मतिमंदत्व

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram
       
शासनाने शिक्षण, हक्क कायदा करून प्रत्येकाला तो अधिकार मिळवून दिला आहे. पण अधिकाराचा लाभ घेण्याची संधी शारीरिक व्यंग असलेल्यांना मिळते का? तर त्याचे उत्तर नाही असेच येईल. मूकबधिर व मतिमंद अशा मुलांना प्राथमिक शिक्षण देण्याच्या सोयी असतात. परंतु माध्यमिक शिक्षणाची मात्र त्यांची गैरसोय असते. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची पाटी कोरीच दिसते. त्यांची बोली भाषा ही सांकेतिक स्वरूपात विकसित झालेली असते. त्यामुळे सामान्य शाळेत शिक्षण घेणे त्यांना कठीण जाते. पदवीच्या शिक्षणाचा पर्याय नसल्यामुळे त्यांना व्यवसायिक शिक्षण घेता येते. पण व्यवसाय शिक्षणातही पाच टक्के आरक्षण आहे.सामान्य मुलांच्या शाळेतले विद्यार्थी शिक्षण घेतात, परंतु त्यांच्या साठी लागणारे शैक्षणिक साहित्याच्या मर्यादा आहेत. शिवाय त्यांच्या उच्च शिक्षणाचा विस्तार मर्यादित आहे. कला हा एक विषय त्यांच्या उच्च शिक्षणासाठी सोयीस्कर आहे. त्याचे शिक्षण घेण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मतिमंदांच्या बाबतीत विशेष शाळा आहेत पण आकलन क्षमता मर्यादित असल्याने प्राथमिक शिक्षणानंतर त्यांचा विस्तार होऊ शकत नाही. शासनाकडूनही खूपच तुटपुंजी शिष्यवृत्ती त्यांना मिळते. 
              शारीरिक आणि बौद्धिक अपूर्ण असणारी हल्ली खूप मुले दिसतात आणि ती मोठ्या प्रमाणावर आढळणारी समस्या आहे. मतिमंदत्व म्हणजे ७० पेक्षा कमी बुद्ध्यांक. बुद्ध्यांक म्हणजे शारीरिक वय आणि मानसिक वय यांची तुलना. बुद्ध्यांक हा शारीरिक वयापेक्षा कमी असणे म्हणजे मतिमंदत्व असणे होय. आपल्या समाजात सुमारे तीन टक्के व्यक्ती मतिमंद असतात. साधारण, मध्यम व अति मतिमंदत्व असे तीन प्रकार असतात.औषधोपचार आणि शिक्षणाचा विचार करताना या गटवारीचा उपयोग होतो. मानसिक व बौद्धिक वाढ पडताळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आई-वडिलांना माहिती विचारणे. काही मतिमंद मुलांची शारीरिक ठेव आणि थोडी वेगळी असते पण ती मुले अति मतिमंद मुलांमध्ये ओळखली जातात. साधारण मतिमंद मुलांमध्ये फार वेगळेपण दिसून येत नाही. अति मतिमंद मुलांमध्ये चेहऱ्याची ठेवण, डोळे सूचक असतात. डोक्याचा आकार लहान मोठा, डोळे तिरपे, केस जाड, मोठी जीभ अशी चिन्हे दिसतात.
            स्त्रियांच्या गरोदरपणावेळी किंवा प्रसूतीच्यावेळी गुंतागुंत निर्माण होते, माता कुपोषित, आजारी, रोगग्रस्त असताना किंवा गरोदरपणातले काही जंतुदोष, मद्यसेवन, पहिले मुल पस्तिशीनंतर होणे या काही कारणांमुळे मूल मतिमंद होऊ शकते. यासाठी प्रसुति पूर्व तपासणी आणि आरोग्य शिक्षण असणे महत्त्वाचे आहे. गलगंड असलेल्या मातेची मुले मतिमंद असण्याची शक्यता असते. प्रसूती च्या काळात मूलभूत मरणे बाळंतपणाला जास्त वेळ लागणे, बाळंतपणात डोक्याला इजा होऊ नये,बाळाचे श्वसन लगेच चालू न होणे, बाळंतपणात  अतिरक्तस्त्राव होणे अशा गोष्टींमुळे मूल मतिमंद होऊ शकते. नुसते बाळ बाहेर काढण्यापेक्षा बाळंतपणात बाळ सुरक्षित असण्याला महत्त्व आहे. बाळ लवकर बाहेर पडेल आणि लवकर रडेल अशी काळजी घेणे आवश्‍यक असते.
          कुपोषण, मेंदूला मार लागणे, खूप उंचावरून बाळ खाली पडणे, गोवर, मेंदूज्वर, मेंदूआवरणदाह,कावीळ, अपस्मार अशा कारणांनी देखील मतिमंदत्व येऊ शकते.शैक्षणिक दृष्ट्या मतिमंद व्यक्तींचे शिक्षण देता येण्यासारखे मतिमंद, कौशल्य शिकवता येण्याजोगे मतिमंद आणि अति मतिमंद असे प्रकार असल्यामुळे प्रत्येक प्रकाराचा अभ्यास करून त्यांना त्यादृष्टीने शिक्षण देणे गरजेचे असते.शिक्षण देता येण्याजोग्या मतिमंदांचा बुद्धिगुणांक पन्नास ते ऐंशी दरम्यान असतो. अशी मुले सहाव्या वर्षी लेखन, वाचन अंकज्ञान शिकू शकत नाहीत. त्यांना त्या गोष्टी आणखी काही वर्षांनी शिकता येतात. सामान्य बुद्धिमत्तेच्या व्यक्ती ज्या कुशल आणि अर्धकुशल गोष्टी करतात, त्यांना थोड्या उशिरा येतात. कौशल्य शिकवता येण्याजोग्या मतिमंदांचा  बुद्धिगुणांक पंचवीस ते पन्नासच्या दरम्यान असतो. सर्वसामान्य व्यक्तीच्या एकतृतीयांश वेगाने त्यांची प्रगती होते. या व्यक्तींना नेहमीचे शाळेचे विषय येत नाहीत. मात्र स्वतःचे संरक्षण करणे,यंत्राबाबत सावधगिरी बाळगणे या गोष्टी येतात. इतरांनी  मार्गदर्शन केले तर थोडेफार त्या शिकवू शकतात.अतिमतीमंद व्यक्तीचा बुद्धिगुणांक २५ पेक्षा कमी असतो. त्या व्यक्तींची इतरांनी काळजी घ्यावी लागते. त्यांपैकी काही लोकांना जेवता खाता येते. चालता बोलता येते. परंतु काहींना  तर सर्वकाळ अंथरुणातच कंठावा लागतो. अशा प्रकारच्या व्यक्ती लहानपणी दगावण्याचा संभव अधिक असतो. त्यांना कुशल, अर्धकुशल असे काही शिकवता येत नाही. कारण त्यांची मानसिक वाढ चार वर्षाच्या मुलापेक्षा अधिक होत नाही.
       ‌      ‌ ‌‌      मतिमंद मुलांना वाढवणे हे अगदी चिकाटीचे नि सहनशिलतेचे काम आहे. मतिमंद मूल स्वतः जास्तीत जास्त काय करू शकेल, त्याप्रमाणे प्रशिक्षण द्यावे. ते जितके काम करू शकते तितके काम त्याच्याकडून करून घेणे. यामुळे त्याची मानसिक आणि बौद्धिक वाढही होऊ शकते. ते स्वतः अंघोळ ,मलमूत्र विसर्जन, जेवण खाणे अशा प्रकारची काळजी घेऊ शकले तरी कुटुंबांची सोय होते. मतिमंद मुलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी जेवढे शक्य आहे तेवढे प्रशिक्षण देण्याची सुद्धा व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे. मतिमंद मुलांना रागावून, ओरडून काम करून घेण्यापेक्षा गोड बोलून, त्याला समजून घेऊन करू दिले तर कदाचित त्यांची मानसिक, बौद्धिक  वाढ होऊ शकते. शहरात मतिमंद मुलांसाठी शाळांची सोय आहे, परंतु ग्रामीण भागात ते शक्य नाही. काही कार्यकर्त्यांना खास प्रशिक्षण देऊन लहान प्रमाणात प्रशिक्षण केंद्रे चालू करणे एवढे ग्रामीण भागात शक्य होईल. पण त्यात सुद्धा आई-वडिलांचा व कुटुंबातील इतर मंडळींचा वाटाही महत्त्वाचा असतो.मतिमंद मुलांना शारीरिक आजार, अपघात होऊ शकतात. हे टाळण्यासाठी त्यांची योग्य काळजी, दखल घेणे आवश्यक आहे. मतिमंद मुलांना लहानपणापासून चालायला, बोलायला शिकविणे, रंग, स्पर्श, वास, आवाज यांची ओळख करून देणे, अन्न चावून खायला लावणे, मलमूत्र विसर्जन करायला लावण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे असते. लाकडी खेळणी, गाड्यांच्या मदतीने त्यांच्याशी खेळून त्यांचा बुद्धांकही वाढविला जातो. त्यांना कपडे घालायला लावणे, आंघोळ करायला लावणे, इतर मुलांबरोबर खेळायला देणे, छोटी अक्षरे अंक लिहिणे, वजाबाकी बेरीज शिकवणे यामुळेही त्यांची कुवत वाढत जाते.
      असतात जरी एखाद्यास
      सोसायचे नशिबाचे भोग
      बालपणापासूनचा विकार 
      अनेक प्रकारचे काही रोग
सौ.भारती सावंत
मुंबई
9653445835

0 thoughts on “मतिमंदत्व”

Leave a comment