आषाढी/कार्तिकी वारी ऐक्याचे प्रतीक

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

    पाऊले चालती पंढरीची वाट|
    सुखी संसाराची तोडुनिया गाठ|
    पाऊले चालती पंढरीची वाट||

    असं म्हणत वारकरी आषाढी एकादशीच्या वारीला निघतात. विठ्ठल रुक्माई ,विठोबा रुक्माईचा गजर आसमंतात दुमदुमतो. लाखोंच्या संख्येने येणारा वारकरी मेळा देशाच्या अनेकविध प्रांतातून एकत्र येत असतो. ना कुठले आमंत्रण, ना रुसवा फुगवा, ना मोठेपणाचा डौल, ना जातीपातीचा भेदभाव, ना गरिबीची लाज, ना लहान थोरांचा मानपान, ना जेवणाचा शाही थाट. तरीही पांडुरंगाच्या भेटीसाठी चाललेले प्रत्येक पाऊल श्रद्धेने, भक्तीने पांडुरंगाच्या दर्शनासाठी आसुसलेले असते. मजल दर मजल करत एकमेकांना सोबत घेऊन भजनात तल्लीन होऊन हा मेळा वाऱ्याच्या वेगाने पंढरपूरकडे झेपावतो. वाटेत येणाऱ्या छोट्या मोठ्या गावांना आपल्या पदस्पर्शाने पुनीत करित वारकरी संप्रदाय संतांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतो.

    माझ्या गावातून जाणारी नामदेवांची पालखी, मुक्ताईची पालखी, गजानन महाराजांची पालखी, इ. फक्त आठवण काढली तरी एक वेगळाच आनंद मनातून संचारतो. आज ही आठवतं , शतकापासूनची असलेली परंपरा गावाने अजूनही जपून ठेवली आहे. पालखी गावापासून एक दीड किलोमीटर लांब आहे तोपर्यंतच गावात लगबग सुरू होते. प्रत्येक जण आपल्या दारात सडा रांगोळी करतात. गावातील टाळकरी, भजनकरी, टाळ पखवाज पताका चिपळ्या घेऊन पालखीच्या स्वागतासाठी वेशीवर जातात.

    विठ्ठल रुक्माई चा नाम घोष वाक पालखीचे गावामध्ये स्वागत होतं. दिंडी गावात पोहोचताच वारकऱ्यांच्या स्वागतासाठी गावातून अनेक चहाचा किटल्या मंदिरामध्ये जमा होतात. संध्याकाळच्या जेवणासाठी गावातून आजही दवंडी पिटवली जाते आणि वारकऱ्यांसाठी जेवण गोळा केलं जातं. ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार धान्यही मंदिरामध्ये जमा होतं आणि सहभोजणाचा एक सुंदर कार्यक्रमाच गावात पार पडतो. अनेक जण आपल्या घरी वारकऱ्यांना जेवायला बोलवतात. वारकरी आपल्या घरी जेवायला येणार हे खूप समाधानाचं मानलं जातं. रात्रभर कीर्तनाचा खूप छान आस्वाद गावकऱ्यांना मिळतो आणि भल्या पहाटे धावत पळत येणारी पालखी धावत पळत निघून जाते. पण तो क्षण पुढे वर्षभर एक वेगळीच ऊर्जा निर्माण करून जातो.

    सर्वात श्रीमंत असणार्या गजानन महाराजांच्या पालखीचे सौंदर्य डोळे दिपवणारे आहे. पुढे घोडे, अब्दागिरी आणि टाळकरांच्या तालासुरात मागून येणारे हत्ती. या पालखीवरून अनेक जीवनावश्यक वस्तूंचे आजूबाजूला गोरगरीब लोकांना वाटप करत ही पालखी अगदी धावत पळतच गावातून वेशीवरून निघून जाते.

    गाव वेसिवरून जाणाऱ्या ह्या दिंड्या, वारकऱ्यांच्या मधील एकी, निस्वार्थ भक्ती भाव,पाहिला की आजही आपली भूमी संतांची भूमी आहे हे मनोमन पटतं. आणि सोयराबाईची ती रसाळ रचना आपोआप जिभेवर रेंगाळते,

    अवघा रंग एक झाला|
    रंगी रंगला श्रीरंग||
    मी तू पण गेले वाया|
    पाहता पंढरीचा राया||
    लेखिका :-सौ आरती लाटणे
    इचलकरंजी, 99 70 26 44 53

Leave a comment