*अहंम, स्वार्थ,भस्टाचार व महागाई*
*ह्या सर्वांना घालून पेटवूया होळी*
*देशात सुख समाधान येऊ द्या बाई.*
वर्षामागून वर्षे सरली तरी बालपणच्या होळीची आठवण प्रत्येक वर्षाच्या होळीच्या वेळी हमखास होतेच. त्यावेळी मला वाटतं मी जवळपास सात आठ वर्षांची असेन. आमच्या गावी वाडे असत. आमचा ‘मानस वाडा’ होता. म्हणजे गोव्याला आमचं भलं मोठं घर व आजूबाजूला फडते, झलमी, गावडे इत्यादी लोकाची वस्ती असे. एका वाडीत चार पाच मोठी ब्राम्हणांची घरे व इतर लोकांची वस्ती. त्यामुळे मित्र मैत्रिणी सुध्दा ह्या लोकांतलीच होती. आम्ही मुल मुली एकत्रच खेळ खेळत होतो. आमच्यात थोडी मोठी मुले मुली ही होत्या. ती सांगायची त्या प्रमाणे आम्ही करत असू.
होळी म्हणजे मोठी आग करणे व जोर जोरात ओरडणे एवढेच माहीत होते. गावी प्रत्येक घराच्या मागील बाजूला चूलीकरता लाकडं लागायची ती रचून ठेवत (तेव्हा गॅस नव्हता)
माझ्या घराच्या मागील दारी लाकडांची मोठी रास रचून ठेवली होती. त्याचीच चोरी करायचे मुलांनी ठरवले व त्याप्रमाणे मला व माझ्या मैत्रिणीला मागील दारी थांबायला सांगितले व घरातुन कोणी आलं तर “पळ पळ ” म्हणून ओरडायला सांगितले. त्याप्रमाणे आम्ही दोघी मागील दारी खेळू लागलो. आता लाकडे घेऊन हे पळणार कसे बघूया म्हणून आम्ही दोघी “पळ पळ” ओरडलो. त्या बरोबर ती मुले पळाली. पळताना एखाद दुसरा धडपडला व त्याला खरचटले सुध्दा. आम्ही जोरजोरात हसायला लागलो. तेवढ्यात खरचटलेल्या पोराने दोन धम्मक् लाडू आमच्या पाठीत घातले व आम्हाला तंबी दिली “खरच कोणी आलं, तरच ओरडायचं”. एक दोन वेळा आजी, आई ओंजरत्या दिसल्या पण आम्ही खेळतो म्हणून मागील दारी त्या आल्या नाहीत. इकडे मोठ्या पोरांनी भरपूर लाकडे लंपास केली. दुसऱ्या दिवशी आजीला ही गोष्ट कळली. मी मुग गिळुन बसले होते पण दुसऱ्या दिवशी होळी पेटवण्यासाठी बहुतेक लाकडं आमच्याच घरची होती हे बाबांनी-काकांनी जाणले. होळी पेटवून बोंबाबोब, आरडा ओरड करून घरी आल्यावर माझी सगळ्यांनी चांगली तासमपट्टी केली ती मी जन्मात विसरणे शक्य नाही. ते काम माझ्या संमतीने केलयं हे घरच्यांना कळले होते. त्या मुलांनी पण अर्धी गाडी लाकडे पळवली होती हे मला कुठे माहीत होते! तेव्हा पासून माझी त्या मुलाबरोबरची दोस्ती संपुष्टात आली. नंतर सगळ्या गावची होळी देवीच्या देवळा समोरील जागेत होऊ लागली व तेथे फक्त पुरुषांनीच जायचे, बायका व मुलींना जाणे वर्ज झाले. घरात जेवढे पुरूष असत तेवढे नारळ त्या होळीत टाकायला प्रत्येक घरातल्या एका तरी पुरुषाने जाणे भागच होते. पुरण पोळ्या वगैरे बनवून घरातल्या देवाला नैवेद्य दाखवून खात असू.
आजीने मला होळी का पेटवायची ते सांगितले.
होळी हा सण संपूर्ण भारतात विषेशतः उत्तर भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा करतात. वसंतऋतु मध्ये, फाल्गुन माघ पौर्णिमेला, हा सण येतो. प्राचीन ग्रंथात या उत्सवाचा उल्लेख आढळतो. विंध्याचल विभागात, रामगढ मध्ये काही शिलालेखावर तीनशे वर्षांपूर्वीचा संदर्भ आढळतो. तसेच मुस्लिम समाजातील काही लोक हा उत्सव साजरा करतात. मुस्लिम पर्यटक “अलबरूनी” यांनी तसा उल्लेख आपल्या “यात्रा स्मरण” मध्ये केला आहे.
मुगलकाळातही अकबर, जोधाबाई, जहांगीर, नूरजहाँ हे होळी उत्सव खेळत होते ह्याची माहिती इतिहासात आहे. त्याच प्रमाणे सोळाव्या शताब्दी मध्ये, महाराणा प्रतापांनी, मेवाड कलाकृतीतून उत्सव चित्रित केलेला आढळतो.
विद्वानांच्या मते होळी हा सण भारतीय अग्नीपुजन परंपरेचा अविष्कार आहे. त्याच्या अनेक दंतकथा आहेत. त्यामध्ये भक्त प्रल्हाद व हिरण्यकश्यपु यांची दंत कथा पौराणिक साहित्यात प्रचलित आहे.
पूर्वी राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा (नारायणाचा) परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. हिरण्यकश्यपुला हे अजिबात मान्य नव्हते. त्याने प्रल्हादला रोखण्याचा खूप प्रयत्न केला, शिक्षा केली. तो ऐकेचना, तेव्हा त्याला ठार मारायचे ठरवले. त्याची बहीण होलिका, तिला अग्नीपासून अभय होते. ती दुष्ट प्रवृत्तीची होती.
लाकडाची चिता रचली व प्रल्हादला मांडीवर घेऊन तिला बसायला सांगितले व चितेला आग लावली. पण झाले उलटेच. प्रल्हादची भक्ती व लोकांच्या प्रेमामुळे होलिका जळून राख झाली व प्रल्हाद सुखरूप राहिला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला.
होळी सणाशी माझा सबंध जास्त नव्हता, पण उच्च शिक्षणासाठी मी मुंबईत आल्यावर इथली होळी खूपच उत्साही व मजेशीर वाटली. होळीच्या दिवशी संध्याकाळी खड्डा खणून पाला पाचोळा, माडाच्या झावळ्या, गोवऱ्या, सुकलेली लाकडे रचून त्याचा डोंंगर करत, सभोवताली रांगोळी काढत, वयस्कर किंवा नामवंत माणसाकडून होळी पेटवत, नंतर बायका नटून थटून आरती करत, प्रसाद-नारळ चढवत व प्रदक्षिणा घालून आशीर्वाद घेत. होळी पेटत असताना जिवाच्या आकांताने बोंबलत. दुसऱ्या दिवशी धूळवड साजरी करत. एकमेकांना गुलाल लावत. लहान मोठा भेदभाव नसे. मी माझ्या घरातूनच हे पाहत होते. पण एक मुलींचा घोळका घरात घुसला व मी नको नको म्हणत असताना मला गुलाल-रंग फासला व मला जबरदस्तीने खाली घेऊन गेल्या. मी ही मग रंगात व त्यांच्यात मिसळले. दूधवाल्या भैयाने आमच्या घरी भांग आणून दिली होती, त्याची ही चव एकदाच अर्धा ग्लास पिऊन घेतली होती, परत त्या वाटेला गेले नाही. मस्त जाम होळी खेळले. अजूनही त्या आठवणीत मन रमतं.
काळ पुढे सरकू लागला. होळी खेळण्याची पध्द्त बदलली. गुलाल व नैसर्गिक रंगा ऐवजी केमिकल रंग, पाण्याचे फूगे, भांग सोडून दारू प्राशन करू लागले. होळीच्या अगोदरच टवाळखोर मुले धावणाऱ्या बस-रिक्षा-गाड्यांवर फुगे मारू लागले व ह्यामुळे लोकांच्या डोळ्यांना-कानाला अपाय होऊ लागला. मग लोक सणांना नावं ठेऊ लागली. लोकांच्या जिवाशी खेळ करणारी ही कसली रंगपंचमी? मोठ्या शहरात पाण्याचे टँकर मागवून रेन डांस करतात! लोकांना पाणी प्यायला मिळत नाही व ह्या लोकांनी अशी होळी खेळणे म्हणजे अतिशय लाजीरवाणी व शरमेची गोष्ट आहे! कुणी काही बोलले तर त्याचीच नालस्ती करतात. सणांचा उद्धेश, संस्कृती सोडून वेगळीच तर्हा हल्ली दिसायला लागलीय.
होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून, म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे अग्नीत जाळून राख करावी हाच होळी साजरा करण्यामागील खरा उद्देश आहे.
त्याच बरोबर प्रर्यावरणाची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे, हे ही लहान थोरांनी विसरू नये.
ह्या सणाच्या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करूया आणि आपले जीवन आनंदी बनवूया.
– शोभा वागळे.
मुंबई
8850466717