- गझलेस मी केले जसे अर्पण मला…
- जगण्यास सुंदर भेटले कारण मला…
- तू गप्प बसण्याचे किती घेशील रे ?
- ऐकायचे नाही तुझे भाषण मला…
- दुनियेस या दोषी उगा मानू कसा ?
- माझेच येथे भोवले ‘मी’पण मला…
- फेटाळता आली न हळवी आर्जवे,
- कळलेच नाही लाघवी शोषण मला…
- आश्वासनांच्या तोरणावर भाळलो,
- छळते अता सत्ते तुझे धोरण मला…
- होतो कसा,झालो कसा,काळासवे?
- हा प्रश्न छळणारा करे दर्पण मला…
- मी वास्तवाच्या विस्तवाचा सोबती,
- सांगू नको ते पुस्तकी श्रावण मला…
- संदीप वाकोडे