- रणरणत्या ऊन्हातून
- न्हाऊन निघालेल्या
- अलवार रात्रीत…की..,
- धुक्याने आच्छादलेल्या
- ब्रम्हमुहूर्ताच्या
- त्या रम्य पहाटेत…!
- कुठे शोधू मी तुला…
- जगाला जीवंत असल्याची
- साक्ष देणाऱ्या सूर्याच्या
- कोवळ्या किरणांत…की..,
- अस्थिर असूनही स्थिर
- भासणाऱ्या त्या
- मोहक सांजवेळेत…!
- कुठे शोधू मी तुला…
- पावसाच्या पहिल्या
- चमकदार थेंबात…की..,
- प्राजक्ताच्या केशरी
- देठावर विसावलेल्या
- त्या नितळ दवबिंदूंत…!
- कुठे शोधू मी तुला…
- छोट्या पाखराला
- आपल्या चोचीतून चारा
- भरवणाऱ्या आईत…की..,
- पाखराच्या पंखांत बळ
- देऊन गगनात झेप घ्यायला
- लावणाऱ्या त्या बापात…!
- कुठे शोधू मी तुला…
- आईच्या कुशीत निवांत
- निजलेल्या बाळाच्या
- अलगद हसूत…की..,
- सांजवेळेची काठी
- हाती धरलेल्या त्या
- सुरकुतलेल्या डोळ्यांत…!
- कुठे शोधू मी तुला…
- काटे असूनही
- मनाला भुलावणाऱ्या
- नाजूक डेरेदार गुलाबात…की..,
- जगाला अनोळखी असणाऱ्या
- दूर एकांतात वाढणाऱ्या
- त्या रानफुलांत…!
- कुठे शोधू मी तुला…
- कृष्णाच्या बासरीतून
- निघालेल्या सुमधूर सुरांत…की..,
- संतापलेल्या त्रिनेत्री
- महादेवाच्या तांडवांत…!
- कुठे शोधू मी तुला…
- मंदिरात सजविलेल्या
- काळ्या पाषाणमूर्तीत…की..,
- अंतरी खोलवर वसलेल्या
- त्या मनाच्या गाभाऱ्यात…!
- कुठे शोधू मी तुला…
- तुच सांग ना…
- कुठे शोधू मी तुला…!!!
- -सौ.कोमल तुषार शिंदे,
- धुळे.
- 7447583255