अतिसामान्य कुटुंबातील प्रा. रमेश वरघट सर यांचे बहुरंगी कार्य

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

    यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात डोंगराळ भागातील करजगाव अत्यंत गरीब कुटुंबात प्रा. रमेश वरघट सरांचा जन्म झाला. आई बाबा दोघेही निरक्षर होते. पण आपला मुलगा शिकावा, चांगला मोठा व्हावा. असं राधा-कृष्ण या जोडप्याला मनातून वाटे. म्हणून राबराब राबून त्यांनी मुलाला शाळेत घातलं. त्यांचं सातवीपर्यंतचे शिक्षण अत्यंत हलाखीत गावातच झालं. हायस्कूलचे शिक्षण श्री शिवाजी हायस्कूल दारव्हा येथे पूर्ण केले. त्यावेळी ते कोरे वसतिगृहात राहायचे. नववी पास झाल्यानंतर काही काळ त्यांच्या शिक्षणात खंड सुद्धा पडला होता. पण श्री एन. के. निमकर सर तसेच त्यांचा बालमित्र विष्णू तवकार यांच्यामुळे पुन्हा त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. आणि ते मॅट्रिक द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेत. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथे झालं .महाविद्यालयात शिक्षण घेत असताना अनेकदा त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. घरची गरिबी व अत्यल्प मिळणारी शिष्यवृत्ती यामुळे त्यांना स्वावलंबी व्हावं लागलं अशावेळी ते कधी मैदानावर खोदकाम, कधी हॉटेलमध्ये,कधी गवंड्याच्या हाताखाली, कधी ‘कमवा आणि शिका’ या योजनेत, कधी रोजगार हमी योजनेअंतर्गत एखाद्या कार्यालयात तर कधी कधी चौकीदारी सुद्धा जसे हाताला मिळेल तसे काम करून, त्यांनी बी.ए. ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले. नंतर मराठवाडा विद्यापीठातून एम. ए. (इतिहास) व एम.फील. पूर्ण केले. औरंगाबादलाच शासकीय अध्यापक महाविद्यालयातून त्यांनी बी. एड. पूर्ण केले.

    1986 मध्ये वसंतराव नाईक विद्यालय वाई बाजार ता. किनवट जिल्हा नांदेड येथून त्यांनी आपल्या नोकरीची सुरुवात केली. उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांचे इतरत्र नोकरीचे प्रयत्न चालूच होते .अठरा महिन्यानंतर त्यांची निवड यवतमाळ जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्हा परिषद विद्यालय विडुळ ता. उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे झाली. तेथे सव्वा दोन वर्षे नोकरी केल्यानंतर, निवड मंडळामार्फत त्यांची निवड अकोला जिल्ह्यातील अडगाव बु।। तालुका तेल्हारा जिल्हा अकोला येथिल कॉलेज वर अधिव्याख्याता म्हणून झाली, शेवटी वाशिम जिल्हा निर्माण झाल्यानंतर 1998 ला ते जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय कामरगाव येथे बदलीवर आले. आणि तेथेच 2018 मध्ये सेवानिवृत्त झालेत. विशेष म्हणजे आपल्या सेवानिवृत्तीनंतरही 2021 पर्यंत त्यांनी विनावेतन अध्यापनाचे कार्य केले.

    “शाळा हेच माझे मंदिर आहे.विद्यार्थीच माझे दैवत आहे.त्यांच्यासाठी तन-मन-धनाने झटणे हीच माझी पूजा आहे. आणि त्यांना शिकवीत असताना जीवनातील सुख दुःख विसरणे, देहभान विसरणे हीच माझी समाधीची अवस्था आहे.” असे त्यांचे मत होते.
    सरांना अध्यापनाची फारच आवड होती .जवळपास 35 वर्षे त्यांनी प्रामाणिकपणे अध्यापनाचे कार्य केलं.या काळात पाच हजारांपेक्षाही जास्त विद्यार्थी त्यांच्या हाताखालून गेलेत .ते आपल्या अध्यापनात विविध अध्यापन पद्धतीचा अवलंब करायचे, आकृत्या नकाशे या सारख्या शैक्षणिक साधनांचा भरपूर वापर करायचे. त्यांनी इतिहास, इंग्रजी, मराठी, आणि समाजशास्त्र हे विशेष शिकविले. 2001 ते 2004 या काळात ते एकमेव व्याख्याते असूनही त्यांनी दोन वर्गांना शिकविले विद्यार्थ्यांत वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी विद्यार्थी वाचनालय चालविले.अठरा वेळा त्यांच्या विषयाचा निकाल शंभर टक्के राहिला. उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवण्यासाठी ते ज्यादा वर्गाचे, तसेच उन्हाळी वर्गाचे आयोजन करायचे. त्यांनी शेकडो गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना परीक्षा फी, शैक्षणिक साहित्य, गणवेश,तसेच औषधोपचार यांची मदत केली. तसेच विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तयांचे लाभ मिळवून दिले. विद्यार्थ्यांच्या कल्याणाच्या प्रत्येक उपक्रमाला तन-मन-धनाने सहकार्य केलं. विद्यार्थ्यात अभ्यासाची चुरस निर्माण व्हावी म्हणून आपल्या आईच्या नावाने कामरगाव महाविद्यालयात दोन पुरस्कार चालू केले.याशिवाय व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन, व्यवसाय मार्गदर्शन यासारखे उपक्रम राबविले .निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, यासारख्या स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला. सरांचे हस्ताक्षर सुंदर असल्यामुळे ते सुविचार फलक,सूचना फलक, वार्ताफलक,व माहिती फलक नित्यनेमाने लिहायचे. महापुरुष तसेच सुधारकांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या यांचे आयोजन करायचे.आपल्या प्रामाणिक सेवेबद्दल सर जेथे-जेथे होते तिथे, विद्यार्थीप्रियच राहिलेत. त्यांनी या कार्याला इतके वाहून घेतलं होतं की आपल्या हक्काच्या 200 पेक्षा जास्त सुट्ट्या त्यांनी घउपभोगल्याच नाही. शिवाय सेवानिवृत्तीनंतरही सतत तीन वर्ष स्वखर्चाने शाळेत जाऊन त्यांनी विनावेतन अध्यापनाचे कार्य केले.

    अध्यापना बरोबरच सरांना समाजसेवेची आवड होती.आईच्या मृत्यूनंतर त्यांनी आपल्या लहान भावंडांना तसेच बहिणीची मुलं-मुली यांना पण शिकविले. ते सर्वच चांगल्या नोकरीवर आहेत. सरांचे सर्व धर्मियांची स्नेहाचे संबंध राहिलेत. ज्या भागात त्यांनी सेवा केली, त्या भागातील आदिवासी वस्त्यांना भेटी देऊन व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम सांगितले. आरोग्यविषयक माहिती दिली. साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले. सरांवर बुद्ध, फुले, शाहू,आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव आहे. समाजातील अनिष्ट रूढी परंपरा ला त्यांनी विरोध केला. आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह,खर्चिक विवाह ऐवजी नोंदणी विवाह यांची गरज पटवून दिली.व्याख्यानाच्या माध्यमातून लोकांना ग्राम स्वच्छता, लोकसंख्यावाढीबाबत जागृती, कुटुंबकल्याण,व्यसनमुक्ती, हागणदारी मुक्ती, स्त्री-पुरुष समानता, याविषयी प्रबोधन केले. सामाजिक सलोख्याचे प्रयत्न केले भुतांची भीती नष्ट व्हावी यासाठी विद्यार्थ्यांकरिता स्मशानातील सहलीचे आयोजन केले. भानामतीच्या केसेस हाताळल्या. भोंदू बाबांना विरोध करून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले. कामरगाव ला असताना आपल्या घरून पळून आलेल्या आणि आपल्या घरापासून शंभर किलोमीटर दूर असलेल्या सात वर्षीय बालकामगारांची सुटका करून तिला आपल्या आई-वडिलांकडे सोपीविले.अनेक होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली.

    सरांचं पर्यावरण प्रेम सर्वश्रुतच आहे. गावी आल्यानंतर ते घरी कमी आणि शेतात,जंगलात निसर्गाच्या सानिध्यातच आपला जास्त काळ घालवितात. त्यांचं निसर्गप्रेम पाहता प्राचार्य डी. बी.ऊलेमाले सरांनी विज्ञान शिक्षकाकडे असणार निसर्ग मंडळ व राष्ट्रीय हरित सेनेचा प्रभार मुद्दाम त्यांच्याकडे दिला.दरवर्षी ते विद्यार्थ्यांच्या मदतीने शेकडो वृक्ष प्रजातीच्या बिया गोळा करत.(आजही येथे कुठे बिया दिसल्या की ते गोळा करतात )त्यातीलच निवडक बियांची रोपवाटिका तयार तयार करत. विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांनी दरवर्षी चार हजार पर्यंत रोपट्यांच्या रोपवाटीका तयार केल्यात. त्यातील रोपे बचत गट, प्राथमिक शाळा, तसेच ज्यांनी-ज्यांनी मागितले त्यांना मोफत पुरवायचे. शाळेतील मुलांच्या वाढदिवसाला रोपटे भेट द्यायचे. शाळेत येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत सुद्धा रोपटे देऊनच करायचे. त्यांनी आपल्या घरी, शेतात, शाळेत, तसेच जिथे जिथे मोकळी जागा दिसेल तिथे आजवर हजारो झाडे लावलीत. पर्यावरणावर “चला फटाके करू हद्दपार”,”नैसर्गिक रंगाची होळी खेळूया” यासारखे लेख लिहिलेत.”आम्हाला वाचवा”, “आदिवासींचे वृक्ष प्रेम” यासारखी मूकनाट्ये स्वतः लिहून बसविली.पर्यावरणावर कविता लिहिल्या, निसर्ग सहलीचे आयोजन केले, अभयारण्ये,राष्ट्रीय उद्याने यांना भेटी दिल्यात ताडोबा राष्ट्रीय उद्यानात तर ते आठ दिवस मुक्कामी होते. विद्यार्थ्यात पर्यावरण विषयक जागृती व्हावी म्हणून त्यांनी पर्यावरण दिन, जागतिक वनदिन, जागतिक जलदिन, वसुंधरा दिन,वन्यजीव सप्ताह, यासारख्या दीनांचे आयोजन केले. पर्यावरणपूरक सण साजरे व्हावे याविषयी प्रबोधन केले. कचर्या ची होळी, फटाकेमुक्त दिवाळी,यासारखे उपक्रम राबविले.जैवविविधता दिनाच्या माध्यमातून वनस्पती पशू-पक्षी कीटक यांचे पर्यावरणातील महत्त्व सांगितले. इतरत्र चिमण्या जरी दुर्मिळ झाल्यात तरी पण आजही त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणात चिमण्या दिसून येतात त्यांनी त्यांच्यासाठी घरट्यांची सोय केली आहे. नागपंचमीच्या निमित्ताने सर्प प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना सापाची ओळख करून दिली.तसेच सर्पदंश झालेल्या सर्पमित्रा साठी मदत फेरी काढून तेरा हजार आठशे पन्नास रुपये गोळा करून सामाजिक बांधिलकी जपली. ऊर्जाबचत, गाजर गवत निर्मुलन, जलसाक्षरता,पर्यावरण चित्र प्रदर्शनी,भित्तीपत्रक,ग्रामस्वच्छता, प्लास्टिक निर्मूलन,’टाकाऊ पासून टिकाऊ’ यासारखे पर्यावरण पूरक उपक्रम राबविले.त्यांचे पर्यावरण विषयक कार्य पाहता महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाने 15 पुरस्कार राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांचे हस्ते प्रदान करण्यात आलेत.

    सरांना पर्यटनाची आवड आहे.आज पर्यंत त्यांनी भारतातील 18 राज्यांना भेटी देऊन, तेथील लेण्या, किल्ले, राजवाडे ,स्मारके ,वस्तुसंग्रहालय, मंदिरे,मशिदी,चर्चेस,विहार गुरुद्वारा, धबधबे,सरोवरे,समुद्र किनारे, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने यासारखी ऐतिहासिक,धार्मिक, भौगोलिक व पर्यावरण विषयक स्थळे पाहिलीत. त्यांना संगीताची पण आवड आहे .एकेकाळी संगीतवेडा म्हणून त्यांची गावात ओळख होती. ते दिवसभर लेकरा सारखा रेडिओ काखेत घेऊनच फिरायचे .त्यांच्याकडे जुन्या गीतांच्या तसेच भाषणाच्या जवळपास चारशे पेक्षाही जास्त कॅसेटस् आहेत .तसेच 300 पेक्षा जास्त सिडी आणिडीव्हीडी आहेत. आपल्या विद्यार्थी जीवनात सर चांगले खेळाडू होते. कबड्डी,खो-खो ,व्हॉलीबॉल, फुटबॉल, बुद्धिबळ हे त्यांचे आवडते खेळ होते. शिवाय त्यांना पोहणे सुद्धा आवडते. सरांना वाचनाचे सुद्धा वेड आहे. आपल्या वैयक्तिक ग्रंथालयात जवळपास एक लाख रुपयाची 1000 पेक्षा हि जास्त ग्रंथसंपदा त्यांचेकडे आहेत.त्यांना अभिनयाची सुद्धा आवड आहे. करजगाव येथील चंदनशेष नाट्य मंडळातील ‘संगीत गंगासागर’ तसेच महाविद्यालयीन जीवनात ‘कवडीचुंबक’ या सारख्या नाटकातून त्यांनी अभिनय केला .शिवाय कॉलेजमध्ये सादर अनेक नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा त्यांनी केलं. याशिवाय त्यांच्याकडे जुन्या नाण्यांचा संग्रह आहे. ऐतिहासिक चित्रे, सामाजिक विषयावरील कात्रणे सुद्धा त्यांनी संग्रहित केली आहेत.

    सरांनी इतिहास,पर्यावरण आणि सामाजिक अशा विषयावरील अनेक ‘लेख’ लिहिलेत .’विद्यार्थ्यात वाचनाची आवड कमी होण्याची कारणे व त्यावरील उपाय’ हा ‘शोधनिबंध’ लिहिला. विविध विषयावरील 50 पेक्षाही जास्त ‘कविता’लिहिल्यात. तसेच महाविद्यालयीन जीवनात त्यांनी कलापथकातील कथानकांचे संवाद लिहून नाटकात रूपांतर केले होते. आणि 80 च्या दशकात या नाटकाचे करजगाव आणि आजूबाजूच्या गावात 20 पेक्षा हि जास्त प्रयोग झालेत हे विशेष !याशिवाय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ‘भंडाफोड, बुवाबाजी, आम्हाला वाचवा,आदिवासीचे वृक्षप्रेम’ यासारख्या नाटिका लिहून त्यांचे दिग्दर्शन सुद्धा केले. ‘पथनाट्ये, मूकनाट्ये’ सादर केलीत. आज-काल ते करजगावच्या आठवणी, अनुभव अमरावती येथील गौरव प्रकाशन वृत्तपत्राच्या माध्यमातून आठवणीतील करजगाव या सदरात लिहित असून, स्वतः पदरमोड करून आपल्या करजगावसाठी वाचनालय चालवीत आहेत.

    सरांनी सेवेत असताना बत्तीस वर्षे आणि सेवानिवृत्ती नंतरही तीन वर्षे असे एकूण 35 वर्ष ‘अध्यापनाचं पवित्र कार्य’ केलं. याच काळात त्यांनी काही काळ ‘पर्यवेक्षणा’ ची जबाबदारी सुद्धा पार पाडली .एस. एस .सी .च्या ‘उद्बोधनवर्गाचे’ ते विषय तज्ञ होते. तसेच बारावीच्या इतिहास विषयाचे ‘तज्ञ मार्गदर्शक’ सुद्धा राहिलेत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना त्यांनी प्रशिक्षण दिलं. इयत्ता बारावीच्या इतिहास विषयाच्या पुस्तकाच्या समिक्षणासाठी विदर्भातून त्यांची निवड झाली होती. पंधरा वर्षे ते बारावीचे परीक्षक होते. तसेच 13 वर्ष समीक्षक राहिलेत. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी होते. तसेच अखिल भारतीय सत्यशोधक समाज वाशिम जिल्ह्याचे ‘कार्याध्यक्ष’ होते.जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघटनेचे वाशिम जिल्ह्याचे ‘उपाध्यक्ष’ राहिले. अमरावती शिक्षण मंडळ. सत्यशोधक ज्ञानपीठ धुळे, आणि महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण संचालनालयाच्या बार्टी मार्फत मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे ते ‘केंद्राध्यक्ष’ म्हणून राहिलेत. तसेच पचमढी येथील ‘एडवेंचर कॅम्प’ आणि ‘ताडोबा महोत्सवात’ त्यांनी वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.

    प्राध्यापक वरघट सरांचे उत्कृष्ट निकाल आणि विद्यार्थी कल्याणाची धडपड पाहता,वाशिम जिल्हा परिषदेने त्यांना ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने’ गौरविले. सरांचे पुरोगामी विचार,दलित,आदिवासी,महिला आदि.विषयीचे कार्य लक्षात घेता त्यांना ‘अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या वतीने सत्यशोधकी जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याची दखल घेऊन ‘राज्यस्तरीय आणि अनिस कार्यगौरव पुरस्कार’ मिळाला .त्यांनी पर्यावरणाबाबत जागृती साठी केलेले प्रयत्न, बीजसंकलन, रोपवाटिका, वृक्षारोपण आणि राबविलेल्या उपक्रमांची नोंद घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत दिले जाणारे एकूण पंधरा पुरस्कार त्यांना मिळालेत. त्यात पाच वेळा त्यांना ‘आदर्श पर्यावरण शिक्षकाचा पुरस्कार’ मिळाला याशिवाय विविध संघटना मार्फत दिले जाणारे ‘सेवा पुरस्कार, मानवता पुरस्कार, कर्मदीप पुरस्कार,राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’ आदी पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. सरांची शैक्षणिक, सामाजिक पर्यावरणविषयक आणि राष्ट्रीय कार्याची नोंद घेऊन 2012 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात बहूमानाचा मानला जाणारा ‘राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार’ मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राज्यपाल यांच्या हस्ते देऊन त्यांचा सन्मान केला.

    करजगाव सारख्या लहान गावातील आणि एका अतिसामान्य कुटुंबातील प्रा. रमेश वरघट यांचे बहुरंगी कार्य त्यांना मिळालेले विविध पुरस्कार निश्चितच गावाची शान आणि गावकर्यांकची अभिमानाने मान उंचावणारे आहेत. आज सरांचा जन्मदिवस, त्यांच्या जन्मदिवसनिमित्त यांच्या बहुरंगी कार्याला मानाचा सलाम.! आणि उदंड आयुरारोग्यसाठी सरांना कोटी कोटी शुभेच्छा! त्यासाठीच हा शब्दप्रपंच…!

    शब्दांकन-
    बंडूकुमार धवणे
    संपादक
    गौरव प्रकाशन,अमरावती

Leave a comment