- * डॉ.श्रीकर परदेशी सरांसारखे पारदर्शक अधिकारी कुणी होणारच नाही..!
डॉ. श्रीकर परदेशी सरांचा जन्म सांगली शहरात झाला. त्यांचे वडील सांगलीला नोकरीला असल्यामुळे त्यांचे बालपण सांगली शहरातच गेले. अभ्यासात लहानपणापासूनच ते अतिशय हुशार होते. त्यामुळे शिक्षणाकरीता ते पुणेला गेले व पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेतले. पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस व एमडी पूर्ण केले. त्यादरम्यान यूपीएससीकडे वळले आणि पहिल्याच प्रयत्नात चांगली रॅंक घेत गृह केडर मिळवले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड आदी ठिकाणी काम केले. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कामाची छाप पडलेली आहे. आजही त्यांनी काम केलेल्या प्रत्येक जिल्ह्यात परदेशी साहेबांचं नाव घेतल्या जाते.
यवतमाळ जिल्हा परीषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन कार्य करतांना हजारो बेरोजगारांचे शासकीय नोकरीचे स्वप्न त्यांनी पूर्णत्वास नेले. एकाच दिवशी म्हणजेच केवळ तीन तासात परीक्षा, निकाल व मुलाखत घेऊन लगेच नियुक्तीपत्र देण्याची किमयाही त्यांनी केली. म्हणून अनेक गरजू बेरोजगारांना नोकरी लागली. नोकर भरतीच्या पारदर्शी प्रक्रियेचा पायंडा त्यांनी पाडला होता. त्या काळात एवढी प्रगत यंत्रणा नव्हती. त्यामुळे कधी, कुठे आणि कशाची भरती निघाली व ती केव्हा पार पडली हे कळत नव्हतं? परंतु ज्यांना कळायचं त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अवघ्या महाराष्ट्रातील बेरोजगार यवतमाळ जिल्हा परीषदेच्या नोकर भरतीला येत होते. याशिवाय पाणी प्रश्न व इतर अनेक कार्य मार्गी लावले. यासाठी उपक्रम राबवित त्या कार्याला दिशा दिले. दरम्यान त्यांच्या बदलीचा राजकीय डावही रचला गेला. मात्र यवतमाळकरांनी आंदोलन करून तो हाणून पाडला होता. त्यांच्या या कार्याचे कौतुक, अभिनंदन व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा संबंधी मी त्यांना पत्र लिहिले. तर तेवढ्याच तत्परतेने ते आपल्या पदाचा अहंकार न बाळगता मला आभार पत्र पाठविले.
नांदेडमध्ये काम करत असताना त्यांच्या लक्षात आले की अनेक संस्थाचालक विद्यार्थी खोटे प्रवेश दाखवून सरकारी अनुदानावर हात मारतात. या संस्थाचालकांना वठणीवर आनण्याकरीता त्यांनी पटपडताळणी मोहीम सुरू केली. एकाच दिवशी जिल्ह्यातील संपूर्ण शाळेची तपासणी विद्यार्थ्याच्या बोटावर शाई लावून विद्यार्थी गणना करण्यात आली. याकरीता संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लावण्यात आली आणि त्यातून एक भयावह सत्य प्रकाशात आले. पुढे ही योजना राज्यभर राबवण्यात आली आणि शिक्षण संस्थाचालकांचे धाबेच दणाणले. हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले आणि संस्थांच्या अनुदानात प्रचंड कपात झाली. हजारो अतिरिक्त शिक्षकांसह शेकडो बोगस शाळांची प्रकरणे त्यांनी पुढे आणली होती. परदेशी सरांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे राज्य सरकार 2011 पासून शिक्षकांचे समायोजन करीत आहे. नांदेड येथील निरोप समारंभात दिवसभर पुष्पगुच्छांचा वर्षाव झाला. विद्यार्थ्यांपासून तर वयोवृध्द व्यक्ती सर्वांचे डोळे पाणावलेले होते व साहेब स्वत: प्रत्येकाच्या शुभेच्छा घेत होते.
आदर्श अधिकारी कसा असावा याचा प्रत्यय पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत आयुक्त असताना प्रत्येकाला आला. पिंपरी महापालिकेत आयुक्त म्हणून कर्मचा-यांचा फौजफाटा, वाहन सुविधा यांसारख्या अनेक सुखसोई उपलब्ध असूनही वैयक्तिक कामासाठी त्याचा त्याग केला होता. खासगी आयुष्य साधेपणाने जगणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. परदेशी सर अनेकांसाठी ‘आयकॉन’ ठरले होते. सरकारी नियमाप्रमाणे पिंपरीमध्ये आयुक्त म्हणून 18 महिने काम केलेल्या श्रीकर परदेसी सर यांना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने 90 हजार रुपयांचा बोनस चेकद्वारे पाठवला… पण त्यांनी तो नम्रपणे नाकारला. केंद्रीय प्रशासकीय सेवेत असल्याचा संकेत पाळत त्यांनी हा बोनस नाकारला. त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नावलौकिक तर झाला. त्याचबरोबर प्रशासकीय कारभाराला शिस्त पण लागली होती.
राजकीय हस्तक्षेपाला भीक न घालता आपले कर्तव्य बजावण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच महापालिकेच्या आयुक्तपदावरून त्यांची बदली करण्यात आली होती. मात्र, त्या काळातही परदेशी सरांनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ‘सारथी’ नावाची अतिशय उत्तम योजना चालू केली होती. तक्रारी दाखल करताना नागरिकांचे नाव गोपनीय ठेवण्याची सोय त्यात होती. लोकाभिमुख सेवा देणारे हे अधिकारी आहे. स्वयंशिस्त व नागरिकांना पालिकेतील कामांची माहिती मिळावी यासाठी सारथी ही संगणकप्रणाली विकसित केली. यामुळे अनेक भ्रष्ट बाबूंना निलंबित केले तर चुकीचे काम करणा-या ठेकेदारांना दंड ठोठावला. डॉ. श्रीकर परदेशी सर यांची पिंपरी पालिकेचे आयुक्तपदावरून बदली प्रकरणी अण्णा हजारे यांनीही लक्ष घातले होते.
श्रीकर परदेशी सर यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेतून बदली केली नसती तर माझे सरकार कोसळले असते असे एका तत्कालीन मुख्यमंत्री यांनी म्हटले होते..! श्रीकर परदेशी सरांची बदली झाली की त्या त्या भागातील, शहरातील लोक बदली रद्द करण्यासाठी आंदोलन करायचे. श्रीकर परदेशी सरांचा मुलगा कणाद हा त्यांच्याप्रमाणेच हुशार आहे. तो शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पहिला आला होता. जेथे जेथे परदेशी सरांनी काम केले तेथील युवक त्यांच्या कार्याला सलाम करतात. पिंपरी-चिंचवड महापालिकेत आयुक्त म्हणून काम करताना शहरात कायदेशीर बांधकामांपेक्षा बेकायदा बांधकामांचीच संख्या जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर आयुक्त असलेल्या परदेशी सरांनी कायद्याच्या चौकटीत राहून त्यावर बुलडोझर फिरवायला सुरुवात केली. त्यामुळे त्या वेळचे तत्कालीन उपमुख्यमंत्री यांचा तिळपापड झाला..! अवैध बांधकामे पाडल्यामुळे श्रीकर परदेशी सर यांना बुलडोजर व डिमॉलीश मॅन’ ही उपाधी दिली गेली.
नगरसेवकांच्या बेकायदा कृत्यांना पाठीशी न घालणा-या परदेशी सर यांची मुद्रांक शुल्क विभागात बदली केल्याने झालेला गदारोळ राष्ट्रवादी काँग्रेसलाही महागात पडला. तरीही परदेशी सरांनी शांतपणे त्या विभागातही आपले काम सुरू ठेवले. नवे घर घेणा-यांना येणा-या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी अनेक नव्या योजना सुरू केल्या आणि खात्यातील पारदर्शकता जनतेसमोर आणली. याच काळात त्यांच्याकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक व्यवस्थेचाही कारभार सोपविण्यात आला. सत्ताधा-यांपुढे न वाकता कायद्याच्या चौकटीत राहून समाजोपयोगी कामे करता येतात, हे डॉ.परदेशी सर यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्यासारख्या अनेक अधिका-यांना सत्ताधा-यांकडून बदल्यांची शिक्षा भोगावी लागते. परंतु त्यांना त्याबद्दल कधी खंत वाटत नाही.
पिंपरी-चिंचवडचे आयुक्त म्हणून त्यांनी केलेले काम कोण विसरेल? त्या-त्या शहर वा जिल्ह्याची गरज ओळखून, तेथील नागरिकांचे प्रश्न जाणून प्रामाणिक प्रयत्न करत राहणे, ही त्यांची कार्यशैली. कसलाही राजकीय दबाव न घेता काम पुढे नेणे हाही त्यांच्या शैलीचा एक भाग आहे. म्हणूनच पिंपरी-चिंचवडमध्ये ते बेकायदा बांधकामांच्या विरोधात ठाम उभे राहिले. त्यामुळे लोक त्यांच्यामागे उभे राहिले. पुण्यात मोडकळीस आलेल्या पीएमपी या बससेवेत, अतिशय अल्प काळात, जादा कार्यभार असूनही त्यांनी प्राण फुंकले. पीएमपीमध्ये सुधारणांचे नवे पर्व त्यांनी निर्माण केले. या सुधारणा पुढे नेण्याचे आव्हान आता नव्या अधिका-यांपुढे असेल.
पिंपरी-चिंचवडमधील त्यांनी राबविलेली ‘नागरिकांची सनद’ योजना असो, की नोंदणी-मुद्रांक विभागातील ‘सारथी’ योजना. त्यांची देशभर चर्चा झाली आणि अनेक राज्यातील सरकारांनी हे उपक्रम राबविण्याची तयारी सुरू केली. भारतासारख्या बहुविविधता असलेल्या देशातील प्रश्न सोडवायचे, तर फक्त बुद्धी पुरेशी नाही. तर संवेदनशील मन आणि जनतेचे प्रश्न ओळखून ते सोडविण्याची ऊर्मी लागते. ही ऊर्मी डॉ. परदेशी सर यांच्याकडे असल्यानेच त्यांची नवी नियुक्ती झाली आहे. ही मराठीजनांसाठी अभिमानाची बाब आहे; पण या आनंदाला त्यांच्यासारखे ‘अॅसेट’ येथून जाण्याच्या दुःखाची किनारही आहे.
डॉ. श्रीकर परदेशी सर यांची पंतप्रधानांच्या कार्यलयात उपसचिव म्हणून झालेली बदली ही त्यांची कार्यक्षमता, निर्णयक्षमता, पारदर्शकता आणि सचोटी यांना मिळालेली दाद आहे. म्हणूनच त्यांना निरोप देताना महाराष्ट्राचे अंतःकरण जड झाले आहे. तडफदार अधिकारी म्हणून डॉ.परदेशी सर यांनी केलेल्या कामाचे हे संचित आहे. ते मुळात प्रज्ञावंत. वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर सार्वजनिक कार्यासाठी त्यांनी प्रशासकीय सेवेचा मार्ग निवडला. 2001 मध्ये आयएएस स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात पहिले, तर देशात दहावे आले. पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती झाल्यामुळे डॉ.परदेशी सरांच्या मार्गावरून जात असलेल्या अनेक अधिका-यांना आशेचा किरण दिसू लागला आहे. नेहमीच्या धडाडीने डॉ. परदेशी सर दिल्लीतही काम पाहतील यात काही शंकाच नाही. त्यांच्या या अविरत कार्यप्रणालीला नमन व भावी वाटचालीकरीता हार्दिक शुभेच्छा..!
- – सुनील शिरपुरे
- कमळवेल्ली, यवतमाळ
- भ्रमणध्वनी-7057185479