धम्म म्हणजे माणुसकीची महाऊर्जा

    “मानवता के इतिहास मे राष्ट्रीयता एक बहुत बडी शक्ती रही है।यह एकत्व की भावना है ,। किसी वर्ग- विशेष के संबंधित होना नही ।”- डॉ.बाबासाहेब आंबेडकर

    मानवाला नव्या प्रगतीपथावर जाण्यासाठी फक्त अर्थार्जनाची आवश्यकता नाही तर त्याला माणुसकीच्या ऊर्जेची गरज आहे. ही माणुसकीची महाऊर्जा म्हणजे धम्म होय. धम्म हा जगातील सर्व मानवांना समानतेने वागवणारा महाऊर्जावान स्तोत्र आहे. जगातील अनेक धर्मात रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, देवभोळेपणा यांची सांगड झालेली दिसते . पण बुद्ध धम्मामध्ये प्रतित्यसमुत्पाद या विज्ञानवादी दृष्टिकोनातून मानवी जीवनाकडे पाहाले गेले आहे.

    प्रत्येक माणसाला स्वातंत्र असले पाहिजे. तो जसा शरीराने स्वतंत्र असतो तसाच तो मनाने स्वतंत्र असला पाहिजे. स्व:हित कल्याणा बरोबर, प्राणिमात्रांच्या कल्याणाची स्वप्ने त्यांना पडली पाहिजेत. माणसातील भेदाभेद ,विषमता, गुलामी ,अन्याय,अत्याचार,शोषण विटंबना या पासून मानवाला सुरक्षित ठेवायचे असेल तर धम्म ऊर्जेशिवाय तरणोपाय नाही.

    जगातील दोन माणसे जवळ आली तर त्यांना धम्माची गरज आहे आपले आचरण ,आपले विचार यांची जाणीव होण्यासाठी माणुसकीच्या विचारांची गरज असते .ती फक्त बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानात दिसून येते. स्वातंत्र्य, समता ,बंधुभाव व न्याय या मूल्यसिंध्दातावर आधारित धम्म हा जागतिक मानवाचा भावस्पर्शी प्रकाश आहे. प्रज्ञा, शील, करुणा या जीवनायापणातून अत्तः दीप भवः चा महामार्ग माणसाला प्रगतीपथावर नेऊ शकतो.

    आज जागतिक पातळीवर मानवाला नष्ट करणाऱ्या विकृत मानवाची नवी जमात निर्माण होत आहे. अर्थकारणाच्या फसव्या मायाजाळाने माणसाला गुलाम केले आहे. माणूस स्वतंत्र्य दिसत असला तरी तो मनाने गुलाम आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावाने त्याचे यांत्रिकरण होत आहे. माणुसकीचा झरा आटल्यासारखा दिसतो आहे. जगातील श्रीमंतांची यादी वाढत असून माणुसकीची यादी कमी होत आहे. अण्वस्त्रधारी देश स्वतःच्या यंत्रसामुग्री चे यथोचित प्रदर्शन करत आहेत. तालिबान विकृत मनोवृत्ती जगावर नंगानाच करत आहे .अशीच तालिबान वृत्ती अनेक देशांमध्ये आपले पायमुळे घट्ट करत आहे. धर्माच्या नावावर माणसे व स्त्रियांवर अन्विनत अत्याचार करत आहे.

    भारतातही अनेक घटनांचा उहापोह लक्षात घेतला तर आपल्याही देशांमध्ये अशी जमात छुप्या डावाने आपले विस्तारणे करत आहे. देशातील कृषी कायद्याविरोधातील आंदोलन, कामगार आंदोलन, बेरोजगार आंदोलन ,स्त्री मुक्ती आंदोलन, आंबेडकरवादी आंदोलन, खाजगीकरण विरोधी आंदोलन, विद्यार्थी आंदोलन इत्यादी आंदोलनाचा हेतू हाच आहे की भारतीय लोकशाही व्यवस्था मजबूत राहावी. पण प्रस्थापित नेतृत्व या आंदोलनाला कोणताही प्रतिसाद देत नाही नुकताच लखिरपूर खील्ली या ठिकाणी शेतकरी आंदोलन करणाऱ्यांना आंदोलनकारी लोकांना गाडीने चिरडून टाकले. त्याचप्रमाणे भारतातील अनेक भागात शेतकऱ्यावर हल्ले केले जात आहेत. यावरून भारतीय राज्यव्यवस्थेतील अराजकतेचा नमुना आपल्याला पाहायला मिळते. आज देश मोठ्या आक्रंदनात खदखदत आहे.मानवाच्या जीवनाचा उत्थांनमार्ग बंदिस्त केला जात आहे. अशा वातावरणात तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचार तत्त्वज्ञानाची देशाला गरज आहे.

    आपण सारे एक आहोत ही विचारप्रक्रिया जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत असे हल्ले होतच राहतील. म्हणून आता आपण मागे हटणार नाही. धम्म विचार मनात घेऊन नवे महायुद्ध लढायचे आहे. आपल्या समोरील मुलतत्वाद्याबरोबर नवी लढाई लढायची आहे. मूलतत्त्ववाद यांना जर हरवायचे असेल तर फक्त नवीन तंत्रज्ञानाची गरज नाही तर माणुसकीच्या महाऊर्जेची खरी गरज आहे. ही महाऊर्जा बुद्धधम्माच्या क्रांतिकारी विचारातूनच मिळू शकते .समस्त बांधवानो धम्म प्रकाश मार्गाचा स्वीकार करून माणुसकीचे नवीन नंदनवन निर्माण करू या. येणाऱ्या वायटूळाला शह देण्यासाठी नवे क्रांतीगर्भ निर्माण करू या.

    संदीप गायकवाड
    नागपूर
    ९६३७३५७४००


—–

Leave a comment