‘स्त्री मनाची घुसमट : काल आणि आज’

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram
‘आई’ हा शब्दच् मुलांसाठी सर्वांग सुंदर असतो. त्या शब्दाला कशाचीच् उपमा देऊ शकत नाही. मुले ही आई या शब्दातच संपूर्ण विश्व बघत असतात. तिच्या मायेत, तिच्या वात्सल्य छायेत ते वाढत असतात. तिचा प्रत्येक शब्द मुलांचे बालपण घडवत असतात. बालमनावर संस्कार करणारी ‘ती’ माऊली जगाच्या जडण-घडणीचा पाया असते. आई हीच् मुलांची प्रथम गुरू मानली जाते. योग्य संस्कार देऊन ती मुलांचे भविष्य घडवीत असते. संस्कार हा शब्दचं असा आहे की,  तो माणसाला योग्य मार्ग दाखवित असतो. तिथे दूर दूर पर्यंत विकृतीला मनात थारा नसतो. मनावर झालेले संस्कार आयुष्यभराची शिदोरी म्हणून माणसाला प्रत्येक मार्गावर सोबत असते. आज काळ बदलला, विचार बदलले ; त्याचबरोबर आई पण आधुनिक विचार सरणीची झाली. परंतु कधीकाळी तिच्यातील अबला म्हणून वावरणारी स्त्री आज बदलली असली तरी, तिच्यातील संस्कारी आई अजूनही बदललेली नाही. तिला सुद्धा वाटते की, मी फक्त माझ्यासाठी जगावे! मोकळे अगदी मुक्त वागावे. समाजाने पुरुषांप्रमाणे तिलाही समान अधिकार द्यावे, परंतु आपला रूढीवादी समाज आजही पूर्णपणे बदललेला नाही. तिची कुण्या पुरुषाशी ओळख असणे आजही समाज मान्य करीत नाही. या गोष्टी समाजाकडून येणाऱ्या पिढीच्या मनावर प्रतिबिंबित झालेल्या असतात. तिची साधी, निखळ, निर्मळ मैत्रीही कुणा पुरुषाशी असणे म्हणजे तिच्या स्त्रित्त्वावर बोट ठेवले जाते. म्हणून साहजिकच घरातील मुलगा किंवा मुलगी त्यांच्या आईला कुणी काही म्हणावे, हे सहन करू शकत नाही. स्त्री कडे अगदी पहिल्या पासून संस्कारी मूर्ती म्हणूनच् बघितले जाते. त्यामुळे चौकटी बाहेर जर ती मुक्त पाऊल टाकत असेल तर, प्रथम तिच्या संस्कारांवर बोट ठेवले जाते. तिची पुरुषांशी मैत्री असेल तर ती संस्कारी आई कुठली? असे चुकीचे प्रश्न केले जातात. यावेळी तिला तिची मुलं सुद्धा समजून घेत नाही. ही आधुनिक बदललेल्या विचारसरणीसाठी खूप खंतदायक, विचारप्रवण गोष्ट आहे. मुला मुलींचे मित्र मैत्रिणी आई मान्य करते, परंतु मुले मात्र आईची कुणाशी असलेली मैत्री मान्य करत नाही. आजही एक संस्कारी स्त्री ; हा माझा मित्र म्हणून पर-पुरुषाची ओळख करून देऊ शकत नाही.  समाजाच्या मनातील विचार वेगळ्या दिशेने प्रवाह करतात हे तिला माहीत असते. आपली मुले आपल्या बद्दल वेगळा विचार करेल हे सुद्धा तिला माहित असते. म्हणून एक स्त्री म्हणून ती  सतत ‘मर्यादा’ या शब्दाशी नाते जोडते. मोकळा श्वास घेण्याचा विचार जर केलाच् तर अनेक प्रश्नांना उत्तरे देता देता तीच् एक प्रश्न बनून राहते. ती सगळ्यांना समजून घेते पण तिला समजून घेणारे कुणीही नसते. तिच्यातील आईचा जेव्हा जन्म होतो तेव्हा ती, ती उरत नाही! तिच्यातील आम्ही ने जन्म घेतलेला असतो! तिचा त्याग तिची तडजोड कुणालाही दिसत नाही. म्हणून तिच्या नशिबी सतत घुसमट असते. परंतु समकालीन आधुनिक विचारसरणीच्या मुलांनी आणि त्याच बरोबर समाजाने बदलायला पाहिजे. झऱ्यासारखे निर्मळ विचार आणि आकाशासारखे निरभ्र मनाने जो पर्यंत स्त्री-पुरुष मैत्री कडे बघितले जाणार नाही, तो पर्यंत स्वच्छ पाणी सुद्धा गढूळच् दिसेल!  तिच्या कडे एक माणूस म्हणून जोपर्यंत बघितले जाणार नाही तो पर्यंत तिच्याकडे पाहण्याची दृष्टी आणि दृष्टिकोन कधीही बदलणार नाही. एकीकडे स्त्री पुरुष समान अधिकार म्हणून आपण घोषणा करतो, पण तिने पुरुषाशी बोलू नये किंव्हा मैत्री करू नये! ती जर ती चौकट मोडत असेल तर तिला गालबोट लावणे, आणि परत तिला त्याच बंधनात अडकवणे, हे आधुनिक विचासरणीचे विचार बदलल्या शिवाय  स्त्री पुरुष हा भेद मिटणार नाही आणि पूर्वापार चालत असलेला इतिहास आणि स्त्रीचे समाजातील स्थान जे आजही पुरुष प्रधान संस्कृतीत दुय्यम आहे ते दुय्यमच् राहील. आता पर्यंत स्त्री ही समान हक्कासाठी लढत आली. सन्मान मिळविण्यासाठी लढत आली. तिला सतत मागावे लागले; कुणीही तिला सहज काहीही दिलेले नाही. खरे तर तिने मुक्त जगणे जणू हिसकावूनचं घेतले, असेच म्हणावे लागेल. परंतु तिच्या बद्दलचे तिच्या कुटुंबाचे, समाजाचे विचार बदलेलच् नाही, तर जी घुसमट जन्मतःच् सोबत घेऊन आली ती कायम राहील. आणि तिला बंदिस्त मनाचा पिंजरा तोडून मनसोक्त जगण्यासाठी सतत लढावे लागेल.
– सौ निशा खापरे
नागपूर
७०५७०७५७४५

Leave a comment