अतिसार व्यवस्थापन आणि उपचार

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

    उन्हाळ्याच्या असह्य काहिलीनंतर पावसाचा गारवा आणि ताजी हवा उत्साही वातावरण निर्माण करते. परंतु पावसाळ्याच्या दिवसात बरेचदा सूर्याचे दर्शन होत नाही. आणि सततच्या ढगाळी वातावरणामुळे बुरशीजन्य तसेच संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होते. पावसाळ्यातील आर्द्रतेमध्ये विविध प्रकारचे विषाणू वाढीस लागतात. या काळात रोगप्रतिकारक शक्तीही मंदावते. यामुळे अशा वातावरणात आरोग्यविषयक दक्षता पाळणे आवश्यक आहे.

    पावसाळ्यात नदीला ओढे, नाल्यांमार्फत नवीन पाणी येते. हे पाणी पठारावरुन तसेच विविध भागातून वाहून आल्यामुळे त्यात विविध प्रकारचा कचरा, घाण यांचा समावेश असतो. असे दुषित पाणी पिण्यात आल्यास अतिसाराची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. अतिसारात जुलाब होऊन पोटात तीव्र वेदना होतात. अस्वस्थता वाढते. तसेच पावसाळ्यात पाणी कमी प्रमाणात पिण्यात येते. यामुळे डी-हायड्रेशन होऊन शरीरात निस्तेजता येऊन प्रतिकार शक्तीही कमी होते. याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी शासनस्तरावर 1 ते 15 जुलै 2022 या कालावधीत अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात आला आहे. या दरम्यान जिल्ह्यात घरोघरी ओआरएस व झिंक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

    अतिसारावरील उपचार

    अतिसारामध्ये ओआरएस व झिंक हे दोन्ही देणे आवश्यक आहे. अतिसार झाल्याबरोबर लगेच ओआरएसचे द्रावण आणि इतर द्रव्य पदार्थ अतिसार थांबेपर्यंत देत राहावे. झिंक हे अतिसाराच्या उपचारासाठी पूरक आहे. तर ओआरएस हे अतिसारामुळे झालेल्या जलशुष्कतेची तीव्रता कमी करते. अतिसार बंद झाल्यावरही झिंकच्या गोळ्या देणे आवश्यक आहे. झिंक हे फक्त अतिसारास बरे करण्यास मदत करीत नाही तर पोटातील आतड्यांना बरे होण्यासाठी व प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीही मदत करते. अतिसारामध्ये ओआरएस व झिंक देणे ही योग्य उपचारपध्दती असून अतिसार लवकर बरा होण्यासाठी फायदेशीर आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद निरवणे यांनी दिली आहे.

    डि-हायड्रेशन होऊ नये, म्हणून वरचेवर पातळ पदार्थ, उकळून गार केलेले पाणी, शहाळ्याचे पाणी, ओआरएस पावडरचे मिश्रण पित राहावे. (ओआरएस पावडर नसल्यास साखर, मीठ व स्वच्छ पाण्यापासून घरीच जलसंजीवनीचे मिश्रण करुन रुग्णास द्यावे.) पावसाळ्यात वैयक्तिक स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. या दिवसात जंतूसंसर्ग वाढण्याचे प्रमाण तीव्र असते. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शाळा, कार्यालय तसेच बाहेरुन आल्यावर साबण व पाण्याने हात, पाय स्वच्छ धुवावेत. या दिवसात जेवण योग्य पध्दतीने शिजवून व योग्यरितीने साठवून ठेवले पाहिजे. भाजीपाला, फळे वापराआधी स्वच्छ धुवावी. एखादा पदार्थ खराब झाल्याची शंका असल्यास ते खाऊ नये. घरातील व आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता राखावी.

    अतिसार झाल्यावर असा घ्यावा आहार

    पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे होणारे तत्सम आजार तसेच अतिसार टाळण्यासाठी रुग्णाला आहार देतांना साधे जेवण द्यावे. उकळून गार केलेले पाणी द्यावे. शक्यतो, बाहेरील चमचमीत खाद्यपदार्थ टाळावेत. घरचे गरम व सुपाच्य जेवण घ्यावे. पोटाचा काही त्रास जाणवत असल्यास घरी तयार केलेली पातळ पेज खावी. त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

    अतिसार झाल्यावर काय खाऊ नये ?

    पचनास जड असणारे पदार्थ, मसालेदार पदार्थ, तिखट, आंबट, तळलेले पदार्थ खाणे टाळावे, बाहेरील उघड्यावरील दुषित पदार्थ, शिळे अन्न, अर्धवट शिजलेले अन्न खाणे टाळावे. चहा, कॉफी यांचे नियंत्रित प्रमाणात सेवन करावे. रात्रीचे जागरण टाळावे.

    बाळाला अतिसार झाल्यास…

    अतिसार झालेल्या बाळाच्या विष्ठेची लवकर आणि सुरक्षित प्रकारे विल्हेवाट लावावी. अतिसारादरम्यान जे बाळ स्तनपान घेत असेल त्याला स्तनपान सुरु ठेवा आणि अतिसारादरम्यान व नंतरही जास्तीत-जास्त स्तनपान देण्यात यावे. स्वयंपाक करण्यापूर्वी, बालकाला जेवण भरवण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावेत. अतिसार असलेल्या बालकांना 14 दिवसांपर्यंत झिंकच्या गोळ्या देण्यात याव्यात. अतिसार होणे थांबले तरी गोळ्या देत राहाणे आवश्यक आहे. ओआरएस देऊनही अतिसार थांबत नसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत. आरोग्य विषयक उत्तम जीवनशैली, सुपाच्य खाण्याच्या सवयी, स्वच्छता तसेच योग्य औषधोपचाराने अतिसार नियंत्रित करता येतो.

    -अपर्णा प्र. यावलकर
    माहिती अधिकारी,
    जिल्हा माहिती कार्यालय,अमरावती.

Leave a comment