखाली आपल्याच अस्तित्वावर आघात करुन घेत आहे. स्वतः संपतो आहे. त्यासाठी डोंगर माफिया, राजकारणी आणि बाबू लोक संगनमत करुन एकवटले आहेत. ही कवीची भळभळती जखम म्हणजे “डोंगराचा आक्रोश”.सर पुढे लिहितात, परमेश्वर दूत पैंगबरांना मक्केजवळील जबलेनूरच्या डोंगरावरची साक्षात्कार होत असत. साक्षात्कार म्हणजे परमेश्वरी दिव्य संदेश. या संदेशाचा समावेश पुढे “कुराण “मध्ये झाला या डोंगरावरील ‘गारे हिरा ‘नामक गुहेतही मोह.पैंगबर जात असत,आत्मचिंतन करीत असत. म्हणूनच ख-या अर्थाने इस्लामचे तत्वज्ञान ज्यांच्यामध्ये रुजले आहे, त्यांना आयुष्यात एकदा तरी मक्का आणि बनले निराग ला भेट द्यावी असे वाटते. हा एक दिव्यानुभव असतो.म्हणून कवी म्हणतात,
- “असा हा पहाड पवित्र प्रतिष्ठित
- उभ्या ज्ञानाचा तेज फैलावत “
प्रत्येक धर्मामध्ये डोंगरांना, पहाडाना महत्व आहे.ख्रिस्ताच्या उपदेशाचा बराचसा भाग डोंगरावरीलच आहे. हिंदूमध्येही पहाडामध्ये आणि गुहांमध्ये ऋषी तपश्चर्या करीत, बुध्दांची लेणी डोंगर पहाडामध्येच आहेत, तुरोसिना पर्वतांपासून हिमालयापर्यंत पर्वतामध्ये मोठी संपत्ती आहे, असंख्य जीवाचे आधारस्थान डोंगरच.”
प्रा.डाॅ.जयद्रथ जाधव, जिल्हाध्यक्ष,मराठवाडा साहित्य परिषद लातूर (मो.८२८५४७४७७७).यांनी या कवितासंग्रहास दिलेली प्रस्तावना सविस्तर व अभ्यसपुर्ण आहे. कवी स्वतः आपल्या मनोगतात आपल्या मनातील खंत व्यक्त करुन जलदिन, वृक्षदिन, ओझोनदिन, वन्यदिन, चिमणीदिन, जंगलदिन, हवामानदिन, पर्यटनदिन, पशुकल्याण दिन, मातीदिन, वसुंधरा दिन, पृथ्वी दिन, वन्यदिन, जागतिक पर्वतदिन ही साजरी करणे गरजेचे आहे व त्याची सुरवात आपल्या देशातून करावी अशी कळकळीची विनंती करीत आहेत यासाठी सर्वांची साथ मोलाची आहे.असे अँड.हाशम पटेल यांना वाटते..
या कविता संग्रहात एकशे दहा कविता असून डोंगर या शीर्षकास अनुसरून तब्बल सत्तेचाळीस कविता आहेत यावरून आपणास कवीच्या मनात डोंगराविषयी किती आत्मीयता आहे ते कळते. बाकीच्या कविता त्यांस अनुसरूनच आहेत.
डोंगर आक्रोश करु लागले आहेत ते आपल्या अस्तित्वासाठी धडपडत आहेत, आधुनिक यंत्रामुळे चोहोबाजूनी घेरले आहेत, महाकाय डोंगर हतबल होऊन टाहो फोडत आहेत, उत्तुंग शिखरे कोसळत आहेत, निसर्ग सौंदर्य लोप पावत, अश्रू ढाळत, थरथर कापत आहे, पाऊस, पाणवठे संपत आहेत, ग्रीष्माचा उकाडा असह्य करतोय, ढग क्रोधाग्नीत होऊन विजाचा वर्षाव होत आहे, डोंगरफोड अभियानाचा ढोल वाजतो आहे, शूर वीरांचा पराक्रम, धर्मकारणाच्या, राजकारणाच्या कूटनीतीला बळी पडत आहे. जेसीबी, पोकलँडने खोदून खोदून चुरा चुरा केला जातोय. कवी अस्वस्थ होऊन “डोंगरानो..” या कवितेत म्हणतात,
- तेंव्हा अभ्यासक्रमात
- तुम्हाला डायनासोरसारखे
- अचंबीत होऊन वर्णिले जाईल
- तुमचे महत्व गरजा फायदे सांगितले जाईल
- तेंव्हा हातात काहीच उरलेले नसेल “
वेळीच सावध व्हा हा इशारा कविताच देत, तुरेसीना ते हिमालयातील अगणित वनस्पती, खजाना आहे तो सांभाळा बाबानो ! म्हणत आहेत. १९७२ नंतर पावसाळे लहरी झाले. नदी- नाले कोरडे पडून धरतीच्या पोटातील पाणीच आटल्याने कवी हतबल होतो, दुष्काळ आठवतो, सुकडी-मिलोचे दिवस आठवतात, सारे जीवनच दुष्काळग्रस्त या कवितेत म्हणतात,
- शालेय जीवनात
- चढत्या वयात
- दुष्काळ सुरु झाला
- वृद्धापकाखापर्यंत
- दुष्काळच सोबत
- असा अविरत राहिला
कधी धो धो पडणाऱ्या पावसाने कवी सुखावतो. अतिपावसात चेहरा काळाभोर होतो, गारपीटने मरणग्रस्त होतो, मरणग्रस्त कवितेतून खंत मांडतात,
- या सा-या प्रलयात
- पशुपक्षी प्राणी
- तहानग्रस्त बिचाऱ्या मूल्याची
- काय वर्षाची कहाणी
- मृत सांगाड्यांची
- सर्वत्र सडकी निशानी
कवी पाण्यासाठी वणवण भटकतो, पावसाबरोबर बाजारभावही दगा देतो यातच शेतकरी आयुष्यभर बुडतो. हे सर्व विदारक चित्र पाहून कवी हाशम पटेल म्हणतात, आता पर्वतदिन साजरा करा. त्याचे संवर्धन करा, पर्वत रक्षणासाठी नारा द्या, लहान टेकड्या शेतीची लेकरे आहेत, सडका निर्मितीसाठी त्यांना वापरु नका, डोंगराचे विमाळतळ करु नका, रेल्वे धावपट्ट्या, कारखाने, बोगदे पोखरून डोंगरांची राखरांगोळी करु नका, डोंगराच्या खांडोळ्या करुन मधोमध रस्ता कशाला करता? वणवा पेटल्यागत लाव्हाच्या ज्वाला तिन्ही ऋतूत उन्हांळा. पाणीही पेटते आहे, रोहिणीचा पाऊस स्वप्नवत होत आहे. मृग थबकत येतो अन् मानवालाच दोष देतो आहे. बळीराजा पेरणीतच बसला आहे, अद्याप पेरणी नाही,या कवितेत कवी हाशम म्हणतात,
- पर्वत वनाची झाली उभी कापणी
- म्हणून पर्यावरणाची बिघडली वाटणी
गुत्तेदार अनाधिकृत आक्रमण करुन सरकारी बाबूच्या साह्याने डोंगराचा गळा कापतो आहे, जंगल कवितेत,
- जंगल आहे तर
- जल आहे
- जल आहे तर
- जीवन आहे
असा साधा मंत्र कवी हाशम पटेल देतात. जंगलच नसल्याने सारे ओसाड होईल. त्याआधी सावध व्हा. असा इशारा देतात. डोंगर पर्वत, टेकड्या यांना इजा करु नका. शिखर पाडू नका, वृक्षतोड करु नका म्हणत,
- वृक्षतोड बंदी,डोंगर तोड बंदी
- हीच पर्यावरणाची खरी नांदी.
छोट्या चिमण्यांना आपल्या बाळांना डोंरफोडीच्या गुजगोष्टी सांगण्यासाठी डोंगर जपा बाबानो !!असे ते व्यक्त करतात. विकासाच्या नावाखाली स्वतः चा विनाश करु नका.
कवी हाशम सरांची कविता डोंगर, दरी, परिसर, नदी, नाला, झाडी, कोसळणारे डोंगर, पर्वत, हिमालय, जागतिक पर्यावरण, माणसे, चिमण्या, पानापानातून, फुलातून, रानावनातून, मनामनातून,चिंबभिजलल्या पावसाच्या थेंबातून, दुष्काळाच्या रखरखलेल्या उन्हातून, घनगर्जेनेतून, प्राणी, डोंगररांगा, जंगल, वृक्षतोड, यंत्रे, या आसाभोवती कविता फिरत राहते, अस्वस्थ करते, विचार करायला लावते, मनातील आक्रंदन शब्दातून बाहेर येते, साध्या सोप्या काव्यशैलीतून तिचा प्रवास प्रवाही होतो, गतिमानता, संवेदनशील मनाची झलक प्रत्येक कवितेतून स्पष्ट दिसते, कोठेच वकिलीचा रूबाब दिसत नाही, अनुभूतीच्या धाग्यानी प्रत्येक ओळ कवी विणत जातो, सुक्षता, कल्पनाशक्तीचा अविस्मरणीय अविस्कार, संवेदनशील अभिव्यक्ती जीवनाच्या समस्याचे भाष्य करीत हृदयातील लाव्हारुपी शब्द आपोआप वाचकांच्या पर्यंत भिडतात, विचार करायला लावतात, मन बधीर होत असल्याची जाणीव होते, विकासाच्या दारात माणूस उभा असल्याचे चित्र तो वाचकांच्या मनात पेरत जातो.
जीवन, सर्जन, संघर्ष याचे अस्त्र कवितेतील शब्द होतात. तणावग्रस्त संघर्षाचे, परिपक्व विचाराचे स्पंदन मनात रिझवण्यात कवी यशस्वी झाला आहे. भाषिक कौशल्याचा वापर सहज करीत, यमक उच्च कोटीचे आहेत. डोंगराचा आक्रोश, ढगांचा संग्राम, डोंगराचाअंत, वादळवारा, मरणग्रस्त, डोंगराचा शिरच्छेद, जबले नूर, रोहीणीचा पाऊस, वतनाचे डोंगर, डोंगराची चोरी, आमच्या गावाकडे, बेवारस डोंगर, डोंगरी चिमण्या, एक डोंगर भुईसपाट, डोंगराचे अश्रू, आर्त किंकाळ्या या कविता पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा आहेत, आक्रोश, चुराडा, सडका, गायब, डोंगरधन, बुलंदी, खुंट्याप्रमाणे, उलथापालथ, जेसीबी, पोकलँड, हुंदके ग्रेनाइड, रेस्ट हाऊस, एक्सप्रेस, गोरीमोरी, खांडोळ्या, बाँम्बने, दगडधोंडे, चर्र्रर्र, व्हायरस, कपा-या, पल्याड, बंबाळ, गर्देत, गिरीकंदर, नूर असे अनेक शब्द चपखलपणे वापरून कवितेतले वास्तव जीवंत करण्यात, मनातला कल्लोळ मांडत निसर्ग रक्षणाचा, विश्व रक्षणाचा मोलाचा विचार मांडत कवी वेगळी स्वतंत्र पायवाट निर्माण करतो आहे.
हा कविता संग्रह के.एस.अतकरे यांनी कैलास पब्लिकेशन, औरंगपूरा, औरंगाबाद, मो.९३२५२१४१९१ यांनी प्रकाशित केला आहे. मुखपृष्ठावर सरदार जाधव औरंगाबाद यांचे अप्रतिम चित्र कवितांना न्याय देवून जाते. शिवाय प्रत्यक्ष घेतलेले फोटो सत्य परिस्थितीची जाणीव करुन देतात, मलपृष्ठ तेही हाशम पटेल यांच्या कवितेचा भावार्थ डाॅ.जयद्रथ जाधव, लातूर. सरांचे भाष्य थोडक्यात पण परिपूर्ण असे आहे. एकंदरीत काव्यसंग्रह संग्रही असावा असा आहे. पर्यावरण संवर्धनाय असा उल्लेख करुन केल्याने कवीच्या मनातील निसर्गप्रेम व तळमळ स्पष्ट दिसते. कवीच्या पर्यावरण संवर्धन यात्रेचे आपणही सहभागी होऊन धरतीचं ऋण फेडण्याचा संकल्प करु या. अँड.हाशम पटेल सरांना पुढील लेखन कार्यास हार्दिक शुभेच्छा..!
- * डोंगराचाआक्रोश
- (कविता संग्रह)
- * अँड. हाशम इस्माईल पटेल
- * लातूर
- * कैलास पब्लिकेशन्स,औरंगाबाद
- * स्वागत मुल्य :२००रुपये.
- * मो.०९४२२६५८७५२,
- * ८६६८९२१५७४.
- * आस्वादक
- * मुबारक उमराणी
- * सांगली
- * ९७६६०८१०९७
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–