- ‘उलगुलान’च्या माध्यमातून घडले तेरा डॉक्टर…
कुपोषणाचा प्रश्न असलेल्या मेळघाटसारख्या अतिदुर्गम आदिवासीबहूल भागातून सुविधांचा अभाव असताना तेथील आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ‘नीट’ परीक्षेत घवघवीत यश संपादीत केले आहे. त्यांना राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी (एमबीबीएस) प्रवेश मिळाला आहे. मेळघाटची ही मुलं डॉक्टर होऊन पुन्हा आपल्या भूमीत सेवा बजावणार आहेत. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व लिफ्ट फॉर अनलिफ्टमेंट संस्थेच्या ‘उलगुलान’ नीट प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून मेळघाटच्या दुर्गम गावांतील तेरा विद्यार्थी ‘नीट’ उत्तीर्ण होऊन वैद्यकीय शिक्षणासाठी जात आहेत. मेळघाटच्या इतिहासात हे पर्व सुवर्ण अक्षरात लिहीले जाणार आहे.
आदिवासी क्रांतीकारी बिरसा मुंडा यांनी आदिवासींना एकजूट करुन ब्रिटीशांच्या विरुध्द ‘ऊलगुलान’ नावाने स्वातंत्र्याचा लढा दिला. या ऊलगुलान चळवळीपुढे ब्रिटीश सरकारला नतमस्तक होऊन इ.स.1900 मध्ये छोटा नागपुर क्षेत्रात जमीन सुधारणाविषयक कायदा लागू करावा लागला होता. याच प्रेरणेतून कुपोषण व आरोग्याचे विविध प्रश्न असलेल्या मेळघाटात परिवर्तन घडवून आणण्यासाठी ‘ऊलगुलान’ नीट प्रशिक्षण केंद्राची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. तेथील पाड्यापाड्यांवर, दूर्गम गावांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
आदिवासी विद्यार्थ्यांना डॉक्टरकीच्या पूर्वतयारीसाठी धारणी तालुक्याच्या बिजूधावडी गावात 2017 मध्ये हे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले. शिक्षणाचा अभाव असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी नीट प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून येथील आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी एक जिद्दीने वाटचाल सुरु केली. त्यांच्या या उत्साही पावलामुळेच मेळघाटचे सुपुत्र मेळघाटात आरोग्य सेवा बजावतील व तेथील आरोग्य सेवा-सुविधांमध्ये दूरगामी सकारात्मक परिवर्तन घडून येईल, अशी आशा निर्माण झाली आहे.
बिजूधावडी हे दुर्गम गाव अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात वसले आहे. अमरकंटकपासून ते थेट पश्चिम किनाऱ्याच्या 600 मैलपर्यंत पसरलेल्या सातपुडा पर्वतरांजीच्या दऱ्याखोऱ्यात मेळघाटचा परिसर येतो. अमरावती जिल्ह्याच्या पश्चिमेस असलेला हा जैवविविधतेने संपन्न असा प्रदेश आहे. देशातील 1972 साली स्थापन झालेल्या पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प याच प्रदेशात आहे. मेळघाटमध्ये धारणी व चिखलदरा ही दोन तालुके येत असून येथे कोरकू, गोंड, गवळी, बलई या जमातीचे लोक राहतात. त्यात कोरकू बांधवांची संख्या जवळपास 80 टक्के आहे.
मेळघाट हे आदिवासीबहुल क्षेत्र कुपोषण व बालमृत्यूसंदर्भात नेहमीच चर्चेत असते. शिक्षण, आरोग्य सुविधा, दळणवळणाची रस्ते, कनेक्टिविटी, रोजगार यांचा अभाव असल्याचे नेहमी चर्चिले जाते. कुपोषणाच्या निर्मूलनासाठी शासनाने मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अशी भक्कम यंत्रणा उभारली आहे. मात्र, अनेकदा वैद्यकीय अधिकारी या क्षेत्रात जाण्यास अनुत्सुक असतात, अशीही तक्रार होत असते. त्यामुळे मेळघाटच्या लेकरांनाच डॉक्टर बनविण्याचे ध्येय घेऊन हे ऊलगुलान सुरु झाले आहे.
धारणीचा एकात्मिक आदिवासी प्रकल्प आणि पुण्याची लिफ्ट फॉर अनलिफ्टमेंट ही स्वयंसेवी संस्था यांनी एकत्रितपणे बिजूधावडीच्या आदिवासी आश्रम शाळेत ‘ऊलगुलान’ नावाचे वैद्यकीय पूर्व प्रशिक्षण केंद्र स्थापन केले आहे. येथील विद्यार्थ्यांनी बारावीनंतर होणारी नीट परीक्षा उत्तीर्ण व्हावे आणि त्यांना वैद्यकशाखेत प्रवेश मिळून ते डॉक्टर व्हावेत, असे या केंद्राचे उद्दिष्ट आहे.
बिजूधावडी हे दुर्गम गाव धारणी मुख्यालयापासून दक्षिण-पूर्व दिशेला सुमारे 20 किलोमीटर अंतरावर वसले आहे. राणीगाव, सुसर्दा, टेंबली, टेंब्रुसोडा व बिजूधावडी अशी ही पंचक्रोशी. या परिसरातील मुलांनी वैद्यकशाखेकडे जाऊन डॉक्टर होण्याची संकल्पना तत्कालीन प्रकल्प अधिकारी डॉ. विजय राठोड यांची. ही कल्पना ‘लिफ्ट फॉर अनलिफ्टमेंट’च्या सहयोगाने तत्काळ अमलात आणली आणि ही पाच गावे मिळून बिजूधावडी येथे शिक्षकदिनाच्या मुहुर्तावर दि. 5 सप्टेंबर 2017 रोजी वैद्यकीय पूर्व प्रशिक्षण केंद्राची आदिवासी आश्रम शाळेत स्थापना झाली.
मेळघाटात डॉक्टरांची वानवा ही बाब डॉ. राठोड यांना सतत अस्वस्थ करत होती. त्यामुळे तेथील आरोग्य सुविधांच्या अडचणींविषयी सखोल अभ्यास करुन त्यांनी त्यावर रामबाण उपाय शोधला. मेळघाटात आरोग्य सुविधेच्या अभावी बालमृत्यू, मातामृत्यू तसेच कुपोषणाची तक्रार असते. शासनाव्दारे डॉक्टरांची नियुक्ती या क्षेत्रात केल्यावर दोन-तीन वर्षातच येथील डॉक्टर बदली करुन घेतात, अशीही तक्रार असते. यावर कायमचा उपाय म्हणून जर याच क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थी डॉक्टर झाले तर ते आपले गाव, परिसर व समाजाच्या आस्थेपोटी आपल्या परिसरातच अधिक सक्षमतेने काम करतील, या भावनेतून हा प्रकल्प आकारास आला.
एमबीबीएस आणि बीडीएसला प्रवेश घेण्यासाठी महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. यासाठी बारावी इयत्तेत फिजीक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉयोटेक्नॉलाजी, इंग्रजी विषय घेऊन 12 वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. बिजूधावडी येथील नीट प्रशिक्षण केंद्रातील तेरा विद्यार्थ्यांनी वर्ष 2020 च्या नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन जगाला दाखवून दिले की, ‘हम भी किसीसे कम नही’.
11 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना पुण्याच्या लिफ्ट फॉर अनलिफ्टमॅन या संस्थेच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून विनामूल्य, कुठलेही मानधन न घेता शिकविले. आजूबाजुच्या परिसराच्या गावातील मुलांनीही शिक्षकांच्या या श्रमाचे मोल जाणून नीट परीक्षेत यश संपादीत करून दाखविले. सुविधांचा अभाव असतानाही दुर्दम्य इच्छा व अथक परिश्रमाची बळावर बारा-बारा तास अभ्यास करून मेळघाटच्या या मुलांनी यश संपादित केले आहे. डॉक्टर होऊन ही मुले पुन्हा मेळघाटच्या सेवेत परतणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या भूमी व समाजाप्रती ते निश्चित बांधिलकी जपतील, असा विश्वास आहे.
आदिवासी मुल ही लाजाळू पण प्रामाणिक असतात. गरज आहे ती फक्त त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करुन योग्य मार्गदर्शनाची. शहरातील इतर विद्यार्थ्याप्रमाणेच त्यांच्यातही अभ्यास व कठोर परिश्रम करण्याची जिद्द आहे. त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा या हेतूने शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी बिजूधावडी याठिकाणी येऊन विद्यार्थ्यांना लिफ्ट फॉर अनलिफ्टमॅन संस्थेतील डॉक्टरांनी शिकविले. त्यांच्यातील परीक्षेची भीती घालवून आत्मविश्वास निर्माण केला. आज त्यांनी नीट परीक्षा उत्तीर्ण करुन राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला आहे. हीच मुलं उद्या डॉक्टर संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण करुन समाजाच्या बांधीलकी जोपासण्यासाठी, ऋुण फेडण्यासाठी येथे आरोग्य सेवा देतील.
या नीट प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके व शैक्षणिक साहित्य धारणी प्रकल्प कार्यालयाव्दारे पुरविण्यात येतात. प्रशिक्षण घेण्यासाठी आजूबाजूच्या गावावरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्या, साहित्य तसेच त्यांच्या जेवणाची, निवासाची, जाण्या-येण्याची सोय, संपूर्ण सुविधा आश्रमशाळेमार्फत केली जाते. यासाठी त्यांना प्रकल्प कार्यालयाकडून निधी पुरविला जातो. बाहेरगावाहून येणारे तज्ज्ञ मार्गदर्शकांची भोजन,निवासाची सोय स्वयंसेवी संस्थेव्दारे करण्यात येते. एक दिवस हे ‘ऊलगुलान’ मेळघाटाच्या आरोग्य सेवेत मोठा विधायक बदल घडवून आणेल, असे या प्रसंगावर दिसून येते.
- चौकट :
‘आम्ही मेळघाटची मुले आहोत. डॉक्टर होऊनच परतू. आम्ही मेळघाटात परतून आमच्या बांधवांची सेवा करू, असे धारणी तालुक्यातील झापल येथील रहिवाशी व मुंबईच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या शांतीलाल शालिकराम कासदेकर याने सांगितले. चिखलदरा तालुक्यातील आकी येथील शिवकुमार सावलकर व मल्हारा येथील मयुरी दारसिंबे यांनी मनोगत व्यक्त केले.’
चिखलदरा तालुक्यातील साव-या येथील राहूल भय्यालाल कासदेकर, धारणी तालुक्यातील आकी येथील अंकुश सावलकर, शिवकुमार सावलकर, उकुपाटी येथील दुर्गेश कासदेकर, कारदा येथील सुधीर मावसकर, मांडवा येथील रोहित कासदेकर, टिटंबा येथील श्याम कोल्हे, राणीगाव येथील श्याम कासदेकर, बेरडाबेल्डा येथील नितेश जांभेकर, मांडवा येथील अजय जांभेकर, चिपोली येथील रेणुका पटोरकर आदी गुणवंत विद्यार्थी डॉक्टर बनून मेळघाटात परतणार आहेत.
- -विजय राऊत
- सहा. माहिती अधिकारी
- जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती