शेवगा हे पीक कोरडवाहू शेतकर्यांसाठी वरदान ठरते. शेवग्याचे झाड अतिशय लवकर वाढते. भारतामध्ये बहुतेक सर्व उष्ण, आद्र्र हवामान असलेल्या ठिकाणी शेवग्याचे उत्पादन घेतले जाते. शेवग्याच्या शेंगा वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात. शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्व आहेत. शेवग्याच्या पाने, शेंगा, कोवळ्या फांद्या आणि बियामध्ये पोषक घटक असतात.
जीवनसत्व अ, ब आणि क, खनिज विशेत: लोह आणि सल्फर, सिस्टेनाइन, अमिनो आम्ले असतात. त्यात भरपूर पोषक घटक आणि रोगप्रतिकार घटक असतात. त्यामुळे शेवग्यचा विविध भागांचा वापर ३00 पेक्षा अधिक आजारांच्या उपचारामध्ये केला जातो. शेवग्याच्या शेंगा, पाने, बियांपासून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात.
शेवग्याचे आरोग्यदायी फायदे
शेवग्याच्या पानाच्या रसाच्या सेवनाचे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. शेवग्यचा पानाचा रस मधाबरोबर घेतल्यास डायरिया, जुलाबावर गुणकारी आहे, या रसामुळं पोटातील कृमींचा नाश होण्यास मदत होते.
शेवग्याच्या पानाचा रस मधुमेह असणार्या व्यक्तीचे ग्लुकोजची मात्रा नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते, शेवग्याच्या पानाचा रस त्वचेसाठी एन्टीसेफ्टीक म्हणून वापरला जातो.
डोकेदुखीचा त्रास उद्भवल्यास शेवग्याचे पाने कपाळावर चोळून लावल्यास डोकेदुखी कमी होते तसेच शरीराच्या भागावर सूज आली असल्यास ती कमी करण्यासाठी शेवग्याचा पाल्याचा उपयोग होतो.
शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळं हाडांचे कुठलेही आजार उद्भवतं नाही. शेवग्यामुळे शरीराची रक्तशुद्धीकरण व्यवस्तीत होते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
शेवग्याच्या शेंगाच्या सूप पिल्याने ब्राँकायटिसचा त्रास कमी होतो, शेवग्यामध्ये असलेले नियासिन, रायबोफ्लॅविन, फॉलिक एसीड व बी कॉम्पलेक्स जीवनसत्वे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. शेवग्याचा पानापासून तयार केलेले सूप अस्थमा आजारामध्ये औषधचे काम करते. मुतखडा तसेच हृदयरोग, कर्करोग यासारख्या गंभीर आजारांवर शेवग्याच्या प्रभावी उपयोग होतो, तसेच शेवग्याचा प्रभावी उपयोग होतो, तसेच शेवग्याची पान, फुल, फळ, बिया, साल आणि मूळ अशा सर्वच गोष्टीचा उपयोग आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी होतो.
शेवग्यांच्या पानाची भाजी सेवन केल्याने आतड्याना उत्तेजन देऊन पोट साफ करते, त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी फायदा होतो. तसेच आतड्यातील जखमा भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरते.