अनेकांना हायपोथायरॉईडझमचा त्रास असतो. भारतात दहा पैकी एका व्यक्तीला या विकाराने ग्रासले आहे. निरोगी जगण्यासाठी थायरॉईड नियंत्रणात असणे गरजेचे असते. हार्मोन्सचे असंतुलन हे थायरॉईडचे मूळ कारण आहे. आहारातल्या काही बदलांमुळे थायरॉईड नियंत्रणात ठेवता येतो.
अँव्होकॅडो हे विविध पोषक घटकांनी समृद्ध फळ आहे. यात पोटॅशियम तसेच इतर काही पोषक घटक असतात. यामुळे रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रणात रहायला मदत होते. तसेच हार्मोन्सचे संतुलन साधले जाते. यामुळे थायरॉईड ग्रंथीचे काम सुरळीत सुरू रहायला मदत होते.
हिरव्या पालेभाज्यांमधल्या पोषक घटकांमुळेही हार्मोन्सचे संतुलन साधले जाते. त्यामुळे आहारात अशा भाज्यांचा समावेश करायला हवा. विविध प्रकारच्या माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अँसिड्स असतात. या पोषक घटकामुळे शरीराचा दाह कमी होतो. रोगप्रतिकारकशक्ती वाढते तसेच हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी कमी होतो. थायरॉईड ग्रंथींचे कार्य सुरळीत सुरू रहाण्यासाठी आयोडिन आणि सेलेनियम या घटकांची गरज असते. हे दोन्ही घटक अंड्यातून मिळू शकतात. यासोबतच प्रथिने आणि टायरोसिन हे घटकही अंड्यातून मिळतात. त्यामुळे अंड्यांचा आहारात समावेश करायला हवा.