मला आठवते आजपासून बरोबर वीस वर्षांपूर्वी म्हणजेच वर्ष 2002 साली मी ‘परिवर्तनाचा साथी’ हे त्रैमासिक चालवीत असताना पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दिवशी ‘जगद्गुरू तुकोबाराय विशेषांक’ प्रकाशित केला होता. या अंकासाठी अतिथी संपादक म्हणून पंढरपूरचे अमरजित पाटील होते. अमरजीत हे पंढरपुरचे माजी आमदार दिवंगत औदुंबर पाटील यांचे नातू. मासाहेब जिजाऊंची बदनामी करणाऱ्या भांडारकर संस्थेवर सौम्य कारवाई करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या ७२ छाव्यांमध्ये ते होते.
अमरजीत म्हणजे फर्डा वक्ता. डेडिकेटेड कार्यकर्ता. ‘परिवर्तनाचा साथी’ साठी पंढरपूर तालुक्यातील ‘असे झाले गादेगाव भटमुक्त’ अशी स्टोरी त्यांनी आणि मी प्रत्यक्ष गादेगावला भेट देऊन तयार केली होती. ती खूप गाजली होती. त्यामूळेच त्यांची आणि माझी जवळीक होती. अमरजीत यांनीच माझी ह. भ. प. रामदास महाराज कैकाडी यांच्याशी भेट घडवून आणली होती. एकदा तर मी आणि जैमिनी कडूसर कैकाडी महाराजांच्या घरी त्यांच्यासोबत जेवलो होतो. उन्हाळ्यात मठाच्या मोकळ्या जागेत खाटा टाकून रात्री मुक्कामी राहिलो होतो.
अमरजीत आणि मी काढलेल्या या जगद्गुरू तुकोबाराय विशेषांकात रामदास महाराज कैकाडी यांची मुलाखत छापली होती. याशिवाय अंकामध्ये माझा त्यांच्यावर एक लेखही होता. या विशेषांकात मान्यवरांचे परिवर्तनवादी आशयाचे लेखन होते. याशिवाय ‘मूकनायक’ च्या मुखपृष्ठावर डॉ. बाबासाहेब आंबेकरांनी छापलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या त्याच ओळी मी या अंकावर छापल्या होत्या.
आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी औरंगाबादहून छापील अंकाचे गट्ठे घेऊन मी पंढरपूरला पोहोचलो. दुसऱ्या दिवशी मी लवकरच उठून अवघे पंढरपुर फिरलो. आषाढी एकादशीमुळे पंढरपूर माणसांनी फुलून गेले होते. एवढी माणसे नि एवढ्या बसेस मी कधीच पाहिल्या नव्हत्या. लोक भक्तीभावाने तद्वतच प्रचंड उत्साहाने विट्ठल मंदिरात दर्शनासाठी रांगा लावून होते. कैकाडी महाराजांचा मठातही देखील दर्शनासाठी तशाच रांगा लागलेल्या होत्या. मला महाराजांनी मठातच या अंकाच्या विक्रीचा स्टॉल लावायला परवानगी दिली होती. रात्री ह-भ-प कैकाडी महाराज यांचे मठात कीर्तन झाले.
किर्तन संपताना त्यांनी आमच्या विशेषांकाचा उल्लेख केला आणि लोकांना अंक खरेदी करण्याची सूचनाही केली… आणि बघतो ते काय… किर्तन संपण्याच्या आतच लोकांनी माझ्याभोवती अंकासाठी प्रचंड गर्दी केली. मला एकट्याला अंक देणे आणि पैसे घेणे मुश्कील झाले. अमरजित पाटील यांनी माझी तारांबळ पाहून माझ्या मदतीसाठी काही स्वयंसेवक दिले. प्रचंड गर्दीत अक्षरशः काही मिनिटात एक हजार प्रति संपल्या. लोक अंक घेऊन त्यावरील जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या फोटोचे दर्शन घेत. दुसऱ्या दिवशी पंढरपुरात लोकांना दाखवण्यासाठी देखील माझ्याकडे अंक शिल्लक राहिला नाही. ‘परिवर्तनाचा साथी’ च्या या विशेषांकाला मिळालेला हा उदंड प्रतिसाद थक्क करणारा होता.आषाढी एकादशीचा पंढरपुरातील हा अनुभव आणि कोरोना काळात निसर्गाने हिरावून नेलेले परिवर्तनवादी संत रामदास महाराज कैकाडी यांना मी कधीच विसरू शकत नाही…
- – रवींद्र साळवे,
- बुलडाणा
- 9822262003