तसं पाहिलं तर करजगाव ही बंजारा बहुल वस्ती आहे. येथे जवळपास 75टक्क्यापेक्षा जास्त बंजारा समाज असून मी लहान असताना येथे कसना नायक, खंडू नायक, प्रभु नायक, रामू नायक, भोजू नायक, सपावट तांडा, नंदु नायक असे सात तांडे होते. मुळातच बंजारा समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. त्यातल्या त्यात करजगावच्या तांड्यातील होळी हा एक सण म्हणून नाही तर सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा केला जाई. होळीच्या एक दिड महिना अगोदरच तांड्यात लेंगिचे सूर ऐकायला मिळायचे. वसंत ऋतूची चाहूल लागताच चार चौघे सुरात सुर मिसळून होळी गिते गात त्यालाच ‘लेंगी’ म्हटले जाई. मागील पिढीकडून पुढिल पिढीकडे हस्तांतरित झालेली ही गिते मौखिक स्वरुपाची असायची. बंजारा समाजाचे प्रेरणास्थान जगत् गुरू संत सेवालाल महाराज यांच्या नामस्मरणाने लेंगी गीताची आणि न्रुत्याची सुरूवात होत असे. लेंगित डफडे वाजविणाराची भूमिका फारच महत्त्वाचीअसे. तोच लेंगी गिताचे संचलन करित असे.
लेंगिगित गाताना गोलाकार रचना केली जाई. त्यांचे समसमान दोन भाग केले जाई. एका गटाने आवाजाच्या चढत्या सूराने सुरूवात केल्यावर दुसरा गट तेवढ्याच ताकदीने हावभाव, हातवारे करत तेच चरण गात असे. ऐकायला ते फारच सुरेल वाटायचे. फत्तुबुवा चव्हाण, फुलसिंग आडे,, मेरचंद चव्हाण, बळीराम भोजु राठोड, नामदेव खंडू चव्हाण, हे जुन्या काळातील तर देवराव परशराम राठोड, देवसिंग दावडा राठोड, रामराव सिताराम राठोड, देवसिंग मंगू राठोड ,रामराव रामधन चव्हाण, भिमराव लालू राठोड, काळूसिंग कनिराम राठोड ,वामन पवार श्रावण चव्हाण, हे करजगावातील पट्टीचे लेंगि गायक मानले जातात. तांड्यात एखाद्या घरी मयत झाली असेल तर तांड्यातील आबालवृद्ध होळीच्या दिवशी त्याच्या घरी जाउन त्यांचे सांत्वन करत. मयताच्या घरच्यानी केवळ म्रूतकाचा शोक करित न बसता नव्याने कामाला लागण्याचे आवाहन करत.
आज रोजी करजगावात रमेश नायक, देवा नायक, शेषराव नायक, उत्तम नायक, परशराम नायक, मिठ्ठू नायक, प्रल्हाद नायक, दुर्गासिंग नायक असे एकूण नऊ तांडे आहेत. फाल्गुन प्रतिपदेला तांड्याचे नायक होळीचे विधीवत पूजन करून होळी पेटवितात. दुसर्या दिवशी दारु व बोकड कापण्यासाठी पैसे मागितले जायचे त्याला ‘फगवा’असे म्हणत. पुर्वी होळीच्या दिवशी धुंड नावाचा संस्कार केला जात असे. गर्भवती स्त्रीला मुलगा व्हावं ही गेरियाची इच्छा असे आणि जर का गेरणीला होळीपुर्वी मुलगा झाला तर त्या नवजात मुलाचा स्वागत सोहळा एखाद्या लग्नाप्रमाने केला जाई. आता हा संस्कार बहुतेक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. करजगावातील शेवटची धुंड विष्णू कसनदास जाधवची केली होती असे म्हणतात. त्यानंतर हा संस्कार कोणी केल्याचे ऐकिवात नाही. होळीच्या दिवशी तांड्यातील बहुतेक घरी लापशी, (कडाव )शिरा बनवून आपल्या पूर्वजांना धबुकार द्यायचे. दिवसभर होळीचा फाग खेळला जाई.
बाकी तांड्यातील या सांस्कृतिक उत्सवात प्रेम, श्रुंगार आणि सामाजिक बांधिलकी यांचे प्रतिबिंब उमटलेले दिसायचे. पण दुर्दैवाने मागील पन्नास वर्षात या उत्सवाचा उत्साह,लेंगी न्रुत्य, काही संस्कार कमी झाले आहेत .तेव्हा तांड्या तांड्यात लेंगी गीत,लेंगी नृत्य स्पर्धांचे आयोजन करून हा सांस्कृतिक ठेवा जतन करणे गरजेचे आहे.
छाया :
- श्री. मधुकरराव सवाईराम चव्हाण, पुसद
- श्री. विजयराव गोपीनाथ ढगे, यवतमाळ