अमरावती : कोरोना साथीची पार्श्वभूमी लक्षात घेता शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अधिक दक्षतापूर्वक पार पडणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत सहभागी आरोग्य पथकाचे स्वतंत्र व काटेकोर प्रशिक्षण घ्यावे, असे स्पष्ट निर्देश सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.
निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय नोडल अधिका-यांची बैठक आज जिल्हा निवडणूक अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी मनोज लोणारकर, मनीष गायकवाड, उमेश खोडके, अधीक्षक तथा तहसीलदार गजेंद्र मालठाणे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी जयश्री नांदुरकर, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार श्याम देशमुख यांच्यासह निवडणूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. नवाल म्हणाले की, कोरोना साथीच्या काळात निवडणूक होत असल्याने प्रक्रियेतील सहभागी सर्वांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन निवडणूक प्रक्रिया सुरक्षित वातावरणात पार पाडण्याची सर्वांची जबाबदारी आहे. मतदान केंद्रांवर दक्षतेच्या सर्व सुविधा उपलब्ध राहणार असून, आरोग्य पथकांची जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे त्यांचे स्वतंत्र व काटेकोर प्रशिक्षण आयोजित करावे. त्यांना सविस्तर सूचना द्याव्यात. मतदानकेंद्र निहाय मतदान अधिकारी, कर्मचारी व सूक्ष्म निरीक्षक यांच्या प्रशिक्षणाबाबत विहित वेळेत नियोजन करावे.
निवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांना सभा, मिरवणुका व इतर विविध परवानग्यांसाठी एक खिडकी कक्ष कार्यान्वित करावा. मतदान कर्मचारी प्रशिक्षणाची व्यवस्था व मनुष्यबळ व्यवस्थापनाबाबत विहित वेळेत नियोजन करून प्रशिक्षण सत्र निश्चित करावे. निवडणूकीच्या अनुषंगाने जाहिरातींचे प्रमाणीकरण, मजकूराचे संनियंत्रण आदी कामे माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीने करावी. मतदारांना मतदार केंद्रावर आवश्यक सुविधा पुरविणे व मतदान केंद्र सुस्थितीत असल्याची खातरजमा सर्व तालुक्यांच्या तहसीलदारांनी करावी. मतमोजणी केंद्रावर आवश्यक त्या सर्व व्यवस्था व सुरक्षेसंबंधित कार्यवाही व्हावी. आवश्यक त्या ठिकाणी मतदार मदत कक्ष व तक्रार निवारण कक्ष स्थापन करावेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व कार्यवाही काटेकोरपणे व्हावी. कुठेही चूक होता कामा नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हा निवडणूक अधिका-यांनी दिले.