अस्वस्थतेचा धगधगता आलेख: अस्वस्थ तांडा

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

    प्रा. डॉ.विजय जाधव लिखित ‘अस्वस्थ तांडा’ या कथासंग्रहाचे साहित्य जगताने जंगी स्वागत केले. हाच कथासंग्रह माझ्याही हातात पडला जसे इतरांच्या हातात. ज्यांच्या ज्यांच्या हातात हे पुस्तक पडले त्यांनी त्यांनी त्यावर भरभरून लिहिले, भरभरून स्तुती सुमने उधळली लिहिले;पण मला लिहावयाला बराच उशीर झाला हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो आहे;तरी परंतु उशिराने का होईना भरगच्च पुरस्कारांनी साहित्य जगताने सन्मानित झाल्यानंतर रहावले नाही म्हणून हा प्रपंच…

    असो स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षानंतरही तांड्या तांड्यात,वाड्या वस्तीत पूर्वी ज्या समस्या होत्या त्या आजही कायम आहेत. दुःख, व्यथा, वेदना, प्रश्न, अडीअडचणी, समस्या थोड्याफार फरकाने जशापूर्वी होत्या तशाच आजही आहेत. अनेक लेखकांनी इतर समाजातील समस्या वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तांडे, वाड्या, वस्तीतील समस्येकडे डॉ. विजय जाधव यांनी जसे लक्ष वेधून घेतले तसे इतर कोणत्याही लेखकांनी दुःख, व्यथा, वेदना, प्रश्न, अडीअडचणी आणि समस्यांचा शब्द सरांनी अचूक वेध घेण्याचा आजवर प्रयत्न केला असेल हे माझ्या ऐकिवात नाही.

    तांड्यात लहानाचा मोठा होणारा लेखकच तांड्याचे बोलके दुःख व्यक्त करू शकतो हे डॉ. विजय जाधव सरांनी सिद्ध करून दाखवले आहे. कारण तांड्यातील दुःख त्यांनी अगदी जवळून पाहिलेच नाही तर सोसलं सुद्धा आहे. त्यांना जे दिसलं ते लिहिलं, जे अनुभवलं त्याचे कोरीव लेणे तयार केले. तांड्या तांड्यांनी जे सोसलं ते शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला डॉ. विजय जाधव यांनी या कथासंग्रहाच्या माध्यमातून इतर साहित्यिकांना हे दाखवून दिलं की, आपण सोयिस्करपणे तांड्याकडे, वाड्यावस्तीकडे साफ दुर्लक्ष केलं आहे. अनेक कथाकारांनी कथेच्या माध्यमातून रंजन मनोरंजन करण्याचे अमाप पीक घेतले; परंतु तांडे ,वाड्या वस्तीतील दुःख त्यांना दिसले नाही. तांडे ,वाड्या वस्तीतील समस्ये कडे त्यांचे लक्ष कधीच गेले नाही.

    तांडे, वाड्या वस्तीत माणसं राहतात जनावर नाही हे त्यांनी कधी अनुभवले नाही की, शब्दातून चितारण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही.मग प्रश्न हा पडतो. साहित्य जगताच लक्ष तांडे, वाड्या वस्तीकडे का गेले नाही? तांडे, वाड्या वस्त्यांना कुंपणं घातली होती का? की मोठमोठ्या गगनचुंबी भिंती उभारल्या होत्या सूचीभृत साहित्य जगताच लक्ष जाण्यासारखं असं काहीच नसेल तर मग काय होतं?तर काच खळग्याचे रस्ते होते, पडीक नापिक जमीन होती, गावाच्या बाहेर वस्ती होती, डोंगर दर्यात उभारलेल्या पाल आणि झोपड्या होत्या, गाई गुरांच्या शेणांचा कुजकट वास होता, उघड्यावरचे जीवन होते, सरपटणाऱ्या आणि हिंस्र प्राण्यांच्या शेजारी वस्ती होती,राहायला पक्के घर नव्हते,आया बहिणींना दार लावून आंघोळ करण्यासाठी न्हाणी नव्हती अशा अवस्थेत जीवन जगणाऱ्या तांडे, वाड्या वस्तीकडे मखमली गाद्या गिरद्या अंथरलेल्या आणि छताला लटकवलेल्या झुंबरा खाली बसून थंडगार हवा खात खात आरामदायी खुर्चीवर बसून चिरेबंदी बंगल्यात राहून लिखाण करणाऱ्या साहित्य जगताला हे गाव कुसाबाहेरचे अभावग्रस्तांचे जग कधीच दिसलं नाही की, यांनी पाहिलं नाही. नजरेआड केलं की कानाडोळा केला. दुर्लक्षित केलं की तांडे ,वाड्या वस्तीला जगासमोर आणण्याची इच्छा नव्हती असे एक नाही अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत.

    अपवाद वगळता ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांच्या *हिंदू : एक जगण्याची समृद्ध अडगळ* या कादंबरीतील बंजारा आया बहिणींचे इब्रातीचे दिंडवडे काढण्याचे वर्णन वगळता तांडे,वाड्या वस्तीतील दुःख जे जगले नाही त्यांनी ते अधोरेखितही केले नाही. परंतु प्रा.डॉ.विजय जाधव हे दुःख स्वतः जगले तेव्हा त्यांना जगासमोर मांडल्याशिवाय राहवले नाही प्रा. डॉ. विजय जाधव मुळात संवेदनशील मनाचा लेखक. जे दिसलं ते पाहून लगेच भावविवश होणारा, अश्रू ढालणारा. तोंडात आलेला आवंढा अनेक लोक गिळताना पहायला मिळतात; पण प्रा. डॉ. विजय जाधव यांनी तो गिळला नाही तर अनेक वर्षे चघळत राहिले आणि एक दिवस चघळण्याचा त्यांच्या काळजावर मारा झाला ,काळजाला जखम झाली हृदय हेलावून टाकणाऱ्या घटना, प्रसंग जेव्हा पाहिले तेव्हा ते अस्वस्थ झाले आणि त्यातून शब्दबद्ध झाला अस्वस्थ तांडा. जो तांडे,वाड्या वस्तीचा धगधगता आलेख साहित्याच्या दरबारात नव्यानेच अवतरला.

    तसे पाहिले तर या कथासंग्रहात फक्त जेमतेम बारा कथा ;पण एक एक कथा वाचताना ऊर भरून यावा. पहिल्या कथेतील वेदना अंगावर शहारे आणत असतानाच, दुसऱ्या कथेत कोणते भीषण वास्तव असेल याची उत्सुकता मनात निर्माण व्हावी असे करता करता आनंद, जोम ,उत्साह, नवनवीन कपडे घालून मिरवणाऱ्या आणि गोडधोड खाऊन दिवाळीचा सण साजरा करत असताना कडू घास देऊन जाताना आपण इथपर्यंत कसे पोहोचलो हे कळतही नाही.

    या कथासंग्रहातील पहिलीच कथा जे कथासंग्रहाचे शीर्षक आहे. ही कथा वाचत असताना म्हातारपणच येऊ नये किंवा म्हातारपणापर्यंत जिवंत राहण्या अगोदरच आपण आपल्या जीवाचं भलंबुरं करून घ्यावं असं वाटावं. खाटेला पाठ टेकलेल्या ,दृष्टी गेलेल्या म्हाताऱ्या सासर्‍याला त्याच्या सुनेने कुराडीचे घाव घालून संपूर्ण तांडा अस्वस्थ करून टाकावा, लेकीच रूप आपण सुनेत पहावं ;परंतु इथली सून जगावेगळी. ही कथा वाचून आपल्या म्हातारपणाचा वीट यावा इतकी अस्वस्थता ही कथा मनावर पेरून जाते. इथे अनुभवतो आपण जन्म देणाऱ्या मातेच्या स्त्रीत्वाचं एक नवं रूप.

    दुसरी कथा चिरकांडी नावाची. अज्ञानी ,अशिक्षित समाजात पूर्वीप्रमाणेच आजही बहुतांश ठिकाणी उठणाऱ्या चिरकांड्या मनाला भेद्रून टाकताना दिसतात. पैसा म्हणजे आजच्या काळातील देव. पैशाशिवाय जगात काहीच मिळत नाही. भयाण दारिद्र्यात जगून जीवन व्यतीत करणारे केशव व मांगीलाल. गरीबी माणसाला काय करायला लावेल याचा नेम नाही. जीवन जगणं नकोस झालं. वीट आला या दारिद्र्याचा. जीवनाचा उबग यावा अशी शोकांतिका आणि मग निर्माण व्हावी मनात धनाची लालसा.ऐशो आरामात जीवन जगण्यासाठी एका कोवळ्या जीवाला बळी देऊन साऱ्या अंगावर रक्ताची चिरखंडी उडवून मानवतेला रक्तबंबाळ करून जाणारी, सर्वांगावर काटा उभा करणारी म्हणजे चिरकांडी. संत परंपरेला बदनाम करणारा आधुनिक काळातील नागोराव महाराज आणि मातृत्वाचं देणं न लाभलेली लीला ही या कथेतील स्त्रीत्वाचं दुसरं रूप.

    तिसरी कथा आतला दंश. कर्जाच्या ओझ्यात आपादमस्त बुडालेल्या अरुण आणि त्याची सुंदर पत्नी पुष्पा.तांड्यातील घरात अठराविश्वे दारिद्रय तरीही आपल्या पतीवर जीवापाड प्रेम करणारी त्याची पत्नी पुष्पा. अडचणीच्या, गरीबीच्या आणि दारिद्र्याचा फायदा घेणारा बॅंक मॅनेजर. पुष्पासारख्या समाजातील असंख्य आया बहिणींच्या देहावरून वळवळणाऱ्या पुरुषांच्या नजरा. गरजेचा लाभ उचलण्यासाठी पांडे साहेबा सारखे असंख्य मॅनेजर जागोजागी समाजात वावरताना आजही दिसतात. एका तांड्यात घडलेल्या या प्रसंगावरून प्रा. डॉ. विजय जाधव यांनी समाजातील अशा इथे पुष्पा एक सूनही आहे. वार्धक्यात सासऱ्याच्या शरीराची खांडोळी करणारी सून बेबी आणि सासर्‍याला पित्या समान मांनणारी पुष्पा या दोघी सुनाच. पण दोघीतला फरक आपल्याला स्पष्ट जाणवावा.

    चौथ्या कथेतील दणका म्हणजे जीवदान देणाऱ्या वैद्यकीय व्यवसायावरचा. जीवदान देणाऱ्या वैद्याला लोक देव स्वरूप मानतात; परंतु हेच देव जेव्हा गर्भातील कोवळ्या जीवांना पाळीव कुत्र्याला लचके तोडायला देतात तेव्हा मानवता ही एक वेळा लाजून चूर चूर होते.

    मुलगाच हवा या लालसेपोटी गर्भातील कच्च्या कळीचे, गर्भाशयातील कळीला उमलण्या आधीच कुस्करून टाकणारा नवरा आणि सासू .एका आईने दुसऱ्या आईला आणि दुसऱ्या आईने तिसऱ्या आईला गर्भातच करायला लावलेला खून हे अचंबित करणारे समाजातील वास्तव डॉ. विजय जाधव यांनी या कथेत मांडलेलं आहे. गर्भपात तर झाला; परंतु त्यानंतर वाघिणीसारखी चवताळून उठणारी पुष्पा ही या कथेतील आगळीवेगळी आई.

    चुराडा नावाची पाचवी कथा म्हणजे बंजारा समाज तांड्यातील हुंड्याची जीवघेणी पद्धत.या हुंड्याच्या प्रथेपयी अनेक गरिबांच्या मुलींना योग्य वर मिळेनासे झाले असताना येथे चक्क एका तरुणाच्या आयुष्यातील साऱ्या स्वप्नांचा चुराडा झाला. गरिबीच्या परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या तरुणांने शिक्षण तर घेतले; परंतु नोकरी साठी वशिला लावून डोनेशन द्यायला पैसे नाही त्यामुळे डोनेशन भरून नोकरी कशी मिळवायची? या विवंचनेत नोकरी मिळविण्यासाठी बापाने चक्क भांडकुदळ मुलीशी माझे लग्न करून दिला असा आरोप मुलाने बापावरच लावला आहे.

    एकीकडे डोनेशनच्या पद्धतीने देश पोखरला जातोय तर दुसरीकडे बंजारा समाजातील जीव घेण्या हुंड्याच्या पद्धतीमुळे गरीब घरच्या मुली लग्नाचे वय निघून गेल्यानंतरही विना लग्नाच्या राहत आहेत. येथे तांड्यातील दोन्ही समस्या डॉ. विजय जाधव यांनी मोठ्या खुबीने अधोरेखित केल्या आहेत.

    एड्स हा जीवघेणा रोग. अलीकडच्या काळात समाजातील स्थलांतरित मजुराला आपल्या कचाट्यात घेऊ पाहतोय. ट्रक ड्रायव्हर कधी एका ठिकाणावर नसतात. आज इथे तर उद्या तिथे .महिना महिना बाहेर राहावं लागतं .अशावेळी शरीराची भूक भागवण्यासाठी गंमत म्हणून केलेला प्रयोग किती विदारक असू शकतो याचे भेदक वर्णन एड्स नावाच्या या कथेत आले आहे.

    महादेव आणि रीमा हे एक एड्सग्रस्त कुटुंब. या दोघांबद्दल समाजाने दाखवलेली अनुस्तुकता आणि सहानुभूती.एड्स या रोगाबध्दल समाजात असलेले समज आणि गैरसमज. समज कमी गैरसमज जास्त असल्यामुळे एड्सग्रस्तांना वाळीत टाकण्याचे प्रकार नियमितपणे घडताना दिसतात. त्यामुळे या रोगाविषयी समाजात जागृती करणे महत्त्वाचे आहे हे या कथेतून डॉ. विजय जाधव सरांनी दाखवून दिले आहे. हा रोग एकमेकांना हस्तस्पर्श केल्याने होतो,हवेतून, रोग्याच्या जवळ जाण्याने पसरतो इत्यादी गैरसमजरातून समाज बाहेर निघणे आवश्यक आहे. शिवाय हा रोग वेळीच काळजी घेतली तर बराही होऊ शकतो हे पण तेवढेच खरे हे सुद्धा समाजाला सांगण्याची अत्यंत गरज आहे हे डॉ. विजय जाधव या कथेतून आवर्जून सांगतात.

    दप्तर खुंटीला टांगून ऊस तोडणी वर निघालेले मायबाप आणि त्याची इच्छा नसताना सुद्धा दप्तरावरून थोडेही लक्ष विचलित न करता नाईलाजाने दप्तर खुंटीला टांगून निघालेला विजू म्हणजे विस्थापित मजूर कामगारांच्या मुलांचा प्रतिनिधी होय.गरीब,मजूर, कामगार, विस्थापित कामगार, ऊसतोड मजूर यांच्या शिक्षणाची गंभीर समस्या ऐरणीवर घेणारा विजू हा एक कथेतील नायक. बंजारा समाजातील हजारो कुटुंब तांड्यात तांड्यातून दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर ऊस तोडायला निघताना. तेव्हा ट्रकमध्ये बसल्यानंतर जेव्हा एखाद्या तांड्यातून ऊसतोड मजुरांना बाहेर नेण्याचा हा प्रसंग म्हणजे भावविवश करणारा तर आहेच शिवाय तो अंगावर शहारे आणणाराही आहे. कोणाचा मुलगा व सून,कोणाचा जावाई व मुलगी, कोणी स्वतः म्हातारे आई बाप, नातवंडे जेव्हा बाहेरगावी जाण्यासाठी निघतात तेव्हा अख्खा गाव अश्रुंना थोपवून धरू शकत नाही. आया बाया तोंडावर पदर लावून तर वयस्क मंडळी आपला हातरुमालाने डोळे पुसत असतानाच क्षण म्हणजे अतिशय केविलवाणा असतो. हा *याची देही याची डोळा* लेखकांनी बघितल्यामुळेच या प्रसंगाला कारुण्याची छटा आलेली आहे.शिवाय विजू म्हणजे ऊसतोड कामगारांच्या मुला मुलींचे प्रतिनिधित्व करून समाजाचे लक्ष या ठिकाणी वेधून घेतो.

      झोपड्यात, तांडे, वाड्या वस्त्या आदिवासींच्या वसाहतीतील प्रश्न हे नेहमीच कोसो दूर राहिलेले आहेत. त्यांच्या समस्या आणि प्रश्न फारशा साहित्यात कधी डोकावल्याच नाहीत. हा आजवरचा अनुभव राहिलेला आहे. प्रचंड गरिबी, अमाप दारीद्र्य, दोन वेळच्या जेवणाची मारामार अशा अवस्थेत गोधड्या शिवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आईचा सिद्धार्थ नावाचा मुलगा जेव्हा नीट परीक्षेत गुणवत्ता यादीत येतो तेव्हा तो त्याच्या समवयस्कांना हे शिकवून जातो की, प्रयत्न,जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर अशक्य ते शक्य करण्याची धमक असते. त्यामुळे सिद्धार्थचे करावे तेवढे कौतुक कमीच. महाविद्यालयातील त्याच्या मनोगतातून त्याच्यासमोर बसलेल्या विद्यार्थ्यांना, समवयस्क मित्र परिवाराला प्रयत्न राहण्याचा मोलाचा संदेश तो देऊन जातो.

      गर्भपात नावाच्या कथेत रमेश आणि श्रद्धा यांच्या भूमिकेतून समाजातील अनेक प्रश्न एकाच वेळी समाज पटलावर आणून डॉ. विजय जाधव यांनी क्षुल्लक वाटणाऱ्या परंतु गंभीर समस्येकडे वाचकाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

      एसटी महामंडळात नोकरी करणाऱ्या महिलांना कोणकोणत्या अडीअडचणी असतात. याचा लेखाजोखा लेखकांनी मांडला आहे. प्रवास करताना महिला वाहक असेल तर पुरुषांच्या वखवखलेल्या नजरा त्यांच्या सर्वांगावरुन फिरतात, नको तेथे स्पर्श करून महिलांना त्रास देणारी पुरुष मंडळी सुद्धा असतेच. समाजातील, विशेषता तांड्यातील हुंड्याची कीड या समस्या तर येथे अधोरेखित होतात परंतु त्याच वेळी बस ड्रायव्हरने अचानक ब्रेक दाबला. ब्रेक दाबल्यावर कोसळलेली श्रद्धा. झालेला रक्तपात. श्रद्धाचे बेशुद्ध होणे. श्रद्धाला रक्ताची गरज भासणे.रक्त देऊन जीवदान देणारी त्यांच्याच व्यवसायातील वाहक मंडळी आणि सर्वात दुःखद आणि गंभीर म्हणजे श्रद्धाच्या पोटातील बाळाचा अवेळी आणि अकाली झालेला करून अंत होय. हे लेखकांनी अत्यंत खुबीने हा प्रसंग कारुण्य पूर्ण पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.

      कस्तुरी खरोखरच कस्तुरीच होती. आजही अनेक कुटुंबात मुलगी जन्माला आली की, तोंड मुरडणारी अनेक कुटुंब प्रमुख आहेत. मुलगी जन्माला येणे म्हणजे शाप समजणारी मंडळी सुद्धा आहे. रामलाल व सुनिता यांना मात्र कस्तुरी जन्माला येण्याचा आनंद होतो. कस्तुरी म्हणजे शोधूनही न गवसणार्‍या कस्तुरी सारखाच. परंतु शेतात दोघे काम करत असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नदीला आलेला पूर .रामलाल नदीच्या या काठावर कोसळतो, सुनीता त्या काठावर कोसळते तर कस्तुरीला मात्र कोणताच किनारा उरला नाही. पुराच्या पाण्यातून वाट काढत काढत दगडावरुन पाय घसरतो. कस्तुरीचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात ती हातातून पाऱ्याप्रमाणे निसटल्यानंतर रामलाल ओक्साबोक्शी रडायला लागतो.पुन्हा त्याला सशाच्या पिल्लाचा जसा करूण अंत झाला तो प्रसंग आठवतो. अक्षरशा तशीच कस्तुरी सुद्धा त्यांच्या आयुष्यातून निमुटपणे निघून गेली आणि रामलाल व सुनिता यांना मोठ्या मतप्रयासाने गवसलेली कस्तुरी चा आनंद फारसा टिकलाच नाही हा प्रसंग वाचकाचे मन हेलावून टाकणारा असा लेखकांनी रंगवला आहे.

      शोभा आणि रमेश ची सोयरीक झाली लग्नाची तारीख ठरली परंतु लग्नाच्या दिवशी नवरदेव आलाच नाही. दुसरीच एक मुलगी घेऊन तो घरून निघून गेला. असे प्रकार आज बऱ्याच अंशी समाजात घडताना दिसतात. हे ऐकून समाजाची अधोगती होते की,प्रगती हा न समजण्यासारखा प्रश्न. एखादा तरुण किंवा एखादी तरुणी यांचा प्रेम विवाह करत असतील तर ठीक आहे. परंतु सोयरीक झाल्यानंतर दुसऱ्याच्या लेकीला फसवू नये या समस्येवर विचार करायला लावणारी कथा म्हणजे हळद.

      शिवाय पूर्वीच्या काळातील जरठ कुमारी विवाहाची आठवण करून देणारी घटना म्हणजे शेषराव व शोभा चा विवाह होय. हा गंभीर प्रश्न लेखकांनी समाजासमोर या कथेतून मांडला आहे. त्याचप्रमाणे या कथेत लेखकांनी बंजारा समाजात लग्नाचा हळदीच्या कार्यक्रमापासून तर लग्न समारंभ संपेपर्यंत जी बंजारा भाषेतील गाण्यांचा उल्लेख केला आहे त्यामुळे ही कथा अधिकच परिणामकारक झाली आहे. ती गीते सुद्धा वाचकांचे मन आकर्षून घेतात.

    या कथासंग्रहातील शेवटची कथा म्हणजे दिवाळी. या कथेत मुलीच्या लग्नासाठी ठरलेला हुंडा कसा द्यायचा आणि मुलीचं लग्न कसं करायचं या विवंचनेत तांड्यातील एक गोरमाटी शेतकरी आत्महत्या काय करतो. यशोदा आपला सायबाला आठवण करुन धाय मोकलून काय रडते .नोकरीवर असलेल्या दिराच्या घरी यशोदा काय जाते. तेथे तिचा अपमान कसा होतो आणि बंजारा समाजातील एक पद्धत म्हणजे मृत व्यक्तीच्या घरी दिवाळीच्या आधी आदल्या दिवशी जाऊन दिवा लावून दिवाळी साजरी करण्याची पद्धत हा संपूर्ण कारुण्यपूर्ण प्रसंग अगदी जिवंत करण्यात लेखक यशस्वी झालेले आहेत.

    डॉ. विजय जाधव हे ध्येयवादी लेखक आहे. “अस्वस्थ तांडा” या कथासंग्रहातील सर्वच कथा लेखकाच्या जीवनानुभवाच्या वाटतात. जिवंत प्रसंग रेखाटण्यात लेखकाचा हातखंडा आहे .लेखकाची भाषा साधी, सोपी, ओघवती आणि मनोवेधक आहे. तांड्या तांड्यातील समस्या या लेखकाने अधोरेखित केल्या आहेत. ‘एकीकडे जीवनाचा जुगार तर दुसरीकडे पत्त्याचा जुगार’ हे लेखकांनी अतिशय मार्मिकपणे रेखाटला आहे. तांड्यातील व्यसनाधीनता, प्रचंड प्रमाणातील गरिबी आणि दारिद्र्य त्याचप्रमाणे समस्यांचे मनोरे लेखकांनी पानोपानी उभे केले आहेत. पुसद आणि पुसदच्या परिसरातील निसर्गरम्य डोंगरदर्‍याचे वर्णन, नद्या नाले, पावसाचे दिवस, कडक उन्हाळ्याचे वर्णन,कोरडवाहू शेती कसणारे शेतकरी,कष्टकरी त्यातून येणारी नापिकी आणि उद्भवणाऱ्या समस्या आणि औदासिन्य याचा चल चित्रपटच लेखकांनी वाचकांच्या समोर उभा केला आहे.

    या कथासंग्रहाला साजेसे मुखपृष्ठ आहे.मुखपृष्ठावर बंजारा भगिनींचे चित्र, मागे गवताचे छप्पर असलेली झोपडी यावरून तांड्या तांड्यातील दारिद्र्य आपोआपच वाचकांच्या समोर येण्यास मदत होते. तांड्या तांड्यात प्रचंड प्रमाणात गरीबी आहे हे वाचकांना वेगळे सांगण्याची गरज उरत नाही. हे लेखकाचे आणि मुखपृष्ठकाराचे कौशल्य आहे. पुस्तकाच्या मागच्या पानावर प्रसिद्ध विचारवंत व साहित्यिक प्राचार्य डॉक्टर प्रकाश राठोड सरांचा संदेश यामुळे या कथासंग्रहाची श्रीमंती वाढायला मदतच झाली आहे. म्हणूनच साहित्य जगताला या कथासंग्रहाची दखल घेणे क्रमप्राप्त झाले आहे.

    शेवटी सन्मित्र डॉ.विजय जाधव यांना भविष्यातील दर्जेदार, जीवनाभिमुख,आणि आशयगर्भ लेखनासाठी मनापासून भरभरून हार्दिक सदिच्छा..!

    *अस्वस्थतेचा धगधगता आलेख: अस्वस्थ तांडा* – प्रा. डॉ. विजय जाधव

● हे वाचा – आयुष्याच्या वाटेवर,अनुभव संपन्न कविता संग्रह

    पी के पवार
    सोनाळा बुलढाणा
    ९४२१४९०७३१
    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

Leave a comment